Saturday, March 4, 2017

5.3.2017

#चिंतन ~ पंचकोश.




सर्व सजीवांमध्ये मानवा इतकी गुंतागुंत कोठेच आढळत नाही. पंचमहाभूते ,पंचज्ञानेंद्रिये,पंचकर्मेंद्रिये यांनी तयार झालेले पंचकोशयुक्त जीवात्मा म्हणजे मानव.
अन्नमयकोश ,प्राणमयकोश,मनोमयकोश,
विज्ञानमयकोश,आनंदमयकोश हेच ते पाच कोश जे प्रत्येकात असतात. प्रत्येक मानवीचैतन्य  या पाच आवरणांनी झाकले असते.
अन्नमयकोश सगळेच अनुभवतात.
प्राण ,ज्यामुळे आपण जिवंत आहोत,श्वास घेतो त्याची पण जाणीव असते सगळ्यांना .
मन ,जे वढाय वढाय असते ,जे अचपळ असते ,जे मानवीवृत्तीला बहिर्मुखी करते ; त्याचे आवरणही सगळ्यांना सापेक्षतेने पटते. विज्ञानमयकोश यातील विज्ञान हा शब्द आजकालच्या सायंसशी संबंधित नाही. ज्ञान म्हणजे  जाणून घेण्याचे  साधन . परमात्मा हा ज्ञेय म्हणजे जाणण्या योग्य आहे. आपण (जीवात्मा) ज्ञाता आहोत. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. ज्ञानाचे फळ म्हणजे विद्या.
आज विद्या म्हणजे ज्ञान म्हणजे डिग्री समजतात तसे इथे  अपेक्षित नाही.
या जगात (भौतिक सुखात) जगण्यासाठी जी लागते ती अविद्या. मात्र जी निर्वाण ,मुक्ती ,मोक्ष म्हणजेच स्थिरशांती देते तीच विद्या होय. अशी विद्या मिळविण्याचे साधन म्हणजे ज्ञान, विशेष रितीने मिळविण्याचे साधन म्हणजे विज्ञान.
तर अशा विज्ञानाचे आवरण सजीव चैतन्याभोवती असते. हे आवरण सगळ्यांना असले तरी त्याची जाणीव बरेच जणांना नसते. त्या पलीकडे आनंदमयकोश आहे. तो तर जाणीवेच्या पलीकडेच असतो ,अनेकांच्या आयुष्यभर.
"तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी "
अशीच सार्वत्रिक अवस्था असते. चिन्मय जीवात्मा सतत आनंदमय कोशाने व्यापला असतो.
जीवसृष्टीचे मूळ आवरण आनंद ,सहजानंद ,नित्यानंद ,पूर्णानंदच असते. संग्रह करण्याच्या ,अहं+काराच्या ,ममत्वाच्या स्वभावामूळे आपण या चिरंतन ,अखंड ,अविरत आनंदाला आपल्यापाशी धरून ठेऊ इच्छितो.
मग तो सापेक्ष होतो ,क्षुद्र होतो,डागाळतो .
जितकं जितकं निखळ ,सरळ, सरस ,उपाधीरहित जगावे तितका  "आनंदमयकोश" अधिक विस्तारतो.
उदाहरण म्हणजे आदरणीय डॉ. ए.पि.जे.अब्दुलकलाम .
इतके उच्चपदस्थ ,जगन्मान्य पण निरागसतेमुळे सतत आनंदी रहात. मोठेपणाची झुल चढूच दिली नाही त्यांनी .
त्यांचा विज्ञानमयकोश व आनंदमयकोश विशेष जागृत असेलच. असाच आदर्श आपणही बाळगावा.
खरे तर प्रत्येकजण स्वत: आतून आनंदीच असतो. मानवीमूळ प्रवृत्ती आनंदाचीच आहे. मन नकारार्थी ,निराशायुक्त विचारांनी प्रदूषित होते .अन् असे प्रदूषित मन आनंदमय कोशाला झाकाळून टाकते.मग वस्तु,व्यक्ती,परिस्थिती यातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न केल्या जातो. पण अशा आनंदाने समाधान ,शांती मिळत नाही.
भौतिकसुखाचा त्याग करा असा अर्थ नाहीच . पण आतील निखळ आनंदाला जाणा,जपा आणि जगा हेच महत्वाचे.
"लागा चुनरी में दाग ...." किंवा "मैली चादर अोढ के कैसे ..." आदि गाण्यातून हेच ऄनंदाचे तत्त्वज्ञान सहज सांगितले आहे.
कधी हिंदीगाण्यातील आध्यात्मावर चिंतन लिहीन.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment