Wednesday, March 15, 2017

पंचतंत्र" ~१

१६.०३.२०१७

   #सहजोक्त ३
      पंचतंत्र"  ~१

   "पंचतंत्र"  जागतिक-इतिहासातील एकमेवाद्वितीय संस्कृत ग्रंथ.
आज जगातील अनेक भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे.
 पण मुळातून तो ग्रंथ वाचणे जास्त हितवाह आहे.
   प्रत्येक शिक्षकाने , पालकाने आवर्जून वाचायला हवा हा ग्रंथ.या ग्रंथाच्या निर्मितीची कथा पण रंजक आहे.
   अमरशक्ती नावाचा राजा असतो.त्याची मुले उनाड-नाठाळ असतात.त्यांना शास्त्राध्ययनाची आवड नसते.(म्हणजे आजकालच्या मुलांसारखेच ते असतात.) शिकण्याच्या वयात ते शिकत नाहीत. राजाला काळजी वाटते ,यांचे पुढे कसे होईल?
   राजसभेत तो विद्वानांना साद देतो.
"माझ्या मुलांना शिकवा हो" .
कोणीच तयार होत नाही. (शालाबाह्य मुलांना शिकवणे सोपे नाही.)
   पण त्याच सभेत "विष्णुशर्मा" नावाचा विद्वान शिक्षक ते आव्हान स्वीकारतो. मुलांना घेऊन आपल्या आश्रमात जातो. निसर्गाच्या सानिध्यात कथांच्या सहाय्याने त्या -अभ्यासाची नावड असलेल्या,अक्षरशत्रु -मुलांना "राजनीती"पारंगत करतो.
    याच कथा "पंचतंत्र नावाने संकलित केल्या आहेत.
   आज जसे धारावाहिक असते ,त्यात एका भागातून दुसरा भाग निघतो तश्या या कथा आहे. कथामालिका पण प्रत्येक कथा स्वतंत्र.
   ज्ञानरचनावाद-वर्तनवाद  असे कुठलेही वाद न करता मुलांना समजेल ,आवडेल,पटेल या पद्धतीने कथा रचल्या आहेत. मुळात कोणालाच उपदेश आवडत नसतो ,विद्यार्थ्यांना तर अजिबात नाही. या सर्व कथांचे नायक (प्रमुख पात्र) प्राणी आहेत.(वरवर बघता) प्राण्यांचे वर्तन-समस्या-उपाय इत्यादी ,या ग्रंथाचा वर्ण्यविषय आहे.त्यामुळे कथा वाचतांना "मला शिकवतात"हा भाव उत्पन्नच होत नाही. म्हणून विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत होऊन ते त्या कथानकात तत्काळ समरस होतात.
   आजही ,जग-लोकव्यवहार-मानवीवर्तन-समाजवर्तन-राजनीति -व्यवस्थापन आदि शिकायचे असेल तर हा ग्रंथ समूळ वाचावा.
   खरे तर हा ग्रंथ त्याकाळातील बालवाङ्मय होय.पण प्रगल्भ करण्याची त्याची क्षमता अद्भूत आहे.
 
   या ग्रंथावरून  काही तथ्य लक्षात आले . ते असे ........मुलांशी वागताना ,"लहान आहेत ,यांना कळत नाही" असे समजून वागू नये.,सोपं-कठीण अश्या मापात न मोजता जे जसे आहे तसे सांगावे. लहान मुलांची ग्रहण-धारण-स्मरण-क्षमता व कल्पनाशक्ती मोठ्या माणसांपेक्षा तीव्र असते.उलट जगाचा नकारात्मक अनुभव न आल्यामुळे त्यांच्यात प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते की बरेचदा मोठी माणसं  त्यांच्या समोर तोकडी पडतात.अन् तीव्र निरीक्षणशक्तीमुळे ते मुलांच्या लक्षात येते .मग मुले अशा मोठ्यांची अवाज्ञा करतात.मुलांना त्यांच्या वयापेक्षा मोठे ध्येय द्यावे.इ. इ.
   ही लेखमाला पंचतंत्रासाठी.......
   ©प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

सहजोक्त.

  . शिवी ... अबबो आता शिवीवर पण लिहायचे कां? 😊 हं! लिहिता येऊ शकते. मराठी भाषेत 'शिवी' शब्द कुठून, कसा आला असेल बरे? मराठी भाषेतील ...