Thursday, May 10, 2018

#सहजोक्त.

#सहजोक्त.
केवढे हे क्रौर्य! - ना.वा.टिळक
मला जे काही मोजके कवी आवडतात ,
त्यात ना. वा. टिळक हे एक आहेत.
 संस्कृतप्रचूर शब्द असूनही कविता बोजड न होता तरल संवेदनशील असणं हे त्यांचं वैशिष्ट्य. टिळकांच्या काही कविता मनाला भिडतात. टिळकांच्या कवितांशी परिचय झाला तो माझ्या बाबांमुळे. त्या कवितांचे रसग्रहण न् बाळपणीच्या आठवणी हे एक अतुट मिश्रण आहे.

आमच्या लहानपणी  टिव्ही ,सोशलमिडिया नव्हते हे आमचं सुदैवच !  उन्हाळ्यात परीक्षा संपल्यावर आम्ही भावंड खेड्यावर जात असू. तिथे  वीजही अनियमित असे. सकाळ ,संध्याकाळ  (दिवेलागणी पर्यंत ) आम्ही ,गावात ,देवळात ,शेतात मनसोक्त हुंदडायचो. पण दुपारी मात्र आई घरातच ठेऊन घेत असे. मग अष्टाचंगापो ,व्यापार ,पत्ते असे खेळ घरबसल्या खेळायचे. गाण्याच्या ,गावांच्या नावांच्या भेंड्या खेळायचे. नाव-गाव-वस्तु-प्राणी-अडनाव हा खेळ खेळायचा. कधी कधी बाबा गोष्ट सांगायचे.
घरात एका अोसरीत ,शेतातील आमराईतील आंब्यांचा माच पसरलेला असे; तर एका बाजूनी कांदे पसरलेले असे. माचातून आज रस करण्या योग्य आंबे वेगळे काढणे हे ही मुलांची सकाळची कामं .  तसेच कांदे फेरणे ,म्हणजे खालचे वर करुन जास्तीची साल काढणे हे दुपारचे काम. वेळ जात नाही ,बोअर होतं ; हे शब्दच आमच्या गावी नव्हते.
एकदा आंब्याचा रस ,बटाटेवडे ,वरणभात , भाजीपोळी असं मनाजोग  जेवण झाल्यावर आम्ही तिघं भावंड ,बाबांच्या कुशीत अोसरीत दुपारी पाळण्यावर आडवे झालो. बाबांना त्यादिवशी काय सुचलं ,माहित नाही .त्यांनी टिळकांची एक कविता म्हणून दाखवली.ती कविता इतकी भावस्पर्शी होती की ती ऐकून आम्ही रडायलाच लागलो. पुढे दोनतीन दिवस त्या कवितेचा प्रभाव मनावर होता.
 बाबांची ती स्पष्ट आवाजातली वृत्ताच्या चालीतील  कविता आजही कानात जशीच्या तशी जाणवते.

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले न तो शिरत बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना तो खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

शालेय शिक्षणात  ही कविता आम्हाला नव्हती. पण यातील कही कडवे स्वभावोक्ती,यमक ,वृत्ताचे उदाहरण म्हणून काही कडवे मात्र चाफेकर बाईंनी शिकवले होते.
नेटवर काही संदर्भ शोधताना अवचित ही कविता दिसली अन्  डोळ्यासमोर सारं तराळले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, May 6, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता

*दगडाला देव मानलं*
तरी  ठेच लागणं नाहीच सुटणार .

कधी पाझरला जर तो
.तृषा अनेकांची शमवणार

कोरले त्याला छिन्नी हातोड्याने
तर सुबक मूर्ती  घडेलही

पण दगडाचेच हृदय त्याचे
कधीच  धडधडणार नाही
कधीच स्पंदणार नाही....?


© डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, May 5, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता.

मिलन अपुले अजून स्मरते
 आजच घडले असे भासते
स्मृतीतुनि नि भासातूनि जे
मनःपटलावर चिर कोरले

 सारे विश्वही शून्य जाहले
निराकार जे आकारी आले
संसार म्हणा वा माया असू दे
भास हा जरी, वास्तव वाटे

क्षणी विश्व हे हरवून गेले
नवे असे जे काही गवसले
तू-मीपण  ही लयास गेले
जेथ मनांचे मिलन घडले

बीज नुरोनि वृक्ष होतसे
थेंबातून जलाशय साचे
तैसे मीपण त्वात मिळाले
द्वैतातुन अद्वैत जाहले

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








Sunday, April 29, 2018

#सहजोक्त.

#सहजोक्त.
आज बुद्धपोर्णिमा. सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्रप्त झाली ती वैशाख पोर्णिमेला. म्हणून तिला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते.
बुद्धाची शिकवण ज्यात संग्रहीत केली आहे ते त्रिपिटक होय त्रिपिटक . त्रिपिटकाची भाषा रसाळ असून त्यात वास्तवाचा गंध आहे.मला त्रिपिटकाचे सुत्तपिटक  जास्त भावते. धम्मपद माझा आवडता ग्रंथ.
बुद्धाच्या जीवनात अनेक पाडाव आले. त्या त्यावेळी ते कसे वागले हे चिंतनीय व अनुकरणीय आहे. बुद्धाच्या अनेक जीवनकथा मला आवडतात. त्यातील एक येथे सांगते.

सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झाले तेव्हा त्यांनी पंचवर्गीय भिख्खूंना प्रथम बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तेच पहिले धम्मचक्कपवत्तन होय.  त्यांचा प्रभाव महान होता. मग जगाला उपकारक असा हा धर्म वाढविण्यासाठी भगवान फिरू लागले.
एके ठिकाणी दोन काश्यप भाऊ नदीच्या वरच्या व खालच्या भागात  आश्रम करून रहात होते. एकाचे ३०० शिष्य होते तर दुस-याचे २००. भगवान ३०० शिष्य असलेल्या भावाकडे गेले. त्याला भगवन्तांचा महिमा माहीत होता. पण त्याला ते उघड मान्य करायचे नव्हते.आपल्या शिष्यांना भगवन्तांच्या प्रभावात येऊ द्यायचे नव्हते. आलेल्या अतिथींचा सत्कार करणे तर कर्तव्यच होते. मग या काश्यपाने भगवंतांना  रात्री अशा ठिकाणी झोपायला  पाठवले जेथे महाभयंकर सर्पराज येत असे व झोपलेल्या व्यक्तीला मारून टाकत असे.
काश्यपाला वाटले की परस्परच गौतमाचा डाव संपेल . त्याचे विचार जाणून भगवान मनात हसतात. रात्री त्यांच्या प्रभावाने सर्पराज शरण येऊन नमन करून कायमचा ते स्थान सोडून गेला. तीन दिवस तेथे राहूनही भगवंतांना काहीही झाले नाही हे पाहून तो मनात चरकला . विचार करू लागला ,"नक्कीच हा मामुली माणूस नाही पण माझ्या इतका मोठाही नाही ". याचे मनातील भाव जाणून भगवान फक्त हसले.  मग भगवान ध्यान करण्यासाठी नदीवरून चालत जाऊन शिळेवर जात असत. हाही चमत्कार पाहून काश्यप मनात म्हणतो ,"नक्कीच हा मामुली माणूस नाही पण माझ्या इतका मोठाही नाही ".भगवान पुन्हा मूक हसतात.
अशा प्रकारे भगवान त्याला अजून चमत्कार दाखवतात पण तो मनातून भगवंतांना थोर मानतच नाही.
शेवटी भगवान मनात ठरवतात की "मूर्खाला त्याच्या मूर्खपणाची जाणीव करून द्यायची वेळ आली आहे." मग  त्याच्या सर्व शिष्यांसमोर त्याची कान-उघाडणी करतात.  मग तो काश्यप त्याच्या ३०० शिष्यांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करतो.

ही कथा मला आवडते कारण आहिंसावादी भगवान बुद्धसुद्धा काश्यपाला स्पष्ट  सुनवतात .
कधी कधी समोरच्याला त्याची पायरी  वेळीच जाणवून द्यावी . पुढील अनर्थ त्यातून टळतात.
आजच्या दिखावू जगात ही शिकवणूक फारच उपयुक्त आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

#सहजोक्त.

#सहजोक्त.
झाडाख्यान..३.

आजी (पितामही) लहानपणी एक गोष्ट सांगायची.
फार फार पूर्वी एक राजा होता. तो सगळ्या प्रजेसाठी अतिशय आदराचे व जिव्हाळ्याचे स्थान होता. त्याचा एक शाही हज्जाम म्हणजे राज-नाभिक म्हणजे राजाचा न्हावी होता.  दर आठ दिवसांनी तो न्हावी राजाकडे येई आणि अगदी एकांतात त्या राजाचे केशकर्तन-दाढी-मिशी आदी कार्य करीत असे.
पुढे तो न्हावी मरण पावला. वंशपरंपरे नुसार त्याचा मुलगा ,घनु वडिलांचे काम सांभाळायला आला. राजाने त्याला एकांतात बोलावले. राजाने जसा फेटा काढला तस्सा घनु भीतीने अोरडला कारण राजाला दोन शिंग होते.इतके दिवस हे गुपित राजा व घनुचे बाबा यांच्यातच होते. आता ते घनुला
कळले  होते. राजाने त्याला धमकी दिली की ,'जर गुपित उघड झाले तर  मृत्यूची शिक्षा देईल'.
घनु आधीच बोलघेवडा . सगळ्या गोष्टी भडभड सा-यांना सांगणारा. आता त्याला हे गुपित पोटात ठेवणे भाग पडले. पण या दबावामुळे तो झुरू लागला. हळुहळू तो सुकू लागला. त्याचे आप्तगण काळजीत पडले. पण घनू कोणाच काही सांगे ना . शेवटी उन्हाळेपावसाळे पाहिलेला एक ज्येष्ठ आप्त म्हणाला "गड्या  ,तुझ्या मनात काहीतरी सल आहे,जो तू उघड करू शकत नाहीस. त्याचमुळे तुझी प्रकृती खालावली. असे कर ,एखाद्या जंगलात जा नि तुझी खंत एखाद्या झाडाला सांग.मग तू मोकळा होशील." घनुला ते पटले. तो गेला . एका झाडाला सांगितले. परतला. ताण उतरलेला घनु पूर्वीसारखा पुन्हा हसरा व बोलका झाला. सगळे आप्तेष्ट आनंदले.
इकडे ते झाड झुरु लागले. हळुहळू ते वाळून गेले. एकदा त्या जंगलातून बजय्ये (वाद्य निर्मिती करणारे) कलाकार जात होते. त्यांना जंगलात सरळसोट पण पार वाळलेेले झाड दिसले. त्यांनी ते नीट कापले. त्यातून त्यांनी ढोलकी-पेटी-सारंगी बनवली. मग त्यांनी वाजवून पाहिली .पेटी वर काहीही  वाजवलं की सुरावट यायची ,राजा को दो सिंग फुटे।" सारंगी वाजवली की आवाज यायचा ,"किन्ने बताया ,किन्ने बताया"। ढोलकीवर थाप पडली की बोल उमटायचे,"घनुनाईने बताया, घनुनाईने बताया."। सगळे कलाकार आश्चर्यचकित झाले.त्यांना कळेच ना ,हे असे कां झाले? आजवर इतकेदा वाद्य बनवून विकले पण असे कधीच अनुभवले नव्हते त्यांनी. ही अजब वाजणारी वाद्य घेऊन ती गावोगाव ,शहरशहर फिरू लागले. लोकांना ती विचित्र वाद्य वाजवून दाखवू लागले. फिरत फिरत त्या राजाच्या राजधानीत आले. वाद्यांतून येणारा स्पष्ट आवाज एकून राजाचे बिंग फुटले. आता ही गोष्ट सा-यांच्या तोंडी झाली. शेवटी राजाने घनुला बोलावले. घनुने हकिकत सांगितली.
आता राजा काहीही करू शकत नव्हता कारण यात घनुचा दोषच नव्हता. .
झाडाला जीव असतो हे तर सिद्धच झालय विज्ञानाने . झाडाला भावना असतात कां?
झाडांना सुख-दुःख ,आपुलकी ,एकाकीपणा असतो कां?
मौखिकवाङ्मयात झाडांच्या मानवी भावनांविषयी कथा आहेत पण प्रमाणसाहित्यात असेच मानतात कां? झाडांना भावना असतात ही कल्पना आहे कां वास्तव ?
"तृण-कोटरात चिमण्यांची शाळा घेऊन निजला अौदुंबर" अशी उदाहरणे काव्यात चेतनगुणोक्ती अलंकाराची मानतात. म्हणजे मानवी भावना झाडांमध्ये नसतात कां?
सकाळी फिरताना एकमेकाला सावरून धरल्या सारखे झाड नजरेला पडले अन् विचार अाले तेच वर मांडले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.

 #सहजोक्त.
झाडाख्यान.....२
काल शिरीष वृक्ष पाहिला. अन् अनेक आठवणींची मालिका सुरु झाली.
आमच्या कॉलोनीतील घरासमोरच्या मोकळ्या पटांगणात अनेक वृक्ष होते आमच्या लहानपणी. आता मोजके शिल्लक आहेत.काही वर्षांपूर्वी  कॉलोनीत प्रवेश करताच नजेत भरत असे, ते शांत वातावरण ,ती पटांगणातली वृक्षराजी अन् भान हरपून पटांगणात खेळणारे बालगोपाल.
काळाच्या अोघात भरपुर बदल झाले कॉलोनीत पण पटांगणाच्या दोन टोकाला दोन डेरेदार ,घनदाट शिरीष वृक्ष म्हणजे कॉलनीची शानच; आजही तसेच आहेत .
दोन टोकांना असूनही सख्ख्या-मित्राच्या गळ्यात गळा घालून फिरणा-या आनंदी बालका सारखे हे दोन वृक्ष एकमेकांत गुरफटून गेल्यासारखेे . दोघांच्याही फांद्या एमकेकात गुंतल्या आहेत . दोघांचेही आकार ,वाढ साधारणपणे समानच आहे.
लहानपणी झाडाच्या खाली सावलीत तर खेळत असूच आम्ही. पण झाडावर चढून शिवाशिवी खेळाचो. म्हणजे एकदोन साडेमाडे तीन म्हणायच्या आधी  बाकी सगळ्यांनी झाडावर चढायचे न्    एकदोन साडेमाडे तीन म्हटले की राज्य देणा-याने झाडावर चढून पकडायचे. एका झाडावरून चढायचे आणि दुस-या झाडावरून उतरायचे. आजही ही झाडं पाहून ते सगळं आठवतं . अन् आता आश्चर्य वाटतं की आमचे पालक रागवत नव्हते ,अोरडत नव्हते की पडाल ,लागेल वगैरे. मग वाटतं आमची मुलं याच कॉलनीत मोठी झाली पण या पिढीने तसे एंजॉय केले नाही.कारणं काहीही असो.
साधारणपणे दुसरीत असतानाचा किस्सा. एकदा माझा  मावसभाऊ राजेशदादा  त्याच्या मित्रांना सांगत होता की माझी छोटी भावंडहीं या झाडावर चढतात. मग त्यांच्या समोर प्रात्यक्षिक दाखवायला म्हणून मला चढायला सांगितलं  .मी चढून झाडाच्या टोकावर गेली .अन मग  या झाडाच्या फांदीवरून त्या झाडाच्या फांदीवर चढत होते .अचानक् मध्येच मी विचित्र फसली. मला पुढेही जाता येईना न् मागेही. इतक्या टोकावर मी लटकून होती. मला रडायला येत नव्हते. पण खाली जमलेले बघे अोडायला लागले न् मला भीतीने रडू यायला लागले. तितक्यात खालून राजेशदादा अोरडला ,'घाबरू नको मी येतोय.'. आमचा राजेशडदादा म्हणजे आमच्यासाठी त्या बालवयातील निर्भीड लिडर ,कॉलनीतला दादा माणुस!! मग राजेशदादा सरसर वर चढला न् मला नीट सावरलं आणि हळूहळू झाडावरून उतरायला मदत केली. तेवढ्यावेळात मावशी व बाजूचे काही मोठीमंडळी जमली. मावशीने जवळ घेतले. राजेशदादाला रागावली की ,'मुली नाजूक असतात . तिला काही झालं असतं तर ?,तुम्हाला तुमची बहिण नकोशी झालीय कां?' वगैरे.
आजही तो प्रसंग बारकाव्यांसह आठवतो. "डिझास्टरमॅनेजमेंट" पुस्तकात न शिकताही लहानपणी वागण्यातून उमजत होते.
इतका प्रसंग होऊनही लहानपणी ते झाड कशाचे हे ठाऊक नव्हते. बरेच वर्षांनी हे झाड शिरीषचे ते कळले. साधारण एप्रिलमध्ये या झाडाला फुले येतात. य़ाची फुलं पण वैशिष्ट्यपूर्णच. आमच्या परिसरात गुलाबी फुलांचे  शिरीषवृक्षं आहेत. लहानपणी आम्ही फूलं गोळा करायचो. त्यांना एकत्र बाधायचो. आणि दाढीचा ब्रश म्हणायचो.   लक्ष नसलेल्या मित्रमंडळींच्या कानात वा नाकात     या फुलांनी स्पर्श करून गुदगुल्या करायचो.
 फुलं संपली की झाडाला शेंगा धरतात. शेंगा वाळल्या की त्या दूरदूर पसरतात. असे हे झाड.
 हीच झाडं मेडिकल परिसरात प्रचंड संख्येने आहेत. भर उन्हाळ्यात घनदाट सावली हे तर त्यांचं वैशिट्य आहेच . शिवाय आयुर्वेदात या वृक्षाला 'महाविषघ्न" म्हटले आहे. या झाडाच्या परिसरात संसर्ग पसरवणारे विषाणु वाढत नाहीत असे एकदा आयुर्वेदाचार्य असलेली शुभदावहिनी म्हणाली होती.
 आमची कॉलोनी मेडिकलकॉलेज परिसराच्या जवळ ! आमच्या परिसरासह मेडिकलपरिसरात  शिरीषवृक्षांचे प्राबल्य. आणि मेडिकल म्हणजे रोगराईचे उपचारकेंद्र !
 "योजकस्तत्र दुर्लभः" ही उक्ती या झाडांकडे पाहून खरी वाटते. ज्या कोणी ही झाड लावली असतील व ज्यांनी या झाडांना जगू दिलं असेल त्या सर्वां प्रति मनापासून कृतज्ञता.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, April 28, 2018

#सहजोक्त.


#सहजोक्त.
झाडाख्यान ...१
काय बघितल्यावर कोणते विचार मनात यावेत याचा काही नेम नसतो. गोष्ट कुठून सुरु होते न् कुठे जाऊन ठेपते हे सांगताच येत नाही. आजच पहा ना ! जवळ जवळ पंधरा दिवसांनंतर सक्काळी फिरायला गेली. नेहमीच्या बास्केटबॉल ग्राऊंडवर प्रातःस्मरण करीत फिरत होते. सहज नजर गेली झाडाकडे. खरे तर रोजच्या परिचयाचा पायाखालचा तो परिसर ! पण आज लक्ष वेधलं ते शिरीषवृक्षाने . खूप आठवणी आहेत या वृक्षाच्या ! पुढची सहजोक्त या विषयावर सहज लिहिता येणार हे नक्की.
माझ्या घरा समोरही मोठमोठी झाडं आहेतच . पण हे पटांगण त्यापेक्षा विशाल असल्यामुळे यावर जास्त झाडं आहेत. मग सगळी झाड मोजली. दहा झाडं शिरीष ,नऊ सिसवाची झाडं ,चार कडुलिंबाची झाडं ,दोन गुलमोहोराची झाडं , नावे माहित नसलेली चारपाच झाडं ,एक रुईचे झाड,अन् हो ,एक वडाचं झाड ,ज्याला त्या परिसरातून जाणारे येणारे नमस्कार करतात  ; ..असे अनेक झाडं आहेत तेथे .
शिवाय एक बोराचं झाड होतं जे कोणीतरी छाटलेलं दिसतय सध्या . चांगली चवदार बोरं यायची त्याला.छाटलेलं ,केविलवाणं झाड पाहून रोज मन खंतवायचं . "काय माणसं असतात ना ! फळं खातात ,सावली उपभोगतात ,पाणीही देत नाहीत  किंवा काळजीही घेत नाहीत ,तसं हे झाड यांच्या अायुष्यात अडचणीही आणत नाही ; तरी त्या बिच्च्या-या झाडाला छाटून टाकलं !" असा विचार यायचा मनात. आज जरा जवळ जाऊन त्या झाडाला निरखून पाहिलं तर एक कोवळे कोंब त्याच्या छाटक्या बुध्यावर रसरसून वाढताना दिसले. ते पाहून उगाच मीच जिंकल्याचा आनंद झाला. "कितीही विपरीत परिस्थिती राहो ,अापलीच मंडळी मुळावर उठली तरी जिद्दीने पुन्हा तगवायचेच स्वतःला !" हीच शिकवण देतात कां झाडं? न कळे !

लहानपणी उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्ये खेड्यात रहायचो आम्ही भावंड. बाबांची शेती होती ना ! तेथे दुपारभर खेड्यातील सवंगड्यांसह मनसोक्त उंडारत खेळायचो आम्ही.
"अत्ती लाव ,पत्ती लाव"असा एक खेळ होता.

¥(हे नाव शुद्ध मराठी आहे कां आमचे नागपुरी हिंदीयुक्त मराठी , हे अजून कळलं नाही. लाव म्हणजे लावणे की लाव म्हणजे घेऊन ये ? यावर कंफ्यूजन आहे कारण खेळताना दोन्हींची गरज आहे पण स्टाईलमध्ये रुबाब झाडायचा तर मध्येच हिंदी झळकलेच पाहिजे असा संस्कार हिंदी सिनेमांनी केला आहे ना....'बचेंगे तो अौर भी लडेंगे..'किंवा 'मेरी झाशी नही दूंगी'! सारखं ......इति विषयांतर .) ¥
 ज्याच्यावर राज्य आलं त्याला "अत्ती लाव पत्ती लाव ..अमुक झाड" असं सांगायचं . मग त्याने ते झाड जेथे असेल तेथे जाऊन पानं तोडून आणायची मग त्या पानांनी
दुस-यांना आऊट करायचे. मग जो बाद झाला त्याला नवे झाड सांगायचे अन् असा हा खेळ सगळे  थकत   पर्यंत चालायचा पण संपायचा नाही.
 या खेळामुळे चपळता ,लवचिकता , सांघिकभावना तर वाढलीच शिवाय झाडांची नावे (अर्थात मराठीत) कळली. शिवाय गावाच्या भूगोलाची माहिती व्हायची हा फायदा.
 आज ही झाडं पाहून लहानपणचे झाडांचे नाव व रंगरूप लक्षात ठेवण्याचे संस्कार आठवले एकदम.
 बाकी झाडांविषयी पुढल्या भागात. ......
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...