Sunday, December 10, 2017

#शब्दचिंतन.



#शब्दचिंतन
डॉ. प्रज्ञा देशपांडे

पैसा ,धन ,वित्त ,अर्थ ,रुपया ,कमाई ,आय-व्यय,श्री ,मूल्य ,संपत्ती ,ऐश्वर्य.....
पैसेवाले ,धनवंत ,वित्तकोष ,
रुपयेवाले ,आयकर ,धनी,
श्रीमान् ,श्रीमंत ,ऐश्वर्यवान् / ऐश्वर्यवती

साधारणत: पहिल्या ओळीतले -व्यवहारात उपयोगात येणारे ,जीवन सुखी होण्याचे साधन मानतात तर
 दुस-या ओळीत -उपरोल्लिखित साधनयुक्त व्यक्तिविशेषण आहेत.
मन,वन,जन,तन,गण अशाच प्रकारचा धन शब्द वाटतो.
तन म्हणजे वाढणारं .
गण म्हणजे मोजलेलं ,
मन म्हणजे  मनन करणारं.
मन हे क्रियात्मक नि संवेदनात्मक इंद्रिय आहे.
जन म्हणजे जन्माला आलेले ....
तसाच धन असेल कदाचित् .. . . संस्कृतात पाच हजाराहून जास्त मूळ धातू आहेत . प्रत्येक शब्द हा त्या मूळधातूंपासून वेगवेगळ्या प्रक्रियांतून तयार होत असतो. काळाच्या ओघात भाषा-अंतर होत गेले. मूळ धातूंचा अर्थ वा प्रक्रिया कळेनासी झाली.
 ( वेळ नाही ,ही अनध्यायाची मोठी सबब.) असो .
धन महत्वाचे , प्रक्रिया काही कां असेना!
वित्त म्हणजे प्राप्त केलेलं . इथे इच्छा व प्रयत्न दोन्ही अपेक्षित आहेत.
अर्थ म्हणजे इच्छित ,वांछित .
अर्थ् या मूळ धातूपेक्षा प्रार्थ् हा उपसर्गयुक्त धातू अधिक प्रचलित आहे.
 प्रार्थना म्हणजे प्रकर्षाने केलेली अर्थना ( इच्छा) .
ज्यात इच्छाच नाही त्यात "अर्थ" कसा??
रुपया हा शब्द अर्थविस्तार प्रकारात मोडतो.
रुप्यकचा रुपया झाला.
पूर्वी चांदीचा रुपया होता. पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी. मानवतेच्या अवमूल्यनासह रुपयाचेही झाले.
आज नाणं जरी चांदीचे नाही तरी रुपयाच म्हटले जाते. हेच अर्थविस्तार .
आय म्हणजे मिळकत.
वि+आय=व्यय म्हणजे गेलेली कमाई.
श्री म्हणजे लक्ष्मी.
संपत्ती -आपत्ती-विपत्ती हे विविध उपसर्गपूर्वक पत्ती कृदन्त होय. योग्य रितीने (भाळी) पडली तर संपत्ती .
उलटी पडली तर आपत्ती नि विरुद्ध झाली तर विपत्ती.
कमावणे पासून कमाई.
 कम्-काम म्हणजे भौतिक सुखाची इच्छा . इच्छा तेथे मार्ग. कमाई त्याचसाठी करतात अनेक जण.
ऐश्वर्य शब्दाचा ऐशशी सबंध नाही. ईश् = नियंत्रण ठेवणे,ईश्वर जो नियंत्रण ठेवतो तो. ईश्वराचे सारे ते ऐश्वर्य. असा तो मूळ अर्थ.
मग "तळे राखेल तो पाणी चाखेल" या न्यायाने ईश्वर म्हणजे सर्वशक्तिमान. अन् त्याचे हे ऐश्वर्य.
मूल्य म्हणजे मुळचे ,मूळयुक्त. मुळात असेल तरच  येणार नाही तर आडात नाही तर पोह-यात कुठून..
मूल्यच नाही ते सारं अमूल्य.
वाला/वाली ,वान्/ वती ,मान्/ मती हे सगळे प्रत्यय "ज्याच्या जवळ आहे ,असा जो तो/ ती".
या अर्थाने येतो.
कोष म्हणजे ज्यात गुंततो तो ,वित्त गुंतलेते वित्तकोष ( बँक)
एकंदरित वित्त नाही म्हणजे आपत्तीच.
 अर्थ नाही म्हणजे अनर्थ ठरलेला.
शब्द कोणताही वापरा  ,
माणुसकीचे अवमूल्यन होऊ नये इतके बघा.
असो......इतका अर्थ शब्दचिंतनाने केला.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त


 आमचं गावं तसं छोटच पण  महत्त्वपूर्ण स्वातंत्र्यपूर्वकाळात  गावात तीन मालगुजारी घराणे सुखानी नांदणारे. प्रत्येकाची सत्तास्थाने श्रद्धास्थाने ,मिळकत स्त्रोत वेगळे तरी घरंदाजपणा ,शालीनता व दानत सारखीच जवळपास.
  माझी आजी जमीनदाराची मुलगी व  मालगुजाराची बायको. उन्हाळ्यात गावी गेलो की आजी रोज छान छान गोष्टी सांगायची. एकदा आजीने "दाखवणे व असणे" या आशयाचा किस्सा सांगितला. 
  ‎तेव्हा इंग्रजांचे राज्य होते . मालगुजार लोकांकडे अनेक दिवाणजी कारभार सांभाळायला असत. वायदे-कज्जे आदि साठी नेहमी तहसीलदाराकडे जावे लागे. स्वत: मालगुजार क्वचितच जात असे . ही कामं दिवाणजींचीच होती. मालगुजार गणपतराव देशमुख हे त्याकाळी आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.  देशमुखांचे दिवाणजी नेहमी तहसीलदाराकडे जात असत. उची वस्त्रं अंगावर दागदागिणे घालणारे ,रुबाबात राहणी असा त्या  दिवाणजींचा वेष असे. तहसीलदार दिवाणजींना आदराने वागवत असत. एकदा  मालगुजार श्री. गणपतरावांना स्वत:ला तहसीलदाराकडे जाण्याचा प्रसंग आला.
  ‎गणपतराव कचेरीत गेले. जी मंडळी त्यांना अोळखत होती ,ती आदराने उभी राहिली. तहसीलदार उभा झाला नाही. थोडा मागाहून दिवाण आला. तहसीलदार मानाने उभा राहिला. गणपतराव तेथे वाट पहात उभेच होते. दिवाणाला लक्षात आले तो चपापला. त्याने सारवासारव करत गणपतरावांची अोळख करून दिली. खादीचे गुडघ्यापर्यंतचे धोतर ,वर बाराबंडी , गळ्यात असली तर एखादी साखळी एखादी अंगठी असा साधा वेष कायमच घालणारे हेच ते गणपतराव ,अतिश्रीमंत व प्रख्यात मालगुजार  आहेत असं कळल्यावर तहसीलदारही वरमला. शेवटी तहसीलदाराला रहावलं नाही . त्याने गणपतरावांना तसा प्रश्न विचारला. त्यावेळी ते सहज उत्तरले "दिवाणजीची इस्टेट ते अंगावर सांभाळतात. मी काय काय सांभाळू ?"
    ‎बावीस गावांची मालगुजारी असलेले गणपतराव नि त्यांचा नोकर यांचे राहणीमान --विचार व वर्तन  अनुक्रमे घरंदाज प्रगल्भता आणि उथळ खळखळाट दाखविणारे होते.
    ‎ आजकाल 'एक हात लाकूड व सात हात झिलपी' असाच जमाना आहे .   विचार न करता ,पात्रता न बघता स्वत:वर दिवे अोवाळून घेण्याची रीतच काही जणांनी सुरु केलीय.  मूळात आपण किती ? याचा विचार न करता इंप्रेशन मारण्याची एकही संधी  सोडत नाहीत.
   दाखवेगिरीच्या या जमान्यात ‎ हा किस्सा अवचित आठवला. अंगभूत मोठेपणा साधेपणानेच खुलतो हे कळायला पात्रता लागते ये-या गबाळ्याचे ते काम नोहे.
   ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
    ‎
    ‎
    ‎

Friday, December 8, 2017

#शब्दचिंतन.



काल कोणीतरी  *स्वार्थी* शब्द कसा होतो ते विचारले. स्व+अर्थ+इन् = स्वार्थिन् या मूळ शब्दाचे पुल्लिंगी प्रथमा एकवचन आहे ते . स्वार्थ ज्याच्यात आहे तो स्वार्थिन् .
याच प्रकारचे कितीतरी शब्द आपण रोजच्या भाषेत बोलतो.
शब्द तयार होण्याची प्रक्रिया आनंददायी असते. एकदा ती कळली की शब्द लीलया साधतात.  मानी ,बली ,धनी ,विजयी ,वादी ,मूलगामी ,
दूरगामी, विद्यार्थी ,लाभी ,कृपाकांक्षी ,दर्शनाभिलाषी ,साक्षी ,त्यागी ,तारी,घनपाठी,दशग्रंथी,भाषी, भारी,याजी,दानी इत्यादी सगळे शब्द वर सांगितलेल्या प्रक्रियेने तयार झाले आहेत.

मानी =मानिन् ,
बली=बलिन्
धनी=धनिन्
विजयी =विजयिन्
वादी=वादिन्
मूलगामी = मूलगामिन् ,
दूरगामी=दूरगामिन् ,
यार्थी=विद्यार्थिन्  ,
लाभी =लाभिन् ,
कृपाकांक्षी=कृपाकांक्षिन्  ,
दर्शनाभिलाषी=दर्शनाभिलाषिन्  ,
साक्षी=साक्षिन् ,
त्यागी =त्यागिन्  ,
तारी=तारिन् ,
घनपाठी=घनपाठिन् ,
दशग्रंथी=दशग्रंथिन् ,
भाषी=भाषिन् ,
भारी=भारिन् ,
याजी=याजिन् ,
दानी=दानिन्
संचारी=संचारिन्
वैभवशाली= वैभवशालिन्
हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. यांची स्त्रिलिंगी रूपे असतात.
मानी =मानिनी,
बली=बलिनी ,
धनी=धनिनी ,
विजयी =विजयिनी,
वादी =वादिनी,
मूलगामी =मूलगामिनी,
दूरगामी=दूरगामिनी, विद्यार्थी =विद्यार्थिनी,
लाभी =लाभिनी,
कृपाकांक्षी =कृपाकांक्षिणी,
दर्शनाभिलाषी =अभिलाषिणी,
साक्षी =साक्षिणी,
त्यागी =त्यागिनी,
तारी=तारिणी,
शाली=शालिनी
माली=मालिनी,
धारी=धारिणी ,
वारी= वारिणी,
मारी =मारिणी
शब्द व्याकरणाच्या अंगाने न शिकता असे शिकले तर सहज ,सोपे व रमविणारे ठरतात.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, November 7, 2017

#सहजोक्त


आताशा मनाला हेच भावतं ,
कां तर कोण जाणे ?
फुलांनी लगडलेली झाडं बागेतच असू दे ,
घर मात्र सजवते मी प्लास्टिकच्याच फुलांनी
किती खरे वाटतात ना ,
अगदी झाडावरच्या ताज्या बहराचे !
शिवाय सुकणे ,कोमेजणे अन् त्यावर डास लागणे ,
अशा भानगडीपण नसतात या गुच्छांना ,
अजून मोठ्ठा फायदा त्यांचा सदा टवटवितपणा !
नसेना कां सुगंध त्यांना,
एअरफ्रेशनर लावलाय घरी ,तो काय शोभेला?

म्हणूनच आताशा मनाला हेच भावतं ,कां तर कोण जाणे ?
फेसबुक-व्हॉट्सॅप मधून मैफिली गाजवणे ,
लाईकवर लाईक मारत फ्रेंडलिस्ट वाढवणे,
चर्चांचे फड , चॅटिंगची झड उगा समोर रेटणे,
मन:पूत फोटो वा वाट्टेल ती बातमी जशी मला वाटेल तशी केव्हाही पोस्टणे,
अाताशा हेच सुखं वाटतं ,कां तर कोण जाणे ?

ती नातेवाईक मंडळी घरी येणार म्हणजे घराला पहिले आवरणे ,
खातीरदारी करता करता जिवाला उगाच थकवणे .
त्यांचे ते आंबट-तुरट-कडवट चेहरे नि तेच तेच पाल्हाळ बोलणे,
जरा म्हणून गोड कोणी भासातूनच मनात जपणे , हे सारं सारं कसं सिरियलमध्येच बरं वाटतं ,पण आताशा मला खरच वास्तवाहून आभास भावतो !
आताशा मनाला हेच भावतं ,कां तर कोण जाणे !
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
नागपूर

Thursday, October 26, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त
पावलांना भार होईल येवढे नको वजन
प्रसादावर लक्ष जाईल नको लांबट भजन ॥
अडगळीत भर पडेल अशी नको साठवण
हृदयाला चरे पडेल तशी नको आठवण ॥
निराशमन पल्लवेल  असे असावे भाषण
प्रेरक -सन्मार्गदर्शक असे असावे वर्तन ॥
कोलाहलात स्वस्थ रहावे असे लागावे ध्यान
आपुलकीची ज्योत जागवी तो खरा सन्मान ॥
कायम मन प्रसन्न व्हावे असे असावे जगणे
सारं जग खुशीत रहावे हेच असावे मागणे॥
अवघ्या आयुष्याचे व्हावे परोपकारी चंदन
चराचरात परमेश दिसावा हेच खरे वंदन ॥
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




#सहजोक्तं संस्कृतेन ।


दृष्टान्तकथा ।
कस्मिञ्चित् नगरे
प्राचीन: देवालय: आसीत् ।
तस्य महिमा जनेषु ख्यात:। सर्वे भक्ता: तत्र गच्छन्ति स्म ।  नगरजना: सोत्साहं ,स्वयंप्रेरणया देवालये विविधान् भक्त्युपक्रमान्  प्रचालयन्ति स्म । न कोऽपि नेता आसीत् न वा अनुयायी तत्र । सर्वे समानत्वेन कार्यं कुर्वन्ति स्म । नगरजनानां निरपेक्षसेवया प्रसन्ना आसीत् देवता ।देवालयकारणात् नगरजनेषु एकता अवर्धत। सर्वे जना: श्रद्धावन्त: भूत्वा संघशक्तिमनुभूतवन्त:।नगरस्य कीर्ति: दिशि दिशि प्रसृता ।
एवं दिनानि व्यतीतानि ।
एकदा केचन परदेशीया: जना: नगरकीर्तिं श्रुत्वा नगरमागतवन्त:। तत्रत्यं वातावरणम् अनुभूय प्रभाविता: ते मनसि चिन्तितवन्त ,"कथम् एतस्य मंदिरस्य महत्वं न्यूनं भवेत् येन नगरस्य प्रसिद्धि: अल्पीभवेत् ।  जनेषु अस्माकं प्रभाव: वर्धेत ? "
नगरवासिन: तु तेषां हेतुं  न अवगतवन्त:।
नगरजनानां  प्रशंसां कुर्वन्त: ते देवालयं निरीक्षितवन्त: । ते दृष्टवन्त: केचन भक्ता: स्वमहिमानं वर्धयितुमिच्छन्ति । अवसरं प्राप्य परदेशीया: तान् भक्तान् तीर्थाटनार्थं तेषां नगरे आहूतवन्त:। तीर्थाटनात् प्रत्यागत्य स्वाभिमानवर्धिता: भक्ता: नूतनदेवालयं निर्मितवन्त:। अधुना नगरे द्वौ देवालयौ अभवताम् ।
अधुना जनानां पुरत: पर्याय: उपलब्ध:। केचन जना: पुरातनं देवालयम् एव  अगच्छन् । केचन तु नुतनं मंदिरम् एव  अगच्छन् । केचन तु द्वे स्थाने   अगच्छन्। स्वमहात्म्यं वर्धुकामा: नुतनदेवालयकारा: अधुना संतुष्टा:।
शनै: शनै: एकता क्षीणा जाता । एकमेवाद्वितीयदेवालयकारणात् लब्धा ख्याति: अपरदेवालयकारणात् अपगता । नगरस्य एकमेवाद्वितीयस्थानं तु लुप्तम् । यत्र संघे शक्ति: अनुभूता  जनै: तत्र भेदे नाश: अपि अनुभूत:। देवालयभेदत्वात् विभक्ता भक्ति: ।
घटनाक्रमं निरीक्षमाणा: सामान्यपर्यटका: मनसि चिन्तितवन्त: यत् ,
" सर्वे यत्र विनेतार:
सर्वे पण्डितमानिन:।
सर्वे महत्त्वमिच्छन्ति
राष्ट्रं तदवसीदति ॥  "
©डॉ. प्रज्ञा देशपांडे .
नागपूर .

#सहजोक्त

#सहजोक्त

कधी कधी काही सुचतं ,स्फुरतं नि शब्दबद्ध होतं , मग ते काव्य असो वा लेख. सहज ,सुप्त मनाच्या  तळाशी असले नसले काही भाव व्यक्त होतात. ते सारे अनुभूत वा अपेक्षित नसतात उलट बरेचदा  कल्पनारम्य असतात वा सहानुभूतीतून उमटलेले ईषत्स्फूट  असतात.
एकदा सहजोक्त मध्ये  काही लिहिले. नेहमी सारखे दोनशे-अडीचशे नियमित वाचकांना पाठवले. त्यातील एका सर्जक-कवी-लेखकाचा उत्स्फूर्त प्रतिसादाचा फोन  आला.  माझ्या कवितेतील अभिव्यक्तीवर  ते बराच वेळ बोलत होते. जे ही बोलत होते ते ऐकतांना मलापण माझ्या न कळत तो विचार,  विचारप्रवृत्त करीत होता.

भारतीय  संस्कृती पुरुषप्रधान आहे. त्यामुळे पुरुषांना बरेचदा अमर्याद स्वातंत्र्य सहज मिळते. पुरुषांना अनेक गोष्टी अनायास करायला मिळतात. भ्रमरवृत्ती ही पुरुषाच्या रसिकतेशी जोडली जाते. पूर्वी बहुपत्नीत्व हे मर्दपणाशी जोडले जायचे . आजही पुरुषाचे बाहेरख्यालीपण वा लफ़डेबाजपणा अपवादात्मक विकृती म्हणून पाहिली जाते , गुन्हा नव्हे. सौ चूहियाँ खाऊन समाजात स्वच्छ प्रतिमेने जगणारे अनेक बिल्ले आजूबाजूला सहज दिसतात. 'इज्जत ही स्त्रिलाच असते पुरुषांना नाही', असा सर्व समाजाचा सामान्यग्रह आहे. त्यामुळे महिलांना बंधने तर पुरुषांना मोकाटपणा अोघाने येतोच . पुरुषाचे  गंभीर गुन्हेही "भूल" ठरते. तर स्त्रीची अनवधानाने झालेली भूल मोठ्ठा गुन्हा ठरते.  याच सर्व पार्श्वभूमीमुळे स्त्री ही अबला ठरते.  बरेचदा बिच्चारी ठरते . नाते कोणतेही  असो -पत्नी, सवत ,रखेल ,आजकालचं गोंडस नाव गर्लफ्रेंड वा मैत्रीण - बरेचदा ती शोषित ठरते. समाजाची सहानुभूती तिला मिळतेच .
या अशाच विचारातून "रुक्मिणीभावातून" मी कविता लिहिली होती.
पण त्या वाचकांच्या फोनने मला वेगळा विचार करायला भाग पाडले.
रुक्मिणी-सत्यभामा यांना राधा-मीरा यांच्यामुळे अवहेलना सहन करावी लागली असेल. त्यांच्या सहनशीलतेवर व सत्शीलतेवर  अनेक साहित्य रचले गेले. कृष्णाचे राधेशी वा मीरेचे कृष्णाशी असलेले नाते कृष्ण पत्नींना बिचारेपणाच देणारं आहे. जगात साहित्यातून त्याांना तशी सहानुभूती मिळतेही.
पण त्याच वेळी राधेच्या पतीच्या मनाचा विचार कां कोणी करीत नाही? परस्त्रियांना लुटणारा नरकासूर जाणूनच  राक्षस होता. पण राधेच्या पतीचे नशीब किती खराब की त्याला देवापासून वाचवायचे होते स्वत:च्या पत्नीला ! काय मानसिक यातना होत असतील त्याला की आवडती पत्नी परपुरुषाच्या प्रेमात आकंठ बुडालीय ,तो पुरुष सामान्य नसून पुरुषोत्तम म्हणविणारा आहे! तीच बाब मीरेची . अनय राजा होता. समाजात त्याचे श्रेष्ठ स्थान होते. अनेक स्त्रियांना तो हवहवासाही असेल पण त्याची पत्नी कृष्णार्पण झालेली!
परस्त्रीशी संबंध ठेवणं जसे गृहस्त्रीशी प्रतारणा आहे व जे चूक आहे तसेच परपुरुषाची अभिलाषा ही स्वपुरुषाशी प्रतारणाच आहे नि तीपण  चूकच अाहे. होय ना? देव असो वा मानव ; पुरुषप्रधान असो वा स्त्रीप्रधान ! समाजात काय चालले आहे ते ज्याची त्याची मर्जी वा स्वातंत्र्य !  पण साहित्यचित्रण करतांना तरी किमान व्यक्तीच्या भावनांचा समतोलपणे विचार करावा ना? फसवले गेल्याचे ,वंचना झाल्याचे ,लुबाडल्या गेल्याचे दुःख  स्त्रीला जास्त नि पुरुषाला कमी असे कसे होईल ? 
किमान संवेदनशील ,सर्जक लेखन करतांना येवढे भान ठेवावे ना !
त्या वाचकाच्या मनापासून मांडलेल्या विचारांनी मी अंतर्मुख झाली. नेहमी व्यक्त होणा-या भावनांच्या पेक्षा अगदी वेगळा  दृष्टिकोण माझ्या समोर उघड झाला होता.

आता तरी मला भेदभावरहीत व्यक्तिवादी-समतोल विचार करता येईल काय ?  परंपरा-रुढींनी बनविलेले एक पक्के मत इतक्या लवकर तसे बदलेल कां?  समतोल मत संवेदनशीलपणे शब्दातून सहजोक्त मांडता येतील काय?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...