Friday, March 24, 2017

#सहजोक्त.......


#सहजोक्त......
कथाकथन ,एक सुंदर कला. कथाकथनातून सहज संस्कार होतात. इतक्यात वेगवेगळ्या संदर्भात दोन सत्यकथा ऐकल्या.  मला खूप आवडल्या.
 पहिली कथा अशी आहे थोडक्यात...

मनोहर.पर्रिकरांच्या लहानपणी गावातील श्रीमंत शेतकरी, गावकरी मुलांसाठी त्याच्याच शेतात फुकट टरबूज खाण्यची स्पर्धा दरवर्षी घेत असतो. अट एकच की बिया तेथेच टाकाव्यात. दरवर्षी मुले आनंदाने भाग घेत असतात. पुढे तो शेतकरी मरण पावतो. त्याचे वारस ही प्रथा पुढे सुरु ठेवतात.काही काळानंतर त्यांची टरबूजाची शेती नष्ट होते. शोध घेतल्यावर कळते की आजोबा मुलांना खाऊ घालायला उत्तम-रसदार टरबुजे काढत असत.

 पुढे पुढे त्यांच्या वारसांनी परंपरेचे कर्मकांड जपले पण त्यांना वर्म कळले नाही. त्यामुळे "गावाला फुकट वाटायचे " या भावनेतून निकृष्ट टरबुजे देत असत. त्यांच्याच बिया तिथे पडत. वाण तसे फळ. पुढे पुढे फलसंधारण न करू शकणारी वाण आले नि टरबूज शेती बसली.
 ही एक कथा .आता दुसरी कथा पुढे...

 नागपुरच्या *मॉरिस कॉलेजचे*(आताचे वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्था) प्रथम भारतीय प्राचार्य़  श्री. ताम्हण होते. त्यांची कथा अशी ,की ते  दीक्षित गुरुजी -प्रख्यात वैयाकरणी(व्याकरणज्ञ)- यांचे शिष्य होते. पुढे पारंपारिक वेदाध्ययनाने वृत्ती मिळणार नाही .असे लक्षात आल्यावर ते कलकत्ता येथे शिकण्यासाठी गेले.तेथे एम्ए सुवर्णपदक प्राप्त करून नागपुरला परतले.
त्यावेळी  मॅट्रिक होणे कठीण तेथे हे पदव्युत्तर शिक्षण तेही सुवर्णपदकासह प्राप्त करून आले होते. तत्कालीन समाजात सगळीकडे त्यांचे फार कौतुक झाले होते.
अतिशय आनंदाने ते आपल्या गुरुच्या दर्शनाला गेले. त्यांना अभिमानाने सांगितले की,' मी पहिला अालोय'. गुरुने कौतुकाने विचारले ",होय रे . काय होती परीक्षा?" ह्यांनी सांगितले की दहापैकी आठ प्रश्न लिहायचे होते. मला १०० पैकी ९८ गुण मिळाले ."(हा कलकत्ता विद्यापीठाचा तेव्हाचा उच्चांक होता ) जस्सं दीक्षित गुरुजींनी ऐकले तस्से ते आपल्या प्राचार्य झालेल्या शिष्याला अोरडले ,"अरे पूर्ण लिहिलेही नाही, वर दोन गुण कमी आहेत नि कोण्या गाढवाने तुला उत्तीर्ण केले ?" त्याकाळी उत्तीर्ण म्हणजे १००%  परिपूर्ण अशीच मान्यता होती.


दोन सत्यकथा ............आजची शिक्षणक्षेत्राची  व्यथा ???आज ३५% म्हणजे पास म्हणजेच ६५ % नापास, अशी अवस्था आहे, मग गुणवत्तेची काय कथा ? गुण 'मार्क' करायचे की आत्मसात हे ठरवावे ना प्रत्येकाने !

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

2 comments:

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...