Tuesday, February 13, 2018

#शब्दचिंतन


त्या दिवशी एक शब्द कानी पडला ,अन्  शब्दचिंतन करायला पुरेसा ठरला.
"दिठी" . ज्ञानेश्वरीत शब्द आलाय "दिठी" .  मराठीतील काही सुरेख शब्द  कालौघात अप्रचलित होत आहेत. नजर ,विचारसरणी या अर्थाने दृष्टी हा शब्द प्रचलित आहे पण याच शब्दाचे पर्याय  दिठी ,दिठ ,दिट हे शब्द फारसे प्रचलित नाहीत.

पालि भाषेत "दिठ्ठी " हा शब्द आहे . "सम्मा दिठ्ठी" म्हणजे सम्यक् दृष्टी. मराठीत ,संस्कृत भाषेत दृष्टी हा शब्द आहे.  संस्कृत भाषेत "दृश्" पहाणे या अर्थाचा मुळ धातू आहे. दृश् +क्तिन् प्रत्यय लागून तयार झालेला शब्द "दृष्टि" .  असं म्हणतात की संस्कृत ही उच्चारणाच्या बाबतीत फारच काटेकोर पण नैसर्गिक आहे . इथेच पहा ना . दृश्  या मूळधातूत क्तिन् प्रत्यय मिळताना दृश् +ति = असे होते.  या सर्व अक्षरोच्चारण  अक्षरशः  (द्+ ऋ+श् +त्+इ )  अशा प्रकारे होईल.
 द् = दन्त्य  म्हणजे दातापासून उच्चारण .
 ‎ ऋ =  मूर्धन्य म्हणजे मूर्धापासून उच्चारण  .
 ‎श् = तालव्य म्हणजे  तालुपासून उच्चारण
 ‎त् = दन्त्य  म्हणजे दातापासून उच्चारण .
 ‎इ= तालव्य म्हणजे  तालुपासून उच्चारण. या शब्दात श्  व त् बदलून अनुक्रमे ष् व ट् होतात.
 ‎
 ‎उच्चारणाच्या तांत्रिक बाजूंकडे न जाता साधारणपणे आपण कसा उच्चार करतो ते पाहू. दृष्टी कि दृश्टी ? यात दृष्टी हा उच्चार नैसर्गिक आहे . कां? तर ऋ,ष् आणि ट् यांचे उच्चारस्थान मूर्धा आहे. म्हणजे ट् म्हणताना जीभ जेथे लागते तेथेच ऋ आणि ष् च्यावेळी लावावी  लागते. उलट श् म्हणताना च् छ् म्हणताना जीभ जेथे लागते (तालव्य) तेथे लावावी लागते. आज आपण ष् चा उच्चारच विसरलोय. पण अशाप्रकारचे शब्दोच्चारण करताना संस्काराने नाही तर नैसर्गिक रित्या आपण बरोबर उच्चार  करतो. खरे तर श् ष् हे दोन वेगवेगळ्या उच्चारणाचे चिन्ह आहेत . असो.
 ‎तर दृष्टी या शब्दाचा आजच्या भाषेपर्यंत झालेला प्रवास मोठा रंजक आहे.
 ‎दृष्टी चे दिठ्ठी झाले पाली भाषेत. कारण पाली भाषेत 'श ,ष ' नाहीत . फक्त 'स ' आहे.  "ऋ" नाही , तसेच रफारही नाही . त्यामुळे दृ चे दि झाले श् तर नकोच होता म्हणून ठ्ठ झाला. हाही नैसर्गिक उच्चार आहे. दृष्टी म्हणताना जसा जोर पडतो तसाच दिठ्ठी म्हणतांनाही पडतो. आपण मराठी लोक ऋ चा उच्चार रु असा करतो तर हिंदीभाषक रि असा करतात. कदाचित तो योग्य असावा. म्हणून तर पाली भाषेत दृ चे दि झाले ना!
 ‎मग प्राकृत मराठीत दिठी झाले. याच दिठी चे दिठ वा दिट झाले. दिट लागणे ,बाळाची दिट काढणे असे वाक्प्रयोग ऐकिवात येतात. आज मात्र मराठीत दृष्टी हाच शब्द अधिकाधिक ऐकायला येतो. दिठी ,दिठ ,दिट मात्र मागे पडलेत.
 ‎आपली भाषा खरच मुळात श्रीमंत भाषा आहे . "आ नो भद्राः ऋतवो यन्तु विश्वत:"  या न्यायाने आपण अनेक शब्द जगातील अनेक भाषांमधून स्वीकारले. जसे दृष्टी साठी नजर ,व्हू ,साईट,नजरिया ,राय असे परभाषिक शब्द तर सहज उपयोगात आणतो. तर  मराठीमुशीतून तयार झालेले दिठी ,दिठ ,दिट तितकेसे प्रचलित कां करू शकत नाही ?
 ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, February 11, 2018

#सहजोक्त

व्हॅलेंटाईन सप्ताह -आधुनिक काळातील नवी व्रत(?)  !!
माणूस तसा उत्सवप्रिय असतोच . त्यातही भारतीय माणूस फारच जास्त उत्सवप्रिय व श्रद्धालू ! "एकदा मनात बसलं की मग ते करायचेच" अशा वृत्तीचे आम्ही भारतीय , मग ती गोष्ट बुद्धीला पटवायची ,शास्त्रात तिची पाळेमुळे शोधायची ,वादविवाद करायचे इत्यादी इत्यादी .
देवता ,देवांचे अवतार, त्याच्या कथा ,त्यांच्या संबंधी आचारधर्म हे सारं सारं काळाच्या अोघात सुरु झाले पण नेमकं कधी ? हे सांगता येत नाही.
वैदिक काळात नसलेली अनेक दैवते मध्यकाळात उदयाला आलीत व आता सुप्रतिष्ठित झालीत. नवदेवता उदयाची  सुरुवात कधी कुठे झाली, हे  सांगणं या लेखाचा उद्देश नाही. त्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
लाखों वर्षांचा इतिहास असलेल्या भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांच्या परचक्रांच्या आक्रमणानंतर काही व्रतं,सण ,पद्धती सहज मिसळल्या गेल्यात. आज शोधूनही त्यांचा परकेपणा लक्षात येत नाही, पडडापद्धत ,काळीपोत ही वानगी दाखल .
समाजात फॅशनप्रमाणे धार्मिकाचारही रूढ होतात ,असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
पांढरे बुधवार ,संतोषीमाताव्रत ,वैभवलक्ष्मीव्रत , नवरात्रीत रंगपूजा इत्यादी लेटेस्ट व्रतवैकल्ये म्हटले तर अतिशयोक्ती नाही.
वरील सर्व व्रते श्रद्धेतून निर्माण झाले मात्र
आताच्या काळात एक नवे व्रत  मार्केटिंगवाल्यानी मार्केटिंगफ़ंडा म्हणून  रुजवले आहे. . ते व्रतही साधं-सोप्प नाही. जे करतात त्यांना तर तप  करावेच लागते पण जे करत नाहीत त्यांनाही फारच जागृक रहावे लागते.
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले. दूर देशीच्या
रूढी-परंपरा सगळीकडे माहीत होऊ लागल्या. हे युग विज्ञान-तंत्रज्ञानाहूनही जाहिरातयुग म्हणून जास्त अोळखले जाते. सोशलमिडियामुळे
वैयक्तिक-जीवनाची देखिल जाहीर प्रसिद्धी महत्त्वाची ठरू लागली आहे. "मिडिया साक्षीने  दिखावा" हा आजच्या युगाचा मूलमंत्र ठरतोय. "दाखवण्यासाठी वाट्टेल ते ". ..अोघाने आलेच. त्यात हे नवीन व्रत म्हणजे मार्केटिंगच्या जमान्यात हिट ठरले. या व्रतासाठीच्या साधनसामग्रीची विक्री पूर्वी व्रतोपासकांमध्ये सहज होत नव्हती पण जेव्हा विरोधक टोकाचा विरोध करू लागले अन् हे व्रत भारतातील खेड्यापाड्या पर्यंत थेट पसरले व मार्केटला बरे  दिवस आले. हे म्हणजे अगदीे "दारुबंदीच्या जिल्ह्यात जास्त खपते " सारखं झाले .
कोणतं बरं हे नवं व्रत ? काय बरं त्याचे नियम ? कोण त्याची इष्ट देवता ? फळ काय त्या व्रताचे ? कोणी व केव्हा करायचे ते व्रत ? या सर्व प्रश्नांची मालिका डोक्यात निर्माण होणे स्वाभाविकच !
हे व्रत म्हणजे "व्हॅलेंटाईन सप्ताह "!!!
जसे इतर सप्ताह असतात , तसेच या संत व्हॅलेंटाईनच्या नावाने केल्या जातो.   सत्यनारायण कथेसारखी याही व्रताची कहाणी आहे. या व्रताची  माहिती "विकिपिडिया" नामक आधुनिक ज्ञानकोशात सविस्तर आहेच.
तरी माहिती असो म्हणून सांगते. हे सात दिवसांचे व्रत आहे. कोणी करावे तर प्रेम समजणा-या
सगळ्यांंनी !  लग्न न झालेल्या तरूण-तरुणींसाठी विशेष लाभदायी ठरते . (तारुण्याचा वयाशी संबंध नाही ,मानसिकता महत्वाची!! )
फेब्रुवारी नामक आंग्ल महिन्याच्या (पगार घेतांना महिन्याला आंग्ल असे म्हणू नये .) सात तारखेपासून या कठोर व्रताची सुरुवात होते.

 ( मुळात हा सण आंग्लभूमीतून इंपोर्त केला असल्यामुळे आणि सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे यातील दिवसांची नावे इंग्रजीत म्हटली तरच प्रभावी ठरतात .)
 ‎या व्रताच्या पहिल्या दिवसाला "रोझ डे"म्हणतात.
या रोझ डेच्या दिवशी बाजारात एरवी रुपयाला मिळणारे गुलाबाचे फ़ूल प्रचंड महाग होते. ते फूल आपल्या व्हॅलेंटाईनला द्यावे . वर्षभर  देवतेचा शोध घ्यावा. आपल्या जीवनात अनेक दैवतं असतील तर प्रत्येकाची इतमामानुसार खातीरदारी करावी. आणि महत्वाचे म्हणजे गुप्तदान जास्त हितकारक ठरते. या देवतेचे त्या देवतेला कळवू नये !!!
दुसरा दिवसला "प्रपोज डे" म्हणतात. म्हणजे काल फुल दिलेल्या वा न देऊ शकलेल्या "कोणाला तरी"  प्रपोज करायचे म्हणजे
"मला तू आवडते/आवडतो ". असं सांगायचं . दरवर्षी एकाच कानाला सांगायचे की वेगवेगळ्या कानांना हे तुमच्या "प्रेमळपणावर" अवलंबून आहे. सांगणं महत्त्वाचे ; कोणाला ,किती वेळा या फालतू हिशोबात पडायचे नाही.
तिसरा दिवस असतो चॉकलेट डे. नशिब चांगले की कंपनीने बनविलेले चॉकलेट वर्षभर सारख्याच किमतीत मिळते. तर देवतेच्या किमतीनुसार मग आपली पत पाहून भारी चॉकलेट विकत घ्यावे . देवतेला अर्पण करावे ,तिने तुकडा दिला (चॉकलेटचा) तर अमृतानंदाने स्वीकारावा ,(मेली हावरट ,एकटीने खाल्ले ; असा कुविचार मनातही करू नये .)
चौथा दिवस "टेडीडे" म्हणून साजरा करतात. टेडी नामक एक अस्वलाची प्रजाती बाहुल्याच्या रूपात बाजारात विकत मिळते. या दिवशी आपलं प्रतीक म्हणून  देवतेला अर्पण करावे. (आपलं माकड होण्या आधी आस्वल पाठवायचं !!फारच भारी आयडिया ) अन् मनात कल्पना करावी की आपण दिलेले ते (आस्वल नाही म्हणायचं ) टेडी अगदी देवतेने हृदयाजवळ बिलगून ठेवलेय ! नशीबाचे भोग !!!
मग पाचवा दिवस अवतरतो . "प्रॉमीस डे" नावाने.
इथे काय वाटेल ते प्रॉमीस बिंधास्त द्यावे. प्रॉमीस पूर्ण करायला देवता कायम जवळ राहायला हवी ,नाही तर ती पत्नीच्या रुपाने अवतरली तर प्रॉमीसरी नोटवर जरी लिहून दिले तरी अविश्वास कायमच असणार ! त्यामुळे "वचने का दरिद्रता ?" या न्यायाने काहीही प्रॉमीस करा.  पूर्ण होणे न होणे त्या दुष्ट नियतीवर अवलंबून आहे. आपण बापडे काय करू शकतो ?
सहावा दिवस "हगडे" !!  टिव्हीवर हगीजची अॅड पाहून   नाव जरी मराठी कानांना खराब वाटले तरी  या दिवशी "प्रथम भेटी आलिंगन " करणे अपेक्षित आहे. तर जसं जमेल तसं गळाभेट घेऊन पहा . नाही तर गळा दाटून येऊनही फारसा फरक पडणार नाही.
सातवा दिवस फार म्हणजे फारच मोठ्ठा ठरू शकतो. तो दिवस आहे "किसडे"!  किस झाड की पत्ती किंवा बटाट्याचा ,गाजराचा किस असलं काही यात नाही. अधिकृत नात्यापेक्षा चोरट्या नात्यांत असलं किस पाडणं जास्तच घडतं !  किसी को किसी की खबर न लागू देता हा डे पार पाडणं फारच रोमांचकारी ठरू शकतो. "अधरामृतरसपान"  कसा भारदस्त शब्द वाटतो ना किसफिसपेक्षा ? जाऊ दे ,नाव काहीही द्या ,"क्रियावान् स पण्डित: ।" हेच खरे.
आठव्या दिवशी व्रत समाप्तीचा मोठा उत्सवच असतो. तो म्हणजे "व्हॅलेंटाईन डे"! सात दिवस सातत्याने (शक्यतो एकाच ) देवतेचे आराधन
 तन-मन-धनाने (शब्दश: बरे) केल्यावर जर देवता प्रसन्न झाली  "तर  मग काय   उणे  या लाभा ?!" अशी अवस्था होते. सात दिवसात इतके  प्रेमाचे  रंग उधळल्यावर जर खिशात अन् "जिगर मा" दम असेल तर उरले-सुरले  उधळून मोकळे व्हावे.  परिणामाची जाणीव शेजारी ,समाज ,काळ  करून देईलच.
 ‎एकूणच बाजारीकरणाच्या आजच्या काळात  सगळीकडे सवंग उथळपणा वाढला आहे. त्यामुळे "प्रेमदिन" म्हटले की "भीगे होठ तेरे ,प्यासा दिल है मेरा . . . करू प्यार " इतकेच डोक्यात भिनलेले जोडपे "कामातुराणां भयं न लज्जा"  वागताना  दिसतात.  समाजात  प्रेमाविषयी अजब धारणा आहे . ती म्हणजे "आपलं ते प्रेम ,दुस-याचं ते लफडं!"  पण हे दोन्ही अतिरेक सोडले तर योग्य वयात योग्य व्यक्तीसह समाजमान्य पद्धतीने हे व्रत(?)  पाळले तर बिघडलं कुठे ?
 ‎अशा प्रकारे सोशलमिडियाने व मार्केटिंगवाल्यांनी नव्या व्रताला येन केन प्रकारेण  समाजमान्य करण्याचा घटच घातला जणू . "अग आग म्हशी मला कुठे नेशी" म्हणत अनेक जण हा दिवस ,हा सप्ताह साजरा करू लागले. एकुलत्या एक मुलाने हट्टाने स्वत:च्या मर्जीची मुलगी लग्नाला निवडावी व मुलाला जपण्याच्या नादात नावडती असूनही नांदायला घरात घ्यावी लागल्यावर जी अोढाताण सासु-सुनेची होते तसं काहीसं या व्रताबद्दल विरोधक व समर्थकांचे होत आहे.
 ‎  व्रताला जर बाजारू मार्केटिंगचा डूब न देता मर्यादा-संयम-जबाबदारी यांची साथ दिली तर हे ही सहिष्णुतेने स्वीकारल्याच जाईल ना ! भारतीय संस्कृती कधीच प्रेमाच्या विरुद्ध नव्हतीच . उलट पुरणकथा ,धार्मिक वाङ्मय ,साहित्यशास्त्र वाचले तर नवरसात स्थान असलेले श्रुंगाररस देवादिकांनाही निषिद्ध नव्हता.
"प्रेमभावना" चूक नाहीच फक्त विवेक व दायित्व भावना अपेक्षित आहे न् ती अपेक्षा सर्व काळात रास्तच आहे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.











#शब्दचिंतन.


काल नवा शब्द कळला...."अपैशुन्य"!
पिशुन म्हणजे  रानटी,हिस्र हा संस्कृतमध्ये अर्थ माहित होता.

पण माऊलींच्या शब्दकळा नि अर्थगर्भता अद्वितीयच. मराठीतील  भरजरी महावस्त्र म्हणजे "ज्ञानेश्वरी".

माऊली म्हणताता.......

तैसे आपुले निगुणे।पुढीलांचे उणे।
फेडूनिया पाहणे ।तयाकडे॥
वाचूनि न विंधिजे वर्म।नातुडविजे अकर्मी।
।न बोलविजे नामी।सदोष तिही॥
वरी कोणे एके उपाये।पडिले ते उभे होये।
तोचि किजे परीघाये नेदावे वर्म॥
(ज्ञानेश्वरी १६.१૪९.५)

सरलार्थ....
त्याच प्रमाणे आपल्या चांगुलपणाने दुस-यांचा कमीपणा नाहीसा करून मग त्याच्या कडे पाहावे.
ए-हवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये.पापकर्मामध्ये कोणास गुंतवू नये.आणि ज्या नामामध्ये याच्या दोषांचा उल्लेख होतो अशा नामांनी यास हाक मारू नये.

खरोखर "माऊली" माऊलीच आहेत.
 संस्कृतनुसार "अपैशुन्य"चा अर्थ दुष्टपणा/जनावरपणा नसणे किंवा संस्कारित असणे इतकाच होईल.

पण माऊलीच्या अमृतस्पर्शाने मराठी संपन्न झाली.

अपैशुन्यचा अर्थ (माऊलींच्या नुसार) =दुस-याच्या दोषांवर टीका न करता त्याला सन्मार्गी लावण्यासाठी आपल्या गुणांचा उपयोग करणे.

खरोखर तेथेच  इतकी सहज शब्दश्रीमंती योजली जाते जेथे वात्सल्यपूर्ण निर्मळ मन असणाते.
दुस-याचे दोष दाखवू नये उलट त्याला कमीपणा न आणता आपल्या चांगुलपणाने ते दूर करून त्याला मोठे करावे.....केवळ थोरच...
.छानच ....मननीय...चिंतनीय...वर्तनीय........

माऊली अजोड आहेत. पसायदान तेच मागू शकतात.
🙏🙏🙏
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Sunday, February 4, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता .
एकदा तर मनापासून साद घाल ।
मी तिथेच आहे जिथे तू मला विसरलीस ॥
एकदा तर मनासारखं मागून बघ ।
सारं तसच राखलय जसे तुला हवं होत ॥
एकदा तर जरा एकाग्र होऊन  भज ।
द्वैत नव्हतेच कधी,  होता तो तुझा भ्रम ॥
©Dr. Pradnya Deshpande      

#सहजोक्त.


एक गोष्ट लहानपणी ऐकली होती. जगज्जेता अलेक्झँडर भारतात आला तेव्हा त्याच्या मिरवणुकी समोर एक फकिर वातडलेलं चामडं पायदळी तुडवायचा. त्या चामड्याचे एक टोक पायाखाली दाबले की दुसरे टोक वर यायचे . दुसरे टोक दाबले की पहिले वर यायचे. फकिराचे असे अनाकलनीय चाळे पाहून अलेक्झँडर रागाने त्याला सैनिकांकरवी  पकडून स्वत: समोर उभे करवतो व जाब विचारतो. फकीर स्वत:त धुंद असा राख उडवायला लागतो. राजा अधिकच चिडतो. मग तो फकीर काहीतरी अगम्य बोलतो. राजाचा जाणता अमात्य अर्थ सांगतो ," तू इथे नियंत्रण करशील तर तिथे दुफळी माजेल. तेथे बंड शांत करशील तर येथे रण माजेल. सगळं ऐश्वर्य मिळेल पण चैन नाही. शेवट तर राख होणारच अाहेस ."
आज तंत्रज्ञानाने परिपूर्ण व अत्याधुनिक जीवन जगत असलेला नव्या युगातील मानवी समाज आज इतकां अस्थिर ,गोंधळलेला ,तृषार्त कां ?
कोणतेही क्षेत्र बघा ,आंतरिक असंतोष खदखदताना दिसतोय. कामाचा ताण ,कामामुळे दबाव ,शोषण ,पिळवणूक जास्तच होताना दिसतेय.
आपल्या क्षेत्रात सुखासमाधानाने जगताना कोणीच आढळत नाही.
उच्च वर्गीय असोत ,मध्यम वर्गीय असोत वा निम्न वर्गीय , जो तो मुखवटे धारण करूनच वावरतो.
राजकारण ,चित्रपट , समाजसेवा ,बौद्धिक क्षेत्र असो वा व्यापार . कोणतेच क्षेत्र समाधानी दिसत नाही. मनापासून अगदी आवडीने निवडलेल्या  क्षेत्रातही जीवघेणी स्पर्धा हैराण करणारी ठरतेय. आरंभिक स्तरापासून ते चरम स्तरापर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रचंड अस्थिरता ,उथळपणा ,फोलपणा जाणवतोच .
माणसाला जगायला नेमकं काय लागतं ? हेच कळेनासे झालेय या गोंधळात.
सरोवरावर पसरलेला शेवाळाचा वा तेलाचा तवंग जसा सूर्यकिरणांना तळापर्यंत पोहचू देत नाही तसं जगात  सवंग गट खरं ज्ञान ,खरं सुख ,खरं समाधान ज्यातून मिळेल ते सर्व लोकांपर्यंत पोहचूच देत नाहीत.
जिकडे तिकडे दबावगट ,लॉबिंग ,चाटुगिरी . . खरं ध्येय काय ? काय मिळवायचे ? तेच कळेनासं करतात हे असे तवंग !
बाहेर हा असा गोंधळ राहणारच पण किमान स्वतःला ,कुटुंबियांना व मित्रमंडळींना मात्र या दुष्टचक्रातून बाहेर काढावे . अन्यथा अलेक्झँडर होणे अटळच !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.


काही दिवसांपासून मनावर एक प्रकारचे मळभ अाले होते.वेगवेगळ्या कल्लोळांचे काहूर माजले होते.  मग आतल्या आत वेगवान विचारांचे चक्र फिरू लागले.
सहज एकेक उदाहरणं आठवायला लागले. अवतारी कृष्ण ज्याच्यावर  सगळे जण भरभरून प्रेम करायचे  व ज्याने कोणावरही अन्याय होऊ दिला नाही त्याचा द्वेष करणारा पौण्ड्रराज होताच ना ! कृष्णाच्या पासंगालाही आपण पुरू शकत नाही हे माहित असूनही सारखे बरोबरी करीत हिरस करणे त्याने सोडले नाही.  कृष्णाच्या अलौकिक व्यक्तिमत्वाची जाणीव असूनही अनेकजण पौण्ड्रराजाची भलामण करीतच होते ना!
अखिल जगाला करुणा-मैत्री शिकविणा-या भगवान बुद्धाचा द्वेष त्यांचाच भाऊ देवदत्त अगदी लहानपणापासून करीत होताच ना ? भगवान बुद्धाच्याच हयातीत देवदत्ताने बौद्ध धर्माची वेगळी शाखा काढलीच . त्याही काळात भगवान बुद्धांना सोडून देवदत्ताकडे अोढा असलेले भिख्खू होतेच होते.
या जगात अकारण द्वेष वा राग करणारे लोकं असतातच . जसे  परोपकारी वृक्षवल्लींतही विषारी झाडं निपजतातच . तसेच चांगल्या-भल्या मानवी समूदायात कोणी कोणाचा अकारण द्वेष करूच शकतात.
या द्वेषाचेही अजब गणित असते. त्या व्यक्तीचा चांगुलपणा माहित असून देखिल उगाच त्याच्याबद्दल समाजात मन प्रदूषित केल्या जाते. त्या व्यक्तीची व आपली कोठेच तुलना होत नाही ,तो आपल्या वाटेत आडवा येत नाही हे माहित असून तरीही अकारण त्याच्या बद्दल आकस ठेऊन त्याचा
 पाण उतारा करणे ,त्याचा मानभंग करणे ,त्याला हीन वागणूक देणे ,त्याच्या बद्दल जनभावना कलुषित करून त्याला एकटे पाडणे ,त्याचे मनोबल खच्चीकरणे असे नाना लटपटी ,खटपटी केल्या जातात.
भगवान बुद्ध अशा प्रवृत्तीच्या लोकांनाही "मन प्रदूषक देवता" म्हणतात, मनाचा मोठेपण असावा तर असा.
जग अशा वेगवेगळ्या वृत्तीच्या लोकांनी कायमच भरलेले आहे. सद्वृत्ती नि असद्वृत्ती ,एकाच वेळी नांदत असते. बरे एकच व्यक्ती कायम वाईट वा कायम चांगला नसतो. सद्गुण समुच्चय जास्त वा कमी हे प्रत्येकातच असतात.
पण मानवी मन अलौकिक विभूतींच्या मनासारखे महान नाही ना ! जगासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वरही लोकांच्या विकृत वागण्यामुळे निराशून कुटीत कोंडून बसले होतेच ना! मग मुक्ता बाईने ,"जरी जग होता वन्ही ,संते सुखे व्हावे पाणी " असं समजावत ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हटलेच ना !
कधी तरी मन असं निराश होतं . पण ती त्याची सहजवृत्ती नाही.  शांतपणे चिंतन करून त्या निराशेवर मात केल्याच जाते. पण "मनप्रदूषक देवतांमुळे" जो कालापव्यय होतो तो दैव म्हणून सोडून द्यावा कां?
©डॉ.प्रज्ञा देशपांडे. 

#सहजोक्त.


गेल्या काही वर्षांपासून मी सहजोक्त ,चिंतन ,शब्दचिंतन ,चित्रकविता अशा माथळ्यांखाली सदर लिहीत आहे.
शब्दचिंतन हे मला आवडणारं प्रकरण! "शब्दधन आम्हा ,शब्दची सामर्थ्य
शब्दानेच होई जीवन हे सार्थ ॥"हीच माझी वृत्ती.
शब्दांकडे भाषिक अंगाने पहाण्याची जी सवय लागली ती शाळेतील मराठीच्या शिक्षिका चाफेकरबाई यांच्यामुळे. पुढे १९९३ला प्रकाशित झालेलं श्री. मा. गो. वैद्य यांचे "शब्दांच्या गाठीभेटी" हे पुस्तक वाचले. आणि शब्दांनी वेडच लावले.
मा. गो. वैद्य म्हणजे मेधाचे माझ्या मैत्रिणीचे आबा म्हणजे आमचेही आबाच. त्यांच्या घरी उन्हाळ्यात कितीदा मी गेली. पण प्रत्यक्ष बोलायची हिंमत कधीच झाली नाही . मात्र त्यांच्या पुस्तकातून बरेच शिकले. त्यांनी लिहिलेले
" शब्दमिठी ,शब्द दिठी" नावाचेही दुसरे पुस्तक प्रकाशित होऊन बरीच वर्षे झाली.
पण मी ते अजून वाचले नाही.
मुळात एखादा शब्द कसा वा कां आला असावा याचा मागोवा घेणे फारच रंजक आहे. शब्दांबद्दल असे मौलिक चिंतन करणारे मोजकेच असतात.
डॉ. नी. र. व-हाडपांडे यांनी सुद्धा शब्दांच्या मूलप्रवृत्तीवर विचार करून शब्दकोश निर्मितीला सुरुवात केली पण तो कोश अपूर्ण राहिला कारण वृद्धापकाळाने त्यांचे ९३व्या वर्षी निधन झाले. मात्र तो अपूर्ण कोश नेटवर उपलब्ध आहे.अभ्यास करणा-या कोणासही तो सहज उपलब्ध व्हावा म्हणून त्यांच्या पुत्राने तो कोशच नाही तर त्यांचे इतर लेखन मुक्तपणे उपलब्ध करून दिले.
मूळ कल्पना ,मूळ विचार ज्यांचे आहेत ,ज्यांनी मौलिकचिंतन केले आहे ,ते आज सोशलमिडिया वा प्रिंटमिडियात अज्ञात असतील वा अल्पज्ञात असतील . पण म्हणून त्यांचे मौलिककार्य कमी होत नाही. ज्यांच्या ज्यांच्यापासून अगदी कणभर जरी ज्ञान झाले तरी त्यांचा आदराने उल्लेख करावा ,हा माझा शिरस्ता .
मध्यंतरी कोणीतरी सांगितल्याचे स्मरते की " मा.गो .वैद्य यांची दोन्ही पुस्तके ईबुक म्हणून उपलब्ध आहेत ". मी शहनिशा केला नाही कारण मला पुस्तकं जवळ घेऊन पंचज्ञानेंद्रिय तृप्त करत वाचायला आवडतात.
वैद्य आजोबांची शब्द उकलून समजावून सांगण्याची एक मिष्किल व खुमासदार शैली आहे. ती मला खूप भावते. आजोबांच्या पुस्तकांचे अनेकदा पारायण केले पण त्यांनी लिहिलेले शब्द पुन्हा  लिहावे असे वाटले नाही. मात्र त्यांच्या सारखी शास्त्रशुद्ध ,खुमासदार शैलीत आजच्या काळाला सुसंगत शब्दांचे चिंतन करण्याचा यथामती प्रयत्न करते.
अनेकांना मी लिहिलेले शब्दचिंतन आवडते व तसे ते प्रतिसाद देतात. हे पाहून लिहायचा हुरूप वाढतो. ज्याच्या मुळे मी शब्दचिंतन करू लागली त्या माझ्या गुरुंना म्हणजे माझे वडिल श्री. श्रीश हळदे , मराठीच्या बाई चाफ़ेकर ,श्री.  मा.गो. वैद्य ,कै .डॉ. नी. र.
 व-हाडपांडे इत्यादींना सादर नमन .
 ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...