Saturday, May 12, 2018

#सहजोक्त.

#शब्दचिंतन.
बरेच दिवसात खरे तर शब्दचिंतन केलेच नाही. वेगवेगळ्या कामात गुंतले असल्यामुळे डोक्यात आलेल्या शब्दांवर विचार करायला जमतच नव्हते.
माझ्या ब्लॉगचे नियमित व चिकित्सक वाचक डॉ.राहुल यांच्याशी बरेचदा शब्दांबद्दल चर्चा होते. अशाच एका चर्चेतून आजचे शब्दचिंतन करीत आहे.
'ख' हा  एकाक्षरी शब्द आहे.  शब्दकोशात त्याचे अनेक अर्थ दिले आहेत. जसे सूर्य, आकाश,   स्वर्ग,   ज्ञानेंद्रिय , नगर , क्षेत्र , अनुस्वार ,बिंदु , शून्य , छिद्र ,    पोकळ ,  मानवी शरीराची नऊ द्वारं , जखम ,   आनंद , ज्ञान ,  ब्रह्मा इत्यादी.
वर दिलेले अनेक अर्थ असूनही ख म्हणजे आकाश हेच जास्त प्रचलित आहे.
खग  = आकाशात गमन करणारा
खेचर = चआकाशात फिरणारा
इत्यादी शब्द प्रसिद्ध आहेतच.
शंख ,सुख,दुःख  या शब्दात येणा-या 'ख'चा अर्थ काय ?  हे शब्द कसे तयार झाले असतील ?
डॉ.राहुल   त्यांनी सुख-दुःख या शब्दां विषयी  त्यांचे विचार मांडले . त्यांच्या मते सुख म्हणजे आपल्या भोवती  सकारात्मक आकाश तयार होणं तर त्याच्या विपरीत दुःख होय. आपल्या भोवतीचे आकाश शमन (शांत) करणारा  तो शंख.
मी वैय्याकरणी नाही. तसेच शब्दकोशात अशा व्युत्पत्त्या दिसत नाहीत. त्यामुळे खरोखर या शब्दांची व्युत्पत्ती काय असावी बरे ? हा प्रश्न अजून मला अनुत्तरीतच आहे.  शिवाय राहुल यांचे मत  आशयाच्यानुसार एकदम नकारण्या योग्य वाटले नाही.
या त्यांच्या मतामुळे " ख" बद्दल सखोल विचार करावा असे निश्चितच वाटले.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, May 11, 2018

#सहजोक्त.


कोण कोणापासून काय प्रेरणा घेईल ,हे सांगता येत नाही. गेले अनेक वर्षे मी लिहिते आहे. खरं मी आधी लिहीत नव्हते. एक दिवस अचानक मराठी भाषा या विषयावर लिहून काढलं . तरूण भारतात पाठवलं . चक्क छापून आलं . डॉ. के.रा.जोशींसारख्या विद्वानांनी कौतुक केलं ,हुरुप वाढला न् लिहिती झाली. बरेच वर्षे व विविध नियतकालिकांतून दैनिकातून लेखन केले आहे ,करते आहे. संस्कृतची पुस्तके लिहिली.
एक दिवस सागरने मला ब्लॉग सुरु करून दिला न् मी ब्लॉग लेखक झाले. दैनिकात देण्यापेक्षा ब्लॉगवर प्रकाशित करणं सुटसुटीत वाटू लागले.
सहजोक्त , शब्दचिंतन ,चिंतन ,चित्रकविता या अशा शीर्षकांतर्गत लेखन करू लागले.
लेखन ही माझी ऊर्मी आहे. जेव्हा जसं सुचलं तसं लिहिते. फार ठरवून नसते. अगदी सहज ,आतून आलं की लिहिते.
माझ्या लेखनाने मला तर अभिव्यक्त होण्याचा आनंद मिळतो. वाचकांनाही लेख वाचून आनंद होतो. माझं लेखन वाचून अनेक जणं लिहिती झाली ,ही गोष्ट अधिक आनंद देणारी आहे. काही  जणं ब्लॉगही लिहू लागले. काही जणांनी ते मोकळेपणाने मान्य केले .तो त्यांच्या मनाचा मोठेपणा. मला आनंद यातच की लेखन-वाचन संस्कृतीला जरा हातभार लावण्याचे भाग्य मला मिळाले.
काल सुखद धक्का मिळाला ;जेव्हा मी फेसबुक बघत होते...सहजोक्त शीर्षक दिसले !!! माझी मैत्रिण न् नियमित वाचक सुनिता  हिने छोटंसं ललित मनोगत लिहिलं ; तेही सहजोक्त शीर्षकाने ! कॉमेंटमध्ये तिने सांगितलेही की तुमच्याच प्रेरणेने !!!
कल्पकतेचे,शैलीचे ,आशयाचे ,विचारांचे,लेखनाचे ,शीर्षकाचे , कौतुक होणं  ,प्रसार होणं ,अनुकरण होणं  ही खचितच गौरवास्पद बाब आहे.
अन् याबाबतील मी फारच सुदैवी आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Thursday, May 10, 2018

#सहजोक्त.

#सहजो्क
तीन सव्वातीनची वेळ.नागपुरी उन्हाळ्याची टळटळीत दुपार. कॉलेज संपवून मी शांयपणे कारने घराकडे यायला निघालेली. सवयीचा रस्ता. उन्हामुळे वर्दळ कमी. गाणे ऐकत सावकाश गाडी चालविण्याचा माझा शिरस्ता.  जाटतरोडी भागातील बुद्धविहारापाशी चारपाच गावराणी कुत्रांचा गोंगाट सुरु होता. मला वाटलं ,आपापसात भांडत असतील. पण बघितलं तर ते सगळे मिळून एका बकरीच्या छोट्या पिल्लाच्या मागे लागले होते. न् ते पिल्लू जिवाच्या आकांताने अोरडत पळत होते. कुत्रे त्याच्या मागेच. माझी कार जरा समोर गेलेली. मी करकचून ब्रेक दाबले. कार बंद केली. बघते तर समोर एक व्यक्तीही बाईक वळवतच होता त्या पिलाच्या केविलवाणा अावाज ऐकून . तोच म्हणाला ,"ताई ,थांबा तुम्ही ,मी बघतो".
मी थांबून बघतेय.
 ते दोन ते तीन मिनिटं .....माझा थरकाप उडालेला. भयंकर क्रौर्य दिसलं त्या जनावरांमध्ये... .बघवत नाही असं अमंगळ, हिंसक दृश्य....
 मी थांबलेलीच होती. वस्तीतले काही जण धावले न् कुत्रांना पिटाळून लावले. ते बघीतले न् मी परत निघाली माझ्या घराकडे.
 माझ्या साठी हे सारं अकल्प ,अघटितन् आकस्मिकच होते. अजूनही त्या पिलाचा भेदरलेला चेहरा डोळ्यासमोर येतो न् भयग्रस्त ,असहाय वाटतं......
 कोणत्याही निरागस जीवाला सुखाने जगता यावे हीच नियंत्याला प्रार्थना !
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.

#सहजोक्त.
केवढे हे क्रौर्य! - ना.वा.टिळक
मला जे काही मोजके कवी आवडतात ,
त्यात ना. वा. टिळक हे एक आहेत.
 संस्कृतप्रचूर शब्द असूनही कविता बोजड न होता तरल संवेदनशील असणं हे त्यांचं वैशिष्ट्य. टिळकांच्या काही कविता मनाला भिडतात. टिळकांच्या कवितांशी परिचय झाला तो माझ्या बाबांमुळे. त्या कवितांचे रसग्रहण न् बाळपणीच्या आठवणी हे एक अतुट मिश्रण आहे.

आमच्या लहानपणी  टिव्ही ,सोशलमिडिया नव्हते हे आमचं सुदैवच !  उन्हाळ्यात परीक्षा संपल्यावर आम्ही भावंड खेड्यावर जात असू. तिथे  वीजही अनियमित असे. सकाळ ,संध्याकाळ  (दिवेलागणी पर्यंत ) आम्ही ,गावात ,देवळात ,शेतात मनसोक्त हुंदडायचो. पण दुपारी मात्र आई घरातच ठेऊन घेत असे. मग अष्टाचंगापो ,व्यापार ,पत्ते असे खेळ घरबसल्या खेळायचे. गाण्याच्या ,गावांच्या नावांच्या भेंड्या खेळायचे. नाव-गाव-वस्तु-प्राणी-अडनाव हा खेळ खेळायचा. कधी कधी बाबा गोष्ट सांगायचे.
घरात एका अोसरीत ,शेतातील आमराईतील आंब्यांचा माच पसरलेला असे; तर एका बाजूनी कांदे पसरलेले असे. माचातून आज रस करण्या योग्य आंबे वेगळे काढणे हे ही मुलांची सकाळची कामं .  तसेच कांदे फेरणे ,म्हणजे खालचे वर करुन जास्तीची साल काढणे हे दुपारचे काम. वेळ जात नाही ,बोअर होतं ; हे शब्दच आमच्या गावी नव्हते.
एकदा आंब्याचा रस ,बटाटेवडे ,वरणभात , भाजीपोळी असं मनाजोग  जेवण झाल्यावर आम्ही तिघं भावंड ,बाबांच्या कुशीत अोसरीत दुपारी पाळण्यावर आडवे झालो. बाबांना त्यादिवशी काय सुचलं ,माहित नाही .त्यांनी टिळकांची एक कविता म्हणून दाखवली.ती कविता इतकी भावस्पर्शी होती की ती ऐकून आम्ही रडायलाच लागलो. पुढे दोनतीन दिवस त्या कवितेचा प्रभाव मनावर होता.
 बाबांची ती स्पष्ट आवाजातली वृत्ताच्या चालीतील  कविता आजही कानात जशीच्या तशी जाणवते.

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले न तो शिरत बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना तो खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

शालेय शिक्षणात  ही कविता आम्हाला नव्हती. पण यातील कही कडवे स्वभावोक्ती,यमक ,वृत्ताचे उदाहरण म्हणून काही कडवे मात्र चाफेकर बाईंनी शिकवले होते.
नेटवर काही संदर्भ शोधताना अवचित ही कविता दिसली अन्  डोळ्यासमोर सारं तराळले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, May 6, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता

*दगडाला देव मानलं*
तरी  ठेच लागणं नाहीच सुटणार .

कधी पाझरला जर तो
.तृषा अनेकांची शमवणार

कोरले त्याला छिन्नी हातोड्याने
तर सुबक मूर्ती  घडेलही

पण दगडाचेच हृदय त्याचे
कधीच  धडधडणार नाही
कधीच स्पंदणार नाही....?


© डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, May 5, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता.

मिलन अपुले अजून स्मरते
 आजच घडले असे भासते
स्मृतीतुनि नि भासातूनि जे
मनःपटलावर चिर कोरले

 सारे विश्वही शून्य जाहले
निराकार जे आकारी आले
संसार म्हणा वा माया असू दे
भास हा जरी, वास्तव वाटे

क्षणी विश्व हे हरवून गेले
नवे असे जे काही गवसले
तू-मीपण  ही लयास गेले
जेथ मनांचे मिलन घडले

बीज नुरोनि वृक्ष होतसे
थेंबातून जलाशय साचे
तैसे मीपण त्वात मिळाले
द्वैतातुन अद्वैत जाहले

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








Sunday, April 29, 2018

#सहजोक्त.

#सहजोक्त.
आज बुद्धपोर्णिमा. सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्रप्त झाली ती वैशाख पोर्णिमेला. म्हणून तिला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते.
बुद्धाची शिकवण ज्यात संग्रहीत केली आहे ते त्रिपिटक होय त्रिपिटक . त्रिपिटकाची भाषा रसाळ असून त्यात वास्तवाचा गंध आहे.मला त्रिपिटकाचे सुत्तपिटक  जास्त भावते. धम्मपद माझा आवडता ग्रंथ.
बुद्धाच्या जीवनात अनेक पाडाव आले. त्या त्यावेळी ते कसे वागले हे चिंतनीय व अनुकरणीय आहे. बुद्धाच्या अनेक जीवनकथा मला आवडतात. त्यातील एक येथे सांगते.

सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झाले तेव्हा त्यांनी पंचवर्गीय भिख्खूंना प्रथम बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तेच पहिले धम्मचक्कपवत्तन होय.  त्यांचा प्रभाव महान होता. मग जगाला उपकारक असा हा धर्म वाढविण्यासाठी भगवान फिरू लागले.
एके ठिकाणी दोन काश्यप भाऊ नदीच्या वरच्या व खालच्या भागात  आश्रम करून रहात होते. एकाचे ३०० शिष्य होते तर दुस-याचे २००. भगवान ३०० शिष्य असलेल्या भावाकडे गेले. त्याला भगवन्तांचा महिमा माहीत होता. पण त्याला ते उघड मान्य करायचे नव्हते.आपल्या शिष्यांना भगवन्तांच्या प्रभावात येऊ द्यायचे नव्हते. आलेल्या अतिथींचा सत्कार करणे तर कर्तव्यच होते. मग या काश्यपाने भगवंतांना  रात्री अशा ठिकाणी झोपायला  पाठवले जेथे महाभयंकर सर्पराज येत असे व झोपलेल्या व्यक्तीला मारून टाकत असे.
काश्यपाला वाटले की परस्परच गौतमाचा डाव संपेल . त्याचे विचार जाणून भगवान मनात हसतात. रात्री त्यांच्या प्रभावाने सर्पराज शरण येऊन नमन करून कायमचा ते स्थान सोडून गेला. तीन दिवस तेथे राहूनही भगवंतांना काहीही झाले नाही हे पाहून तो मनात चरकला . विचार करू लागला ,"नक्कीच हा मामुली माणूस नाही पण माझ्या इतका मोठाही नाही ". याचे मनातील भाव जाणून भगवान फक्त हसले.  मग भगवान ध्यान करण्यासाठी नदीवरून चालत जाऊन शिळेवर जात असत. हाही चमत्कार पाहून काश्यप मनात म्हणतो ,"नक्कीच हा मामुली माणूस नाही पण माझ्या इतका मोठाही नाही ".भगवान पुन्हा मूक हसतात.
अशा प्रकारे भगवान त्याला अजून चमत्कार दाखवतात पण तो मनातून भगवंतांना थोर मानतच नाही.
शेवटी भगवान मनात ठरवतात की "मूर्खाला त्याच्या मूर्खपणाची जाणीव करून द्यायची वेळ आली आहे." मग  त्याच्या सर्व शिष्यांसमोर त्याची कान-उघाडणी करतात.  मग तो काश्यप त्याच्या ३०० शिष्यांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करतो.

ही कथा मला आवडते कारण आहिंसावादी भगवान बुद्धसुद्धा काश्यपाला स्पष्ट  सुनवतात .
कधी कधी समोरच्याला त्याची पायरी  वेळीच जाणवून द्यावी . पुढील अनर्थ त्यातून टळतात.
आजच्या दिखावू जगात ही शिकवणूक फारच उपयुक्त आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...