#चित्रकविता
*स्त्रीभ्रूणाचे बीज*
अोसाड माळरानी,
शुष्क धरा उललेली
दगडी कपारित,
बीज पडले कधी तरी
नाही ऊब ना माया
निसर्गाची हो करणी
जीव बिजाने धरला,
कोणाच्या नसे गावी ॥१॥
बीज अंकुरले अहा ,
इवलीशी पाती पहा
कोवळा जीव तान्हा
सुकुमार कोमलसा
किती छोटीशी नाजूक
त्याची इवलीशी काया
कसं पेलावे आव्हान
दुष्ट जगाचे या सा-या ?॥२॥
वरी टणक जमीन
आणि मोठाला हा धोंडा
कसा साहवे हा भार
अंकुराचा जीव तान्हा
विपरित परिस्थिती ,
विरोधी हा उन्हवारा
देवा कसा तुझा न्याय ,
कां बा घेतो रे परीक्षा ?॥३॥
अहो आश्चर्य जाहले !
अंकुरे दगड भेदिले
कठोरत्व दगडाचे
न् कोमलपण अंकुराचे
स्वभावाला न च त्यागिले ,
तरी जीवनी जिंकले
दगडाला भेदूनिया
बीज-अंकुर टरारले ॥૪॥
बीजासम स्त्रीभ्रूण
माते उदरी अंकुरते
नकुशीच्या पोटी बघा
नकुशीच चाहूलते
जरी जग तिचे वैरी
जन्माच्याही आधी होते
दोन्ही घरा उजळून
क्षमाशील धरणी होते ॥५॥
© *डॉ.प्रज्ञा देशपांडे*.
नागपूर
खूप छान... निवडलेले चित्र आणि अनुरूप नकोशा अंकुरांची जीवन कहाणी.
ReplyDeleteयथोचित वर्णिले बिजाची किमया
ReplyDeleteबोध घेण्या उत्तम आम्हा मानवा|