Thursday, May 18, 2017

सहजोक्त.

#सहजोक्त.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपुर.
साहित्यकार विश्वनाथाने म्हटलेय की ,''वाक्यं रसात्मकं काव्यम्"। म्हणजे रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य होय.
संस्कृतमध्ये गद्य-पद्य-नाट्य-मिश्र आदि सर्व प्रकारांना काव्य असेच म्हणतात. आकारानुसार काव्याचे लघुकाव्य -दीर्घकाव्य-खंडकाव्य- महाकाव्य असे भेद पडतात.

विश्वनाथाची वरील व्याख्या विशेष मननीय आहे. त्यांच्या मते "एका" वाक्याचे सुद्धा काव्य होते पण त्या वाक्यात "रस" हवा.नवरसांपैकी कोणतातरी एक रस टाकला की काव्य झाले ,इतके सोपे नाही.

राजाभोज-कालिदासाची कथा सांगतात .ती अशी .....
तीन नवकवी भोजराजाकडे पारितोषिकाच्या आशेने जातात. प्रवासात जातांना त्यांना कळते कीराजाला काव्य आवडते म्हणून ते ताजे-प्रासंगिक  काव्य रचून नेतात. प्रसंग असा असतो की ते नदी काठी जेवायला बसतात. त्याच वेळी नदीकाठच्या जांभळाची पिकलेली फळे पाण्यात पडतात नि तरंग उठत "डुबुक्" असा आवाज होतो,पण मासोळ्या ते खात नाहीत.
हे तिघे एकेक  ओळ चरतात.शेवटची अोळ मिळून रचतात.
पक्वानि जम्बुफ़लानि
पतन्ति जलमध्ये
मत्स्या: तानि न खादन्ति
जलमध्ये डुबुक् डुबुक् ॥
अर्थ असा ......जांभळाची फ़ळे पिकली ,
ती पाण्यात पडली
पण मासोळ्या खात नाहीत
पाण्यात "डुबुक्" असा आवाज येतो.
 आपण छान कविता केली ,सरस केली या भावनेने आनंदून ते धारानगरी (भोजराजाची राजधानी) कडे निघतात.
 वाटेत त्यांना सुदैवाने कविकालिदास दिसतात. हे तिघे नमस्कार करून ती कविता दाखवतात. कालिदास म्हणतात ,"वा ,वा! काव्य छान आहे ,फक्त एकच दुरुस्ती आहे !" त्यांनी 'कोणती?' विचारल्यावर ...
 पक्वानि जम्बुफ़लानि
पतन्ति जलमध्ये
मत्स्या: तानि न खादन्ति
जालगोलकशंकया ॥
अर्थात ..जांभळाची फ़ळे पिकली ,
ती पाण्यात पडली
पण मासोळ्या खात नाहीत
कारण जाळ्याची आशंका.
असे लिहून काव्य परत करतात.
हे तिघे राजसभेत जातात. राजा त्यांना पारितोषिक देतो.

 वरील कथेचे सार म्हणजे शेवटच्या अोळीत काव्यगुण आहे .शेवटच्या अोळीमुळेच काव्य झाले .
 शब्दाला शब्द ,चमत्कृती ,रसपोष सगळे असूनही "प्रतिभा-लावण्य" नसेल तर ते काव्य बाळसेदार न होता सूज ठरते.
 सिक्सवर्ड स्टोरी असो ,हायकू असो ,चारोळी असो ,शेर असो वा लघुकविता काहीही असो .काव्यगुण असला तर ते अप्रतीम ठरते.
 उलट जितके छाटे वाक्य तितका प्रतिभेचा कस जास्त लागतो.
  अन्यथा.......आनंदीआनंद.......
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
  नागपुर.



No comments:

Post a Comment

#सहजोक्त

. क्षमा शस्त्रं करे यस्य  दुर्जनः किं करिष्यति।  अतृणे पतितो वह्निः  स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...