#शब्दचिंतन.
मनस्वी , मनसोक्त , मनःपूर्वक, मनापासून.
आजकाल शुभेच्छा देताना 'मनस्वी शुभेच्छा वा अभिनंदन' असं म्हणण्याचा प्रघात पडू लागला आहे. "भारी शब्द" वापरून समोरच्यांना प्रभावित करण्याच्या हौसेतून अश्या अनेक शब्दांना योजल्या जाते.
पण हे शब्द नेमके कोणता अर्थ व्यक्त करतात ? असे बघणे गरजेचे आहेच. त्याही पलीकडे शब्द कसे तयार झाले ? हे ही विचारात घ्यायला हवे.
मनस्वी = मनस्विन् या पुल्लिंगी विशेषणाचे प्रथमा एकवचन आहे. "मन (ताब्यात) आहे असा". याचेच स्त्रीलिंगी रूप 'मनस्विनी' , असे होते. मनस्विता हेही भाववाचक रूप आहे. याला तद्धित-रूप असे म्हणतात. मनस्विता या शब्दाचा अर्थ मनस्वीपणा हा होईल.
मनस्वी हा शब्द एका विशिष्ट प्रक्रियेने झाला आहे. मनस् + विनिः = मनस्विन् हे तद्धित-रूप आहे.
विनि प्रत्ययाचा अर्थ "असलेला , झालेला , मिळालेला" वगैरे होतो.
याच शब्दासारखे आणि व्यवहारात प्रचलित असलेले अनेक शब्द आहेत. जसे तपस्विन् (तपस्वी/तपस्विनी ) , यशस्विन् (यशस्वी/यशस्विनी) , तेजस्विन् (तेजस्वी/तेजस्विनी) , ओजस्विन् (ओजस्वी/अोजस्विनी) .
मूळात मनस्विन् हे विशेषण आहे. त्याचा प्रचलित अर्थ- मन-मानेल तसा वागणारा , स्वैर वागणुक असलेला , मोकाट - आदी अर्थच्छटेने घेतल्या जातो .
शुभेच्छा किंवा अभिनंदन मनस्वी कसे काय असेल बरे ?
मनसोक्त = प्रचलित भाषेत मनमुराद , मनाप्रमाणे , मन मानेल तसं आदी अर्थाने हा शब्द आहे.
पण हाही शब्द जरा वेगळा आहे . मनसा + उक्तम् = मनसोक्तम् असा संधी सह असलेला शब्द आहे तो. मनसा म्हणजे मनाने . उक्तम् म्हणजे सांगितलेले. मनसोक्त म्हणजे मनानी सांगितलेले.
या प्रकारातीलही अनेक शब्द भाषेत आढळतात. जसे शास्त्रोक्त (शास्त्रात सांगितलेले/म्हटलेले) , वेदोक्त (वेदांत सांगितलेले/म्हटलेले) , श्रुतिस्मृतिपुराणोक्त , उपरोक्त ( वर सांगितलेले /म्हटलेले) वगैरे .
आपण मात्र रूढं अर्थानुसार "मनसोक्त" वागावे !
मनःपूर्वक = मनापासून या अर्थाचा हा शब्द. अभिनंदन , शुभेच्छा , सदिच्छा इत्यादी मनापासूनच करायला पाहिजे , होय ना ? मनस्वी म्हणजे मनमानेल तशा नकोत .
मनापासून = हा शब्दाचा अर्थ इतका स्पष्ट आहे की याला स्पष्टीकरण कशाला हवे ना ?
आपला भाषिकस्तर उंचावण्यासाठी शब्दांचे कोशातील अर्थ बघणे , या पलीकडे शब्दांच्या व्युत्पत्ती देखील लक्षात घ्यायला हव्या.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
मुळात मराठीत मनस्वी शब्द संस्कृत प्रत्ययाप्रमाणे रूढ नाही. आणि मनस्वी शुभेच्छा हा ताजा विनोद आहे.
ReplyDeleteदुष्काळसदृश्य परिस्थिती आता रूढ झाली .
रूढ करणा-यांनी विचार करावा मूळ शब्दवृत्तीचा
ReplyDelete