Friday, December 3, 2021

#शब्दचिंतन -सहजोक्त.


शब्दचिंतन

इंग्रजीतील फ्रेंड शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द आहेत.जसे मित्र ,सखा,सवंगडी,वयस्य,जीवलग ,यार ,साथी,

मितवा,सहचर ,,सुहृद ,दोस्त इत्यादी इत्यादी.

पैकी यार-दोस्त हे नक्कीच फारसी-अरबी शब्द .

मितवा हा हिंदी शब्द अर्थात मित पासून मितवा ,गोडवा जास्त ना! मित शब्द नक्कीच मित्र पासून तयार झालाय. 

क्षेत्र,गोत्र,नेत्र ,वक्त्र,श्रोत्र ,स्तोत्र ,गात्र ,पात्र, ,शास्त्र, पवित्र,जनित्र या सगळ्या शब्दांमध्ये 'त्र 'साधनदर्शक प्रत्यय आहे.तसाच मित्र शब्द असावा का?? नेत्र म्हणजे नेण्याचे साधन ,वक्त्र म्हणजे बोलण्याचे साधन मग मित्र म्हणजे मोजण्याचे साधन ?? मनाची मोजमाप करायचे साधन तर नव्हे ??

सखा -सखी ज्याच्याशी सख्य असते.अतिशय जवळचा ,एक दिल -एक जान  असा जो तोच सखा.मित्र अनेक असू शकतात पण सखा दुर्लभच.

सवंगडी ,मराठमोळा शब्द. बालवयाचे ,एकत्र खेळणारे ते सवंगडी. 

वयस्य तर हमखास समवयस्कच हवेत. आबालवृद्ध कोणीही चालेल पण समवयस्कच हवेत.

जीवलग ,ज्याच्यावर जीव जुळलाय ,जीव लागलेला तो जीवलग. 

प्रत्येक मित्र सखा असेलच असे नाही तसेच  सखा  जीवलग होणे ही  विरळच . 

सुहृद् ,,ज्याचे हृदय सुंदर आहे तो .अर्थात जो मनातून आवडतो त्याचं ह्रदय सुंदरच असणार ना !

सहचर म्हणजे जो सोबत असतो . सहचर मित्रच असण्याची गरज नाही .सहकारी जसे सोबत काम करतात तसे सहचर सोबत विचरण करतात.साथ देतो तो साथी. 

 या सर्व शब्दांना समानार्थी म्हणतात.पण हे योग्य नाही.  इतक्या अर्थच्छटा आहेत यात. पण लक्षात कोण घेतो?? इथे माणसाच्या भावच्छटांंना जाणणे दुरापास्त तिथे शब्दच्छटा कोण बघणार??

  दाखवेगिरीच्या ,जाहिरातच्या जमान्यात गरजही कोणाला पडलीय  सख्य जपण्याचे वा जीव लागण्याचे ......

  मग काय मित्र ,सखा,वयस्य,,जीवलग काहीही म्हणाना ! "बोलाचीच कढी बोलाचाच भात " नाही कां??

  © डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, October 8, 2021

#सहजोक्त ....रेणुकामानसपूजा

             ॥ श्रीरेणुका-मानसपूजा ॥

अनादी निर्गुण मूळशक्तिरूपा

प्रकटली मातापुरी जगदंबा

कनवाळु जननी भक्तवत्सला  

माऊली परशुरामाची रेणुका  ॥१॥ 


मातृतीर्थी जावे , शुचिर्भूत व्हावे

मानसार्घ्य देऊन ध्यान करावे

मिटल्या डोळ्यात रूप साठवावे

रेणुकाचिंतनी रममाण व्हावे ॥२॥


माऊली रेणुका गडावर राहे

भक्तांची आतूर वाट ती  पाहे

सिंहासनावरि बैसोनि असते

बाळाच्या कल्याणा आई तत्परते ॥३॥


धूपदीप गंध, सुगंधी उटणे

 हिरवा-चूडा नि मळवट शोभे  

 भरजरी पातळ, कंठी दागीणे

 सौभाग्या ऐश्वर्या किमपी न उणे ॥૪॥

 

 षोडश पक्वान्ने, बहुवीध फळे

 नैवेद्याच्या राशी नि तांबूल वीडे

मंदिर आईचे फुलांनी सजले 

भक्तांच्या आनंदा उधाण आले ॥५॥


स्मरण , चिंतन नि मानसी ध्यान

वादन , नर्तन , आरार्तिक्य गान

आराधना नित्य अर्पुनिया भान

करावी आईची , सांडी अभिमान ॥६॥


ऐसी मानसपूजा नित्य करावी

संसारी वर्तनी सदा सर्वकाळी

करती-करविती तीच माऊली

साक्षीभावे राही भक्तांच्या ठाई  ॥७॥ 


'आई आई आई' ऐसा

नित्य करिते मी धावा 

 तुझ्या कृपेचा ग आता

 बाई  मागते  जोगवा

 तुजवर मी टाकला 

सारा भार जगदंबा

 निजहृदयी मजला

 देई गे ठाव  वत्सला ॥८॥

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.













 

 




 

Monday, August 16, 2021

#सहजोक्त.

 #शब्दचिंतन.

शब्द तयार होतात वर्णांपासून.  नाम , क्रियारूप इत्यादि  प्रकार शब्दांचे असतात. शब्दांना अर्थ असतो. 

दैनिक वापरात अनेक वर्षे असलेला शब्द कसा तयार झाला असेल ?  याचा विचारही मनात येत नाही.  अनेक शब्द मूळधातूपासून  तयार झालेले कृदन्त वगैरे असते.  पण  आपल्याला लक्षातही येत नाही . तसेच माझे झाले. 

काल  एक शास्त्रग्रंथ वाचताना "अध्याय" या शब्दाची व्युत्पत्ती वाचनात आली.  व्युत्पत्ती  वाचली न् डोक्यात लख्ख प्रकाश पडला . 

   अध्याय म्हटलं की  'धार्मिक ग्रंथातील एक भाग '  असं  सामान्यपणे वाटते. 

   'न् अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील तो अध्याय संपला' ,   'न् अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील ते प्रकरण संपले'  अशी वाक्यरचना  मराठीत रूळलेले आढळतात.   इथे   अध्याय आणि प्रकरण हे दोनही शब्द वरपांगी  समान वाटतात.   नाही कां ? 


काव्यप्रकाश या ग्रंथात उल्लास हा शब्द योजला आहे.

रामायण या ग्रंथात कांड असा शब्द योजला आहे. भगवद्गीतेत अध्याय आहेत. मुद्राराक्षसात अंक आहेत. महाभारतात पर्व , अष्टाध्यायीत अधिकरणं आहेत. 


अशा प्रकारे जुन्या ग्रंथात छोट्या-छोट्या भागांना  अध्याय ,  प्रकरण , उल्लास , आह्निक , कांड , अंक , पर्व ,  पाद , अधिकरण  वगैरे  शब्द  वापरलेले आढळतात.  

ग्रंथाचे  'विषयांशानुसार केलेले विभाग' या अर्थाने हे सर्व समान आहेत असे वाटते. पण तसे नक्कीच नाही.  वर उल्लेखलेल्या प्रत्येक शब्दाची खास , वेगळी  व्युत्पत्ती आहे. न् तेव्हाच्या ग्रंथकारांना  न् अभ्यासकांना त्या त्या शब्दाच्या अर्थच्छटेतील बारकावे नक्कीच परिचयाचे होते. म्हणून आपापल्या ग्रंथातील छोट्या, छोट्या भागांना सरसकट एकच नाव न देता ग्रंथविषयाला अनुसरून  नाव दिले आहे. 

"अध्याय" या शब्दाची व्युत्पत्ती अशी , 

"*अधीयतेऽस्मिन्ननेन वाऽर्थविशेष इत्यध्यायः ।* 

 *तेन अधीयते इत्यध्यायः ।*"  

 म्हणजे  ज्यामुळे , ज्याच्याद्वारे  , ज्याच्याने  अध्ययन केले  जाते तो अध्याय. अधि+ इ धातूचा  अर्थ,   स्मरण करणे / विचार करणे असा होतो. याच धातू पासून अध्ययन-अध्यापन  (मराठीत शिकणे ,शिकवणे या अर्थाने रूढ शब्द) हे शब्द प्रचलित आहेत.   स्वतःहून विचार केल्याशिवाय शिकताच येत  नाही म्हणून अध्ययन म्हणजे 'शिकणे'  इतकाच  गुळगुळीत अर्थ घेऊ नये .   स्वतःहून विचार करण्याची प्रक्रिया   किंवा  विचारान्ती स्मरणात ठेवण्याची क्रिया ,  जेव्हा सुरू होते तेव्हाच खरे 'शिकणे' असते.  या अर्थाने अध्ययन-अध्यापन हे शब्द  समजून घ्यावे . 

  तर "अध्याय म्हणजे ज्याच्या मुळे स्वतःहून विचार करण्याची वृत्ती वाढेल असा  ग्रंथ-भाग" ,  हा  अर्थ जास्त सयुक्तिक ठरेल , होय ना ?  न् या पुढे  "अध्याय" शब्दाचा अर्थपूर्ण वापर करता येईल , असं वाटते.  

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

  

 

 

Monday, August 9, 2021

#सहजोक्त.

 


.

न केवलं यो महतोऽपभाषते श्रृणोति तस्मादपि यः स पापभाक् ।

 कालिदास विरचित कुमारसंभंवाच्या पाचव्या अंकातील चौदाव्या श्लोकातील हा उत्तरार्ध आहे. 

 महान लोकांविषयी (सज्जन व संतांविषयी) जो  अपशब्द बोलतो  न् जो (परनिंदा) ऐकतो    , तो देखील पापाचा वाटेकरी होतो. 

ऐकणाराच नसेल तर सांगणारा कोणाला सांगेल ?   चुगल्या करणाऱ्या इतकाच चुगल्या ऐकणारा दोषी असतो. 

समाजातील कलुषितता कमी करायची असेल तर परनिंदा/चुगल्या/विद्वेष पसरवण्यांचे  साधन बनणे सोडावे लागेल. 

कोणी काय बोलावे ? हे आपल्या हातात नाही . पण आपण काय ऐकावे ? न् काय ऐकूच नये , याची निवड आपल्याच हाती ठेवावी.  याकाळात तर हा गुण नक्की अंगी बाणायला हवा , नाही कां ?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, July 27, 2021

#सहजोक्त.

 #शब्दचिंतन .

जेव्हा पासून संवाद-साधनांची बहुलता झाली , तेव्हा पासून विविध प्रांतांतील नावांची देवाण-घेवाण सर्रास होऊ लागली.  काही नावे ही त्या त्या प्रांतांची खास होती , जी आताशा सर्वत्र दिसू लागली. 

भाषा ही प्रवाही न् परिवर्तनशील असते . भाषांमधील व्यक्तिवाचक नामांनाही हेच तत्त्व लागू पडते.  

नीतिन , जतीन , सचीन , देवेन  ही नावे  मूळ मराठी निश्चितच नाहीत.  जुन्या काळात अशी नावे मराठी घरात आढळत नाहीत.  बंगाल-क्रांतीचा प्रभाव , आधुनिक साहित्यांची देवाण-घेवाण यामुळे बंगाली नावे ठेवण्याचे प्रचलन वाढले.  त्यातूनच ही नावे आली असावीत.


बंगाल/पंजाब आदी प्रांतात नावाचा संक्षेप करण्याचा प्रघात आहे. या वृत्तीमुळेच बंडोपाध्यायचे बॅनर्जी , मुखोपाध्यायचे मुखर्जी , चटोपाध्यायचे चॅटर्जी सहज प्रचलित झाले व बंगलने स्वीकारले . 

वरील नावांच्या व्युत्पत्ती बाबतीत दोन मत प्रवाह आहेत.

नीतीन्द्र , जतीन्द्र ,सचीन्द्र ,  देवेन्द्र यां नावांचे संक्षेप होऊन   नीतिन , जतिन  वगैरे नावे तयार झाली असावीत. कारण नावांचे संक्षेप करण्याची बंगालीभाषेची वृत्ती. 

किंवा  ही नावे तद्भव अशी आहेत  कारण  ती मूळ संस्कृतातून घेतली आहेत. 

नीति+ इन्  = नीतीन्  (ज्याच्यात नीती आहे ,असा तो नीतीन् ) याचेच मराठीकरण "नीतीन"  झाले.   अशाच प्रकारे बाकी नावांचेही स्पष्टीकरण  देता येईल.

सचीन या नावाचे विशेष  सांगायला हवे. "सच्"  या मूळ धातूचा अर्थ  to understand clearly, to be related, to be connected.  स्पष्टपणे समजणे , संलग्न असणे , जुळले असणे इत्यादी होतो.  आता या धातूपासून अनेक कृदन्त व तद्धित नामे तयार होतात. "सचिव" हा शब्द याच धातू पासून तयार झाला आहे.  सचिव शब्दाचा मूळ अर्थ समजावून घेणारा , स्पष्ट करून देणारा , जुळलेला  इत्यादी होईल. संस्थेचा वा व्यक्तीचा सचिव हेच करणारा असावा , अशी अपेक्षा चूक नाही.   अतिजुन्या काळी र‍ाजेलोकांचे नर्मसचिव असायचे , म्हणजे राजाच्या नाजुक संबंधांना (थोडक्यात लफड्यांना) मदत करणारा !   आताही मोठ्यांचे सगळेच मोठे , आपल्याला कळेलच असे नाही ! 

"सचीन"    या नावातही "सच्" हा धातू आहे. सचीन म्हणजे समजावून घेणारा , समवयस्क  असा व्यक्ती. 


व्यक्ती जन्माला आली की त्याचे आईवडील नामकरण करतात. पण आपल्या नावाचा नेमका काय अर्थ होतो, हे जाणून घेणे योग्य ठरते.  

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


#सहजोक्त.

 #शब्दचिंतन.

काही काही नावं फारच प्रचलित न् सर्वत्र आढळतात. जसे सोनाली,  मोनाली , रूपाली, स्वर्णाली , मिताली  वगैरे  वगैरे . 

याच नावांचे संक्षिप्त रूप म्हणजे सोनल , मोनल , रूपल    वगैरे .

आता ही नावं कशी तयार झाली असावीत ?   तर त्याचीही गंमतच आहे.


जिजाई , मीराई  किंवा जगदंबा , महदंबा   या नावांमध्ये   जिजा+आई , मीरा+आई , जगद+अंबा , महद् +अंबा  अंबा/आई  असे  आईवाचक शब्द आहेत.   

गुजराथी नावांमध्ये र‍ाधाबेन , कांताबेन , जशोदाबेन  असतेच असते. दक्षिणभारतीय नावांत  चेन्नम्मा ,पेदम्मा  असते . 

मूळ न‍ावांमध्ये मातृवाचक , भगिनीवाचक  शब्द , प्रत्ययासारखा जोडला जातो. आणि   नाव तयार केले जाते.   तसेच पहिल्या परिच्छेदात  दिलेल्या नावांत आहे.

 मूळात "आलिः"   या संस्कृत शब्दाचा अर्थ समवयस्क मैत्रिण . याच "आलिः"  चे मराठीत  "आली" झाले.    आता वरच्या यादीतील नावाचा अर्थ बघा . 

  "हरतालिका"    या व्रतामध्येही हाच  "आली"  शब्द  आला आहे. मैत्रिणीने जिला पळवून (हरण करून) नेले , ती पार्वती.  न् तिने  (मनो-ईप्सित वर )  शंकर प्राप्तिसाठी केलेले व्रत म्हणजे हरतालिकाव्रत! 

   तर पहिल्या परिच्छेदातील सर्वच नावांमध्ये "आली" (मैत्रिण)  वाचक शब्द प्रत्यय म्हणून  लागलेला आहे. सोनाली  हे नाव सोना +आली  , असे तयार झाले.

  मात्र वैशाली , प्रणाली  अशा प्रकारची नावे  वेगळी आहेत.   (त्यावर वेगळे चिंतंन करू) 

  ©डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे. 

   

   

Friday, July 23, 2021

#सहजोक्त.

 ॥ गुरुस्तोत्रम् ॥ 

या स्तोत्राचा अनुवाद केला . सर्वांना सादर भेट 🙏🙏🙏 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।

तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १॥

*अखंडमंडलाकार*

*ज्याने व्यापिले चराचर*।

*पद ते दर्शविले ज्याने* ,

*त्या सद्गुरुला नमन*॥१॥


अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।

चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥

 २॥

 *अज्ञान-तिमिरांधाचे*

  *ज्ञान-योग-शलाकेने*। 

 *चक्षु-उन्मिलेले ज्याने*,

 *त्या सद्गुरुला नमन*॥२॥


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ३॥

*गुरुच ब्रह्मा गुरु च विष्णु*

*गुरुच देव महेश्वर* 

*गुरु हाचि परब्रह्म* ,

*त्या सद्गुरुला नमन*॥३॥


स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित्सचराचरम् ।

तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ४॥

*स्थावर-जंगम-व्यापि*

*जे किंचित चराचरी*।

*पद ते दर्शविले ज्याने* , 

*त्या सद्गुरुला नमन*॥૪॥



चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।

तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ५॥

*चिन्मय व्यापि जे सारे*, 

*त्रैलोक्य सचराचरे*

*पद ते दर्शविले ज्याने* , 

*त्या सद्गुरुला नमन*॥५॥


सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदाम्बुजः ।

वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ६॥

*सर्व-श्रुति-शिरोरत्न*-

*विराजित-पदांबुज*।

*वेदान्तांबुज जो सूर्य* , 

*त्या सद्गुरुला नमन*॥६॥


चैतन्यश्शाश्वतश्शान्तः व्योमातीतो निरञ्जनः ।

बिन्दुनादकलातीतः तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ७॥

*चैतन्य-शाश्वत-शांत*, 

*व्योमातीत निरंजन*

*बिंदु-नाद-कलातीत*, 

*त्या सद्गुरुला नमन*॥७॥


ज्ञानशक्तिसमारूढः तत्त्वमालाविभूषितः ।

भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ८॥

*ज्ञान-शक्ति-समारूढ* *तत्त्वमाला-विभूषित*।

*भुक्ति-मुक्ति-प्रदाता तो*,  

*त्या सद्गुरुला नमन*॥८॥


अनेकजन्मसम्प्राप्तकर्मबन्धविदाहिने ।

आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ९॥

*अनेकजन्म-संप्राप्त*-

*कर्मबंध-विदाहक*

*आत्मज्ञान प्रदाता जो* ,

*त्या सद्गुरुला नमन*॥९॥


शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः ।

गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १०॥

*भवसिंधूचे शोषण* ,

 *सारसंपदेचे ज्ञापन*।

*गुरुचे पादोदक सम्यक्* , 

*त्या सद्गुरुला नमन*॥१०॥





न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः ।

तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ११॥

*न गुरुहून महातत्त्व* , 

 *गुरुहून नाधिक तप* ।

*तत्त्वज्ञानाच्या पार आहे*, 

*त्या सद्गुरुला नमन*॥११॥



मन्नाथः श्रीजगन्नाथः मद्गुरुः श्रीजगद्गुरुः ।

मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १२॥

*मम नाथ जगन्नाथ* , *

*मम गुरु श्रीजगद्गुरु*।

*ममात्म सर्वभूतात्मा* ,

*त्या सद्गुरुला नमन*॥१२ ॥


गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् ।

गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १३॥

*गुरु आदि-अनादिही* , 

*गुरु परमदैवत*

*गुरुविण दुजे नाही* , 

*त्या सद्गुरुला नमन*॥१३॥


त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ १४॥

*तूच माता पिताही तू* 

*तूच बंधु सखाही तू*

*तूच विद्या , द्रविण तू*

*तूच सर्वस्व , मम देवदेवा*॥॥१૪॥


          ॥ इति श्रीगुरुस्तोत्रम् ॥

        ©अनुवादक = डॉ. प्रज्ञा देशपांडे .

Thursday, July 8, 2021

#सहजोक्त.


#शब्दचिंतन.

शब्द म्हणजे अक्षरब्रह्म.  वाक् म्हणजे शब्द नि अर्थ  हे जणु शिवपार्वती सारखे एकात्म आहेत , असे कालिदास म्हणतात.  विशिष्ट वर्णांचा समुच्चय होऊन अर्थपूर्ण  न् श्राव्य शब्द घडतात. 

अभिधान म्हणजे नाव/ नाम. अपत्यजन्मानंतर नामकरण हा मोठाच सोहळा असतो. नाव काय असावे ? काय ठेवावे ? यावर खलबते होतात. 

काही काही नावे  विशिष्ट कालावधीत फारच गाजतात. 

नावांना अर्थ असला पाहिजे , हा सामान्य प्रघात आहे. प्रांता-प्रांतात  नावं ठेवण्याची (नामकरण करण्याची)  वेगवेगळी शैली असते.  एकोणीसाव्या शतकापासून विविध प्रांतातील नावांची देवाण-घेवाण सहज होत आहे , ते आजतागायत. आजकाल तर  विदेशीही नावे तुरळक कां असेना आढळतात. असो. 

  कोणी तरी 'शर्विल' शब्दाचा  अर्थ काय ? असे विचारले.  शब्दांचे चिंतन करणे , हा माझा आवडता छंद. विचारचक्र सुरु झाले. गुगलबाबाने  शर्विल म्हणजे कृष्ण असे सांगून टाकले . कसे ? कां ? त्याला आधार काय ? असल्या फालतू प्रश्नांची उत्तरे द्यायला गुगलबाबा बांधिल नाही ,  " हमने कह दिया , सो कह दिया !"

  घरी असलेला शब्दकोष पाहिला. शब्दकल्पद्रूम चाळला. पण हे नाव काही येईना. 'मृच्छकटिकम्' या संस्कृत नाटकात शर्विकल  नावाचे गौण पात्र चोर असते , असे दाखवले आहे. पण शर्विल न् शर्विलक यात भेद आहे. 

  विचार करता करता सुचले. 

  शर्व म्हणजे विनाशकारी शिव. किंवा भक्तांच्या पापराशी नष्ट करणारा शिव.  

  संस्कृतमध्ये 'इलच्' असा कृदन्त प्रत्यय आहे.  मूळधातूला  कृदन्त प्रत्यय लागतात व नवा शब्द तयार होतो.    अन्  + इलच्  या मूळधातू व कृदन्त प्रत्ययापासून अनिल म्हणजे वायु  हा शब्द तयार होतो. 'अन्'  म्हणजे श्वास घेणे , हलणे .  

  संस्कृतमध्ये नाम किंवा कृदन्ताला विशिष्ट  प्रत्यय लागून  तद्धित म्हणजे भाववाचक नाम तयार होते.   कृदन्त व तद्धित यांचे  प्रत्यय वेगवेगळे असू शकतात.  

  शर्विल ह्या शब्दाचा विचार करताना काही सुचले .  मराठी भाषेच्या स्वतंत्र वृत्तीचे कौतुक वाटले. संस्कृतमधला इलच्  हा कृदन्त प्रत्यय मराठीने घेतला तो ही नामाला लावण्यासाठी!  

  जसे की 

  शर्व + इल = शर्विल , 

  स्वप्न + इल = स्वप्निल

  हर्ष + इल = हर्षिल 

 हे शब्द सकृतदर्शनी संस्कृत वाटतात परंतु ते अजिबात संस्कृत शब्द नाही. ते देश्य , म्हणजे मराठीच्या भाषिक प्रवृत्तीने तयार झालेले खास शब्द आहे.

 असे हे शब्द न् त्यांची तयार होण्याची प्रक्रिया  !

 पुढे  नीतिन , सचिन , जतीन , मिताली , सोनाली  वगैरे  शब्दांचा विचार करू या. 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

 

 













Friday, June 18, 2021

सहजोक्त.

#वेदना .

 जननी आहे सर्जनाची

वेदना , सहना मनाची

सत्य सुंदर मंगलाची

घुसमटीतून मानवाची ॥१॥

बोलणारे बोलो भले ते ;

अंतरीच्या तळतळाटे 

आर्ततेने काळीज फाटे

त्यांना विचारा काय वाटे ?॥२॥

शिल्पे असो वा शब्दचित्रे

कि संस्कृतीची स्मरणपत्रे

मुखवटे ते लपविण्याचे 

 त्या त्या क्षणीच्या वेदनांचे ॥३॥

संवेदना ही ज्यांना कळाली 

 शिल्प-काव्याआड दडली;

 त्यांना  उमजले या जगी

 परिपूर्ण  जीवन मानवी ॥૪॥

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

  

  

 

 

  



Wednesday, May 26, 2021

#सहजोक्त

 #शब्दचिंतन.

मराठी  ही  जुनी , समृद्ध भाषा आहे. तिच्या अनेक बोली आहेत. आजही  महाराष्ट्राच्या छोट्या मोठ्या भागात त्या बोली दैनिक व्यवहारात आहेत. काही काही शब्द त्या विशिष्ट पट्ट्यातच  वापरतात. म्हणून ते खास न् वेगळे असतात.

आमच्या  नागपुरात "सांबार" हा शब्द  सहज व्यवहारात आहे. कोथिंबीर म्हटले तर भाजीवाल्याला कळणार नाही. 

कधीतरी पुण्यातील प्रशिक्षणा दरम्यानचा किस्सा आठवतो. संपूर्ण महाराष्ट्रातील आम्ही संस्कृत शिक्षक एकत्र होतो.  सायंकाळी अनौपचारिक गप्पांमध्ये विविध खाद्यपदार्थांचा विषय रंगला होता. अोघात मी "सांबार" म्हटले. मुंबई+पुण्याच्या मैत्रिणीने  लगेच विचारले की म्हणजे काय ?  मला नेमकं कोथिंबीर सांगायला सुचले नाही. कोणी तरी मग सांगितले. त्यावर तिची प्रतिक्रिया होती की "अगं काय हे ? कसा बर हा शब्द ?"  

तिने  सांबार  शब्दाचे  सांबरशी  ( हरिणासारखा प्राणी) सहसंदर्भ जोडला.  सर्व जण हसत होते. बोलीविशेषांची महिती सहज कळत होती.

संस्कृत शब्दसंग्रहात काही शोधत असताना एक शब्द गवसला. तसा तो शब्द मराठीत  नेहमीच वापरतात.  शब्द आहे , 'सम्भार'  .  केशसंभार , पुष्पसंभार वगैरे नेहमीचे परिचित शब्द आहेत. 

संभार शब्दाचा शब्दकोशीय अर्थ  संभूती , समूह , संग्रह असा आहे. 

 सांबार हे तृणवर्गसदृश  छोटेखानी झुडूप आहे. जमिनीतून वर आल्यावर अनेक कोवळ्या पानाळ शाखांनी संपूर्ण झाड बहरून येते. पान-फुलं-फळे सारे काही गुच्छा सारखे  , संग्रह केल्या सारखे समूहानी एकत्र असतात. 

 कदाचित ही सारी  गुणवैशिष्ट्ये पाहून नागपुरी बोलीत संभार चे सांबार झाले असावे, असे मला वाटते. 

कोथिंबीर शब्दाची व्युत्पत्ती मात्र अजून सापडली नाही.

संभार> सांभार> सांबार असे परिवर्तन होत होत नागपुरी बोलीत सांबार आला असेल की  काय ? 

संभार>संबार  असे हिंदीत झाले असेल ,नाही  काय ? 

नागपुरी बोलीवर हिंदीचाही छाप आहे म्हणून इथे हा शब्द रुळला असेल  , नाही कां ? 

सांबार हा अस्सल तद्भव शब्द आहे. तर अशा प्रकारे एका  बोलीशब्दाचे कुळ-मूळ सापडले न् आनंद झाला. यापुढे न लाजता 'आपल्याच बोलीत' बोलावे   न् शब्दांची व्युत्पत्ती  शोधत रहावी , हे मात्र खरे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, May 11, 2021

#सहजोक्त

 #कोरोना-मुक्ती ~ माझा अनुभव . 

 "कोरोना"  नेमका कसा न् कां होतो , हे कळत नाही. झाल्यावर सर्वत्र  मिळणारी भीतियुक्त अस्पृश्यता असहनीय असते. 

  "स्वस्थ" म्हणजे शरीर-मन निरोगी असणे. ज्या ज्या उपायांनी शरीर स्वस्थ होईल तो करण्याचा आपला स्वभाव असतो तसेच अधिकारही असतो.

' कोरोना झाला' , हे कळल्यावर मी सरकारी मार्गदर्शक सूत्रानुसार  विलगीकरण पाळले. कोरोनावर तसं कोणतंही अौषध नाही , हे सर्वविद् आहे. 

व्हिटॅमिन्स/मिनरल्स केवळ प्रतिकार शक्ती वाढवणारे असतात. 

 लहानपणापासून अपवादात्मक परिस्थितीत अॅलोपॅथी अौषधे घेत असते. वैद्यकीय क्षेत्रात अफाट क्रांती करणा-या वैद्यकतंत्रज्ञानावर माझा ठाम विश्वास आहे.  शस्त्रकिया करण्यासाठी अॅलोपॅथीच उपयुक्त आहे , हे मला माहीत आहे.  शासकीय वैद्यक यंत्रणेवर माझा पक्का विश्वास आहे. कोरोना-महामारी येण्यापूर्वी काही वैद्यकीय चाचण्या/निदान  मेयोतूनच केले आहे आणि ते यशस्वी सुद्धा झाले आहे. 

 परंतु  सद्यपरिस्थितीत सरकारी हॉस्पिटल्स अोव्हरलोडेड आहेत , खाजगी रुग्णायलात कोरोनासाठी अजिबात जायचे नाही , हे निश्चितच केले होते.

 

अॅलोपॅथी अौषधे घेण्यास माझं मन-शरीर नेहमीच नकार देते. 

 माझी स्वाभाविक प्रकृती जाणून योग्य तो उपचार करायचा , असे मी ठरवले.  

 माझा मोठा भाऊ डॉ. मुकुल गुरु हा भारत सरकारच्या आयुष विभागाची मान्यता प्राप्त निसर्गोपचार-तज्ज्ञ आहे. नागपूर जिल्ह्याचे दायित्व त्याच्याकडे आहे. सुदैवाने तो माझ्या घरासमोर रहातो. 

  "योग-निसर्गोपचार" याच चिकित्सापद्धतीने उपचार करायचा हे मी ठरवले. 

  मुकुलदादा दिवसातून तीनदा फोन करून काय करायचे ते सांगायचा न् जराही काही फरक जाणवला तर त्यावर उपाय सांगायचा.  

  

  

  वीस दिवसांच्या या सर्व प्रवासात मला जाणवलेले मुद्दे मी इथे मांडत आहे.


•   प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र न् भिन्न असते. त्यामुळे एकाला ज्याने फायदा होतो , तसेच्या तसे उपचार  आंधळेपणाने , स्वतःच्या मनानी करू नये. योग्य व तज्ज्ञ मार्गदर्शकाच्याच सल्ल्याने उपचार करावे.


• मन व शरीर यांचे अतुट नाते आहे.

 भीतीमुळे , नसलेले रोगही बळावतात. मन निर्भय होण्यासाठी प्रयत्न करावा.

  • विचार-आचार-आहार-विहार यांच्यावर रोगी/ निरोगीपणा अवलंबून आहे.

  • स्वतः भोवती आश्वासक , सकारात्मक व सुखद वातावरण कायम  जपावे.

  • निसर्गाचा एक घटक असलेले मानवी शरीर निसर्गनियमानेच स्वस्थ होऊ शकते.

  • सकस , ताजे , सात्विक न् पौष्टिक अन्न  ; स्वास्थ्यकारक असते. 

  •   आसने व प्राणायाम इतकेच शरीर-शुद्धिक्रिया महत्त्वाच्या आहेत.

  •   शरीर-शुद्धिक्रिया (म्हणजे नेती , धौती, विरेचन , बस्ती वगैरे)   आपल्या मनाने करू नयेत , तज्ज्ञमार्गदर्शकाच्या समोर प्रत्यक्ष शिकून मगच कराव्या.

  •   काय खावे ? कसे खावे ? किती खावे ? याचेही मार्गदर्शन चिकित्सकाकडून  वेळोवेळी घ्यावे.

  

  •   रोग-लक्षणे दिसली की उपचार घ्यायचा न् लक्षणे संपली की उपचार सोडून द्यायचा , असे निसर्गोपचारात चालत नाही.

  •   कोरोनानंतर उद्भवणारे काही लक्षणे टाळण्यासाठी वर्षभर न् नंतर सवय करून आजीवन निसर्गानुरूप दिनचर्य़ा आचरावी. 

  •   आपले शरीर चैतन्यमय न् जिवंत असते. स्वतःहून स्वस्थ होण्याचा त्याचा स्वभाव असतो. आपण केवळ त्याला जरासा आधार द्यावा , परावलंबी करू नये.

  •   प्रत्येक अौषधीचा प्रभाव (इफेक्ट) पडतो म्हणजे कुप्रभावही (साईड-इफेक्ट) पडूच शकतो.   कोणतेही अौषध (आयुर्वेदिक /होमियोपॅथी/अॅलोपॅथी) आपल्याच मनाने  घेऊ नये. 

  • गुगलवर आज कोरोनाविषयक प्रचंड माहिती खुली आहे. पण  योग्य उपचार करण्याचा विवेक त्यात नसतो. म्हणून तज्ज्ञ-चिकित्सकाच्या मार्गदर्शनातच उपचार घ्यावे.

  • कोणत्याही रोगावर शरीर आतून उपचार करतेच करते. बाह्य अौषधी घेतल्यावर , शरीराची प्रतिक्रिया वेगवान होते.  अौषधाला गुण यायला वेळ लागतो . रुग्णाने आधीर होऊ नये. 

  • कोणत्याही रोगामध्ये शरीराचीच नाही तर मनाचीही प्रतिकारशक्ती कमी होत असते. मनाच्या संवर्धनासाठी उत्तम वाचन , अध्यात्मिक वाचन ,  मंत्र/श्लोक/अभंगादी वाचावे /म्हणावे.

  •मानवी शरीर हे अतिशय जटील व गुंतागुंतीचे आहे. शरीरातील सहस्रावधी पेशी चैतन्यमय असतात.  क्षणाक्षणाला त्या बदलत असतात , स्वतःहून स्वतःला दुरुस्त करीत असतात. 

  •योग्य आहार , योग्य व्यायाम , मनासाठी सर्जक उपक्रम , पुरेपूर झोप , योग्य मलविसर्जन या सर्वांच्या मदतीने शरीर-मन नक्की स्वस्थ होते.



अशा प्रकारे माझा कोरोना-परिचर्येचा अनुभव इथे मांडला आहे.

"हाच योग्य  उपचार" असा माझा दावा नाही. पण मला या उपचाराने फायदा झाला , हे नक्की. 

कोरोना काय किंवा  येऊ घातलेले जैवशस्त्रे काय ? ही सर्व दुर्दैवाने  विज्ञानाचीच  काळी बाजू आहे.   माणूस दिवसोंदिवस निसर्गाच्या दूर जातो आहे न् त्यामुळे या काळ्याबाजूला बळी पडत आहे. 

प्रत्येकानेच प्रकृतीला जपत , संस्कृती वाढवावी . विकृतीला थारा देऊ नये.  

जीवमशैलीमध्ये जरासा बदल केल्याने ब-याच विकृतींपासून बचाव होऊ शकतो , हे निश्चित. 

#जिज्ञासुंसाठी डॉ. मुकुल गुरु यांचा वेब अॅड्रेस व फोन नंबर देत आहे.


 www.yogsanskar.org

 

 +919371538645

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 #कोरोना-मुक्ती ~ माझा अनुभव . 

 "कोरोना"  नेमका कसा न् कां होतो , हे कळत नाही. झाल्यावर सर्वत्र  मिळणारी भीतियुक्त अस्पृश्यता असहनीय असते. 

  "स्वस्थ" म्हणजे शरीर-मन निरोगी असणे. ज्या ज्या उपायांनी शरीर स्वस्थ होईल तो करण्याचा आपला स्वभाव असतो तसेच अधिकारही असतो.

' कोरोना झाला' , हे कळल्यावर मी सरकारी मार्गदर्शक सूत्रानुसार  विलगीकरण पाळले. कोरोनावर तसं कोणतंही अौषध नाही , हे सर्वविद् आहे. 

व्हिटॅमिन्स/मिनरल्स केवळ प्रतिकार शक्ती वाढवणारे असतात. 

 लहानपणापासून अपवादात्मक परिस्थितीत अॅलोपॅथी अौषधे घेत असते. वैद्यकीय क्षेत्रात अफाट क्रांती करणा-या वैद्यकतंत्रज्ञानावर माझा ठाम विश्वास आहे.  शस्त्रकिया करण्यासाठी अॅलोपॅथीच उपयुक्त आहे , हे मला माहीत आहे.  शासकीय वैद्यक यंत्रणेवर माझा पक्का विश्वास आहे. कोरोना-महामारी येण्यापूर्वी काही वैद्यकीय चाचण्या/निदान  मेयोतूनच केले आहे आणि ते यशस्वी सुद्धा झाले आहे. 

 परंतु  सद्यपरिस्थितीत सरकारी हॉस्पिटल्स अोव्हरलोडेड आहेत , खाजगी रुग्णायलात कोरोनासाठी अजिबात जायचे नाही , हे निश्चितच केले होते.

 

अॅलोपॅथी अौषधे घेण्यास माझं मन-शरीर नेहमीच नकार देते. 

 माझी स्वाभाविक प्रकृती जाणून योग्य तो उपचार करायचा , असे मी ठरवले.  

 माझा मोठा भाऊ डॉ. मुकुल गुरु हा भारत सरकारच्या आयुष विभागाची मान्यता प्राप्त निसर्गोपचार-तज्ज्ञ आहे. नागपूर जिल्ह्याचे दायित्व त्याच्याकडे आहे. सुदैवाने तो माझ्या घरासमोर रहातो. 

  "योग-निसर्गोपचार" याच चिकित्सापद्धतीने उपचार करायचा हे मी ठरवले. 

  मुकुलदादा दिवसातून तीनदा फोन करून काय करायचे ते सांगायचा न् जराही काही फरक जाणवला तर त्यावर उपाय सांगायचा.  

  

  

  वीस दिवसांच्या या सर्व प्रवासात मला जाणवलेले मुद्दे मी इथे मांडत आहे.


•   प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र न् भिन्न असते. त्यामुळे एकाला ज्याने फायदा होतो , तसेच्या तसे उपचार  आंधळेपणाने , स्वतःच्या मनानी करू नये. योग्य व तज्ज्ञ मार्गदर्शकाच्याच सल्ल्याने उपचार करावे.


• मन व शरीर यांचे अतुट नाते आहे.

 भीतीमुळे , नसलेले रोगही बळावतात. मन निर्भय होण्यासाठी प्रयत्न करावा.

  • विचार-आचार-आहार-विहार यांच्यावर रोगी/ निरोगीपणा अवलंबून आहे.

  • स्वतः भोवती आश्वासक , सकारात्मक व सुखद वातावरण कायम  जपावे.

  • निसर्गाचा एक घटक असलेले मानवी शरीर निसर्गनियमानेच स्वस्थ होऊ शकते.

  • सकस , ताजे , सात्विक न् पौष्टिक अन्न  ; स्वास्थ्यकारक असते. 

  •   आसने व प्राणायाम इतकेच शरीर-शुद्धिक्रिया महत्त्वाच्या आहेत.

  •   शरीर-शुद्धिक्रिया (म्हणजे नेती , धौती, विरेचन , बस्ती वगैरे)   आपल्या मनाने करू नयेत , तज्ज्ञमार्गदर्शकाच्या समोर प्रत्यक्ष शिकून मगच कराव्या.

  •   काय खावे ? कसे खावे ? किती खावे ? याचेही मार्गदर्शन चिकित्सकाकडून  वेळोवेळी घ्यावे.

  

  •   रोग-लक्षणे दिसली की उपचार घ्यायचा न् लक्षणे संपली की उपचार सोडून द्यायचा , असे निसर्गोपचारात चालत नाही.

  •   कोरोनानंतर उद्भवणारे काही लक्षणे टाळण्यासाठी वर्षभर न् नंतर सवय करून आजीवन निसर्गानुरूप दिनचर्य़ा आचरावी. 

  •   आपले शरीर चैतन्यमय न् जिवंत असते. स्वतःहून स्वस्थ होण्याचा त्याचा स्वभाव असतो. आपण केवळ त्याला जरासा आधार द्यावा , परावलंबी करू नये.

  •   प्रत्येक अौषधीचा प्रभाव (इफेक्ट) पडतो म्हणजे कुप्रभावही (साईड-इफेक्ट) पडूच शकतो.   कोणतेही अौषध (आयुर्वेदिक /होमियोपॅथी/अॅलोपॅथी) आपल्याच मनाने  घेऊ नये. 

  • गुगलवर आज कोरोनाविषयक प्रचंड माहिती खुली आहे. पण  योग्य उपचार करण्याचा विवेक त्यात नसतो. म्हणून तज्ज्ञ-चिकित्सकाच्या मार्गदर्शनातच उपचार घ्यावे.

  • कोणत्याही रोगावर शरीर आतून उपचार करतेच करते. बाह्य अौषधी घेतल्यावर , शरीराची प्रतिक्रिया वेगवान होते.  अौषधाला गुण यायला वेळ लागतो . रुग्णाने आधीर होऊ नये. 

  • कोणत्याही रोगामध्ये शरीराचीच नाही तर मनाचीही प्रतिकारशक्ती कमी होत असते. मनाच्या संवर्धनासाठी उत्तम वाचन , अध्यात्मिक वाचन ,  मंत्र/श्लोक/अभंगादी वाचावे /म्हणावे.

  •मानवी शरीर हे अतिशय जटील व गुंतागुंतीचे आहे. शरीरातील सहस्रावधी पेशी चैतन्यमय असतात.  क्षणाक्षणाला त्या बदलत असतात , स्वतःहून स्वतःला दुरुस्त करीत असतात. 

  •योग्य आहार , योग्य व्यायाम , मनासाठी सर्जक उपक्रम , पुरेपूर झोप , योग्य मलविसर्जन या सर्वांच्या मदतीने शरीर-मन नक्की स्वस्थ होते.



अशा प्रकारे माझा कोरोना-परिचर्येचा अनुभव इथे मांडला आहे.

"हाच योग्य  उपचार" असा माझा दावा नाही. पण मला या उपचाराने फायदा झाला , हे नक्की. 

कोरोना काय किंवा  येऊ घातलेले जैवशस्त्रे काय ? ही सर्व दुर्दैवाने  विज्ञानाचीच  काळी बाजू आहे.   माणूस दिवसोंदिवस निसर्गाच्या दूर जातो आहे न् त्यामुळे या काळ्याबाजूला बळी पडत आहे. 

प्रत्येकानेच प्रकृतीला जपत , संस्कृती वाढवावी . विकृतीला थारा देऊ नये.  

जीवमशैलीमध्ये जरासा बदल केल्याने ब-याच विकृतींपासून बचाव होऊ शकतो , हे निश्चित. 

#जिज्ञासुंसाठी डॉ. मुकुल गुरु यांचा वेब अॅड्रेस व फोन नंबर देत आहे.


 www.yogsanskar.org

 

 +919371538645

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, April 20, 2021

#सहजोक्त- भाग १०

 #वज्रपंजरकवच .


धार्मिक वाङ्मय श्रद्धावन्तांच्या मनाला भक्कम आधार देतात. "मन चंगा तो करौटी में गंगा" असं जे म्हटल्या जाते ते योग्यच आहे.  मनाचे संकल्प-विकल्प बरेच उलथापलथ करतात ; मानवी-समाजात. तर असे हे 'अचपळ' मन नेहमी सकारात्मक, सर्जनशील व क्रियाशील असावे , यासाठी धार्मिक वाङ्मय मदत करतात.  कोणतेही धार्मिकवाङ्मय श्रद्धेने वाचावे  , पण पूर्णपणे समजावून घेतल्यावर. या वाङ्मयाचे साहित्यिक मूल्य तर श्रेष्ठ असतेच शिवाय संपन्न आशय हे त्यांचे विशिष्ट .  श्रद्धाळुंना त्यातून ईप्सितपूर्तीचा आनंद मिळतो.

गुढीपाडव्यापासून वज्रपंजर नामक कवचाचे यथाशक्ती स्पष्टीकरण केले. आज रामनवमीला या उपक्रमाची इतिश्री करतेय. 

रामरक्षेतील हे अकरा श्लोक महत्त्वाचे आहेत.  माझ्या क्षमतेनुसार या श्लोकांतील अर्थ , शब्दसौंदर्य , पदलालित्य उलगडून सांगितले आहेच. 

आजच्या भागात , या कवचाचा आणखीन एक सर्जक उपयोग सांगणार आहे.

दरवर्षी घरातील सर्वांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रमाण  आजकाल फारच वाढले आहे. पहिला , सोळावा , पन्नाशी , साठी , पंच्याहत्तरावी , शंभरी वगैरे विशेष साजरी करण्यात येते. 'पश्चिमाभिमुख' मानसिकतेने केक आणून , तितक्या मेणबत्त्या लावून जन्मदिन साजरा करण्याचा प्रघात जनमान्य झाला आहे. 

परिवार-सदस्यांच्या वाढदिवसाचे कौटुंबिक  साजरीकरण नक्कीच करावे . पण अस्सल भारतीय पद्धतीने. कसे ? ते सांगते.

ज्याचा जन्मदिवस साजरा करायचा आहे , त्याला आरामशीर आसनावर (चौरंग , स्टूल , खुर्ची वगैरे) बसवावे. ती व्यक्ती जितक्या वर्षांची झाली , तितक्या संख्येत नाणे (१,२,५,१० वगैरे)  तबकात घ्यावेत. त्या नाण्यांवर तुपाच्या फुलवाती लावाव्यात . त्या उजळवून   अोवाळणी करावी. अोवाळताना प्रत्येकाने वज्रपंजर कवच सामुदायिक , उच्चरवाने म्हणावे. त्याचा जन्मदिन आहे , त्याने स्तोत्रात सांगितलेल्या  प्रमाणे प्रत्येक अवयवावर हात ठेवत , त्या त्या अवयवाला श्रीराम स्वस्थ व नीरोगी करीत आहे , अशी भावना ठेवत  , उच्चारण  करावे. सर्वांनी अक्षवाण केले , की तबक  देवासमोर ठेवावे. दिवे शांत झाले  , नाणी थंड झालीत की नाणी साबणाच्या पाण्यात स्वच्छ धुवून सत्पात्री गरजूला दान करावी. 

आजकाल जन्मदिना संबंधी जी काही गाणी आहेत , त्याहून किती तरी जास्त आशय व सद्भावना या वज्रपंजर कवचातून व्यक्त होतात. तर आता  यापुढे जन्मदिवसाचा खराखुरा सोहळा साजरा करू या आणि त्या उत्सवमूर्तीचे मांगल्य चिंतू या .

भर्जनं भवबीजानां

अर्जनं सुखसंपदाम्।

तर्जनं यमदूतानां

रामरामेति गर्जनम् ॥

(जन्ममृत्यूचा फेरा संपवण्यासाठी) भवबीजाला भाजून काढताना ,   ऐहिक जीवन जगताना सुखसंपदा कमावीत असताना,   (र‍ामभक्तांसाठी साक्षात विष्णुदूत येतील , म्हणून)  

 यमदूतांची निर्भत्सना करताना  ,'राम-राम'  अशी गर्जना करावी.  

 दहाही भागांची ही मालिका तुम्हाला उपयुक्त ठरून आवडली असावी , ही सदिच्छा व्यक्त करून विराम घेते. 

🙏 जय श्रीराम 🙏

 © डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, April 19, 2021

#सहजोक्त~ भाग ९

 #सहजोक्त ~ भाग ९ 

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।

यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥10॥ 

वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥11॥  

एकूण अकरा श्लोकांचे कवच आहे. हे त्यातील शेवटचे दोन श्लोक .

जगज्जैतृ  म्हणजे जगावर  विजय मिळविणारा . जगज्जैत्रा हे रामनामक मंत्राचे विशेषण आहे.   तर या मंत्राने सर्व बाजूंनी रक्षण होते. जो हे कवच मुखात धारण करेल त्याच्या हातात सर्व सिद्धी राहतील.    भारतीय मान्यते नुसार आठ सिद्धी आहेत . त्या पुढील श्लोकात दिल्या आहेत. 

  अणिमा महिमा चैव लघिमा गरिमा तथा | प्राप्तिः प्राकाम्यमीशित्वं वशित्वं चाष्ट सिद्धयः || 

  तर असे हे वज्रपंजर नावाचे कवच जो कोणी मानव स्मरेल त्याला अव्याहत (म्हणजे अडचणी न येता अखंडित)  विजय , सर्वत्र मिळेल.  

  उद्या या मालिकेचा शेवटचा भाग असेल.

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Sunday, April 18, 2021

#सहजोक्त ~ भाग ८

 #सहजोक्त ~ भाग ८ .


पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।

न दृष्टुमति शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥8॥

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥9॥ 

 कवचाची सविस्तर फलश्रुती या दोन श्लोकात सांगितली आहे. 

 पाताळ , भूतळ , आकाश या तीनही ठिकाणी विचरण करणारे  , छद्मवेषात वावरणारे , म्हणजे खरे स्वरूप लपवून  या तीनही ठिकाणी हिंडणारे जीव-जंतू , जे आपल्या डोळ्यांनी दिसतही नाहीत. अशा सर्वांपासून  रक्षण होते. 

  रोगराई पसरवणारे जंतुंपासून रक्षण होईल. 

  श्रद्धा फारच महत्त्वाची आहे. 

 राम , रामचंद्र , रामभद्र  वगैरे कोणत्याही नावाचे स्मरण करा , ज्यामुळे व्यक्ती पापात गुंतत नाही. तसेच विहित उपभोग घेत मुक्ती लाभते. 

 रामाचे नामस्मरण सतत करीत र‍हीले तर मनात वाईट विचार येणारच नाहीत. हे खरे आहे. 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, April 17, 2021

#सहजोक्त- भाग ७


  

 आजकाल ग्राहक-जागृतीमुळे मालावर/पदार्थांवर/अौषधांवर  त्यातील घटक असेच सविस्तर  लिहिले असतात. मात्रा सांगितली असते , निर्माण करण्याची तारीख , कंपनी वगैरेंचा उल्लेख असतो.

  जुन्याकाळातील धार्मिक वाङ्मयात  हा मंत्र कोणी रचला ? मंत्राची देवता कोण ?  मंत्राचा रक्षक कोण ? छंद कोणता ? मंत्राचा विनियोग कोणी करावा ? मंत्राने काय काय फायदे होतात ? चुकीचा झाल्यास काय दोष होतात ? वगैरे सविस्तर दिले असते.

  कालपर्यंत संपूर्ण शरीराच्या अवयवांचे नाव घेत रक्षण करणारा विशिष्ट र‍ाम यांचे वर्णन झाले.

  आता या कवचाची फलश्रुती म्हणजे कवचाने काय फायदा होतो ते वर्णिलेले श्लोक इथून पुढे पाहू या.

  

  एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥7॥ 


ही रामाच्या शक्तीने युक्त  असलेली रक्षा (रामरक्षा)  जो पुण्यवान (सुकृती) व्यक्ती वाचेल  , तो  दीर्घायुषी , सुखी , पुत्रांनी युक्त , नेहमी विजयी न्  विनयशील असा होईल , असा या श्लोकाचा अर्थ आहे.

सुखी हा शब्द मोठा छान आहे. ज्याच्यात सुख अन्तर्भूत आहे तो सुखी. सुखाने युक्त तो सुखी.   ख म्हणजे अवकाश.  अवकाश म्हणजे व्यक्तीच्या अंतर्बाह्य अवती-भवती असलेली  मोकळी जागा.   हे अवकाश जेव्हा सुष्ठु म्हणजे चांगले असते तेव्हा सुख लाभते.  म्हणजे सुख ही व्यष्टिसंकल्पना नाही . व्यक्ती भोवतीची समष्टी चांगली असली की सुख लाभते. 

र‍ामरक्षेने सुख लाभते , ते केवळ वाचकालाच नाही तर त्या वाचकाच्या अवतीभवती असणा-यालाही.

विनयी  म्हणजे  नम्र , विद्याविभूषित , आत्मनिर्भर म्हणजे एकूणात परिपूर्ण विकसित व्यक्तिमत्व असलेला . 

तर रामरक्षा कवचाने हे ठळक फायदे होतात. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, April 16, 2021

#सहजोक्त

             ॥ श्रीरेणुका-मानसपूजा ॥

अनादी निर्गुण मूळशक्तिरूपा

प्रकटली मातापुरी जगदंबा

कनवाळु जननी भक्तवत्सला  

माऊली परशुरामाची रेणुका  ॥१॥ 


मातृतीर्थी जावे , शुचिर्भूत व्हावे

मानसार्घ्य देऊन ध्यान करावे

मिटल्या डोळ्यात रूप साठवावे

रेणुकाचिंतनी रममाण व्हावे ॥२॥


माऊली रेणुका गडावर राहे

भक्तांची आतूर वाट ती  पाहे

सिंहासनावरि बैसोनि असते

बाळाच्या कल्याणा आई तत्परते ॥३॥


धूपदीप गंध, सुगंधी उटणे

 हिरवा-चूडा नि मळवट शोभे  

 भरजरी पातळ, कंठी दागीणे

 सौभाग्या ऐश्वर्या किमपी न उणे ॥૪॥

 

 षोडश पक्वान्ने, बहुवीध फळे

 नैवेद्याच्या राशी नि तांबूल वीडे

मंदिर आईचे फुलांनी सजले 

भक्तांच्या आनंदा उधाण आले ॥५॥


स्मरण , चिंतन नि मानसी ध्यान

वादन , नर्तन , आरार्तिक्य गान

आराधना नित्य अर्पुनिया भान

करावी आईची , सांडी अभिमान ॥६॥


ऐसी मानसपूजा नित्य करावी

संसारी वर्तनी सदा सर्वकाळी

करती-करविती तीच माऊली

साक्षीभावे राही भक्तांच्या ठाई  ॥७॥ 


'आई आई आई' ऐसा

नित्य करिते मी धावा 

 तुझ्या कृपेचा ग आता

 बाई  मागते  जोगवा

 तुजवर मी टाकला 

सारा भार जगदंबा

 निजहृदयी मजला

 देई गे ठाव  वत्सला ॥८॥

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.













 

 




 

#सहजोक्त~ भाग ६

 #सहजोक्त~ भाग ६


जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥6॥

 भारत न् रावणाची लंका यांच्या मध्ये विशाल समुद्र होता. ज्यावर वानरांच्या सहायाने रामाने सेतू बांधला.  जणु लंकेचे द्वीप सेतूने सांधले.  आणि लंकेवर विजय मिळविला.  शरीराचा भार उचलणारे पाय . पायांना नीट हालचालीला आवश्यक असा सांधा म्हणजे दोन्ही गुडघे. तर अशा या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण सेतु रचणारा राम करतो.

 पोटरीला संस्कृतमध्ये जंघा म्हटले आहे.   

दहा तोंडांच्या रावणाचा नाश करणारा राम ,  माझ्या पोट-यांचे रक्षण करो.

श्रीराम हे साक्षात विष्णुचे अवतार.त्यांच्या पायांची सेवा लक्ष्मी करते. लंकेवर विजय मिळविल्यावर  ते राज्य न् सर्वच ऐश्वर्य बिभिषणाला देऊन श्रीराम अयोध्येला परतले.  बिभिषणाला सर्व ऐश्वर्य देणारे श्रीराम , माझ्या पाऊलांचे रक्षण करो.  

आणि अशा प्रकारच्या सर्वच विशेषणांसह असलेला श्रीराम माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करो. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Thursday, April 15, 2021

#सहजोक्त~ भाग ५.

 



सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥5॥

सुग्रीव वानर  हा  रामाचा भक्त होता. सुंदर मान असलेला तो सुग्रीव. डोके व धड यांना जोडणारा जरासा उंच व निमुळता , सडपातळ भाग म्हणजे मान . मान जशी सडपातळच उत्तम व तेच स्वास्थ्याचे लक्षण होय.  तशीच कंबरही कंबरच असावी कमरा नको.  कटी म्हणजे कंबर .   कंबरेचा आकार जसजसा  बेढब होत जातो तसं तसं स्वास्थ्य अवघड होत जाते. कंबरेचे (म्हणजे स्वस्थयुक्त शरीरातील कटीचे) रक्षण सुग्रीवाचा ईश , श्रीराम यांनी करावे. 

सक्थि म्हणजे नितंबांच्या खाली जोडून असलेला सांध्यापासून तर गुडघ्याच्या मागच्या बाजू पर्यंतचा पायांचा भाग .  डोक्यानंतर सर्वात जास्त भार पेलणारा भाग हाच असतो. रामाच्या वानरसेनेतही अतिशय जबाबदारीचे काम हनुमंताने सहज पार पाडले होते. तर शरीराच्या हा भागाचे रक्षण हनुमानाच्या प्रभुरामाने करावे. 

उरु म्हणजे गुडघ्याच्या वरचा पायांचा समोरचा भाग . (मागचा भाग सक्थीमध्ये येतो) मराठीत आपण मांडी म्हणतो . रक्ष म्हणजे राक्षसांचा विनाश करणारा रघुकुलभूषण राम , माझ्या मांड्यांचे रक्षण करो. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, April 14, 2021

#सहजोक्त~ भाग ૪



करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु  खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥4॥ 

 पाणिग्रहण  हा  सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. विवाहसमयी वधुपिता स्वकन्येचा हात वराच्या हाती देतो, याला पाणिग्रहण म्हणतात.  धर्म-अर्थ-कामादी बाबींमध्ये एकमेकांना पूरक असणारी साताजन्माची मैत्री , जणु जीवा-शिवाची गाठ ठरावी  ; याचे प्रतीक म्हणजे "पाणिग्रहण".  

 श्रीरामाने जनकनंदिनी सीतेचे पाणिग्रहण केले होते. सीतेच्या मुक्ततेसाठीच लंकेवर विजय मिळविला होता. राम-सीतेचे अभिन्नत्व सर्वच भारतीयांना मान्य आहे. म्हणूनच  श्रीरामाला सीताराम, सियाराम म्हटल्या जाते.   सक्षमपणे जबाबदारी निभवणारे  सियाराम माझ्या हाताचे रक्षण करो.

जानकी-स्वयंवराची अटच होती की जमदग्निपुत्र परशुरामाने जनकराजा जवळ ठेवलेले शिवधनुष्य जो उचलून धरेल त्याला जानकी माळ घालेल. श्रीराम ते शिवधनु तर उचलतात.  प्रत्यंचेला हात लावत असता नेमके  ते  तुटते. त्यामुळे कोपिष्ट असे परशुराम भयंकर क्रोधित होतात. इतक्या कोपलेल्या ऋषिश्रेष्ठांना संतुष्ट करण्याचे कठिण कार्य श्रीराम सहज करतात. मन समजून घेणे , रागवलेल्या मनाला शांत करणे , दुस-याच्या मनात स्वतःविषयी ममत्व न् आनंद निर्माण करणे "रामा"ला सहज जमत होते. तर अशा रामाने माझ्या हृदयाचे रक्षण करावे.

मध्य म्हणजे शरीराचा मधला पोकळ भाग. खर-दूषण नावाचे रावणाचे सावत्रभाऊ यांचा नाश रामाने केला होता. म्हणून राम हा  "खरध्वंसी" आहेच. "खर" या शब्दाचा अजून एक अर्थ तीक्ष्ण , उग्र  , तीव्र असाही आहे.  पोट , आतडी आदी भागात कोणतीही तीव्रता , उग्रता , तीक्ष्णता नकोच नको. तर माझ्या मध्यभागातील तीव्रतेला ध्वस्त , नष्ट करण्याचे काम रामाने करावे.  

 आईच्या पोटात असताना प्रत्येकाला नाभीद्वारे जीवन लाभत असते. नाभी हा प्रत्येक मानवाला त्याच्या आईशी जुळलेला असण्याची आठवण करून देणारा अवयव आहे. जन्मापूर्वीचे  मातृ-उदरातील जीवन व जन्मोत्तर बाहेरील जीवन याची सांगड दर्शवणारा अवयव नाभीच होय. 

  साक्षात ब्रह्मदेवाचा पुत्र , श्रीरामाचा परमभक्त तसेच परमज्ञानी , अस्वलराज जाम्बवान यांना  श्रीरामाशिवाय दुसरा कोणी आश्रय नव्हता.    शिवाय त्रेतायुगातील रामभक्त जाम्बवान द्वापरयुगात कृष्णाला स्वकन्या देतो. दोन युगात देवतेच्या भक्तीची अखंडता दर्शवणारा जाम्बवान हा एकमेव भक्त  आहे. एकीकडे  स्वतःच्या भक्तीने दोन युगाची सांगड घालणारा जाम्बवान , तर दोन जीवनाची सांगड दर्शवणारी नाभी . माझ्या नाभीचे रक्षण  जाम्बदाश्रय रामाने करावे. 

  वज्रपंजर कवचातील विशेषणांचे जितके सखोल चिंतन करावे तितके ते अधिकाधिक अर्थ खुलवत जाते , हे मात्र खरे. 

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.






Tuesday, April 13, 2021

#सहजोक्त~भाग ३

 #सहजोक्त ~ भाग ३

काल दोन श्लोक झाले होते. आता पुढे पाहू. 

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥3॥


जीभ , जिचे अस्तित्व वैखरी प्रकटीकरणासाठी  महत्त्त्वाचे आहे.  विद्यांचा संग्रह असलेला राम माझ्या जिभेचे रक्षण करो. 'जिभेवर सरस्वती नांदते' , असं हुशार व्यक्तीचे वर्णन करताना म्हणतात.

 कंठ , ज्यातून चारही प्रकारची वाणी उत्पन्न होतात. परा ,मध्यमा , पश्यन्ती व वैखरी या त्या चार वाणी आहेत.  भरत हा कैकेयीपुत्र होता. कैकेयीच्या कृतीला त्याची सहमती तर नव्हतीच.  उलट तो तिला शिक्षा देऊ इच्छत होता. केवळ रामच्या आज्ञेने भरताने कैकेयीला सन्मानाने सांभाळले . मनात द्वेष , लोभ वगैरे काहीही न ठेवता केवळ कर्तव्यभावनेनी त्याने सांभाळ केला.  नको त्या विकारांना कंठातच लुप्त करावे , चारही वाचांपर्यंत येऊच देऊ नये. म्हणून गळ्याचे रक्षण भरताकडून वंदिल्या जाणारा राम करतो. 

 स्कंध म्हणजे खांदे. भार सावरायला सहायभूत स्कंध असतात. खांदे मजबूत असेल तर कठीणातील कठीण जबाबदारी लीलया पेलता येते. राक्षसांवर यशस्वी विजय मिळविण्यासाठी दिव्य-आयुध मिळाले होते रामाला. रामाचे खांदे ते दिव्यत्व पेलण्यास समर्थ होते. दिव्यत्वाने दबून , भारावून जाणारे नव्हते. उलट स्वतःच्या आंतरिक क्षमतांनी दिव्यत्वाला  बळकट करणारे होते.  दिव्य-आयुधांचा उपयोग उठसूट करणारा हा नाही ,  हे माहीत असल्यामुळे तर रामाला दिव्यायुध मिळाले.  प्रत्येकाला जबाबदारी असते , तसेच ती पार पाडायची आंतरिक क्षमतासुद्धा असते. तर जबाबदारीचे प्रतीक म्हणजे खांदे यांचे रक्षण दिव्य-आयुधांसह असलेला राम करो. 

 भुजा म्हणजे बाहु . समर्थ खांद्यांना जोड भक्कम भुजांची असते.  भग्न+ईश+कार्मुक म्हणजे शंकराचे धनुष्य ज्याने सहज तोडले ते रामाचे बाहू  माझ्या बाहुंचे रक्षण करोत. 

 🙏श्रीरामार्पणमस्तु🙏

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे










Monday, April 12, 2021

#सहजोक्त भाग २



नमस्कार . आज गुढीपाडवा. नवसंवत्सराचा पहिल‍ा दिवस.

आजपासून चैत्र-नवरात्र आरंभ होते. 

रामरक्षेतील वज्रपंजर नामक कवचातील काही श्लोकांचे  आजपासून नवरात्रभर  यथामती निरूपण  करणार आहे.  वज्रपंजरकवच मूळात अकरा श्लोकांचे आहे. त्यातील पहिला श्लोकार्ध हा असा 

*रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌* ।

सर्व प्रकारच्या पापांची शत्रू  असलेली तसेच सर्व इच्छा पूर्ण करून देणारी अशी रामरक्षा ; विद्वानांनी म्हणायलाच हवी.   ही अपेक्षा व्यक्त केल्यावर आता  डोक्यापासून ते पायापर्यंत एकेक अवयवाचे नाव घेत , रामानी त्या अवयवाचे रक्षण करावे असे पुढच्या साडेपाच अोळीत मांडले आहे. अवयवाचे नाव व रक्षण करण्यासाठी धावा करताना रामाचे एकेक विशेषण घेतले आहे. 

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥1॥

माझ्या  डोक्याचे /मस्तकाचे/ शिराचे रक्षण राघव म्हणजे रघुकुलात जन्मलेल्या रामाने करावे. भाल म्हणजे कपाळ. त्याचे रक्षण दशरथात्मज म्हणजे दशरथाचा पुत्र राम याने  करावे.


 मस्तक/शिर म्हणजे शरीराचे उत्तम अंग .  चांगले काही घडले की शिर अभिमानाने ताठ होते तर  चुकीचं  घडलं की शिर शरमेने झुकते.  रामाचा वंश  सूर्यवंशी इक्ष्वाकु असा होता. या वंशात अनेकानेक नरोत्तम र‍ाजे/महाराजे निपजले. रघुराजा ही याच वंशाचे न् रामाचे पणजोबा  होते. त्यांच्या अफाट पराक्रमाने इक्ष्वाकु वंश पुढे रघुवंश ठरला न् पुढच्या पिढ्या रघुची संतती म्हणजे र‍ाघव ठरली.  शरीरात जसे मस्तक महत्त्वाचे न् प्रतिष्ठित तसेच इक्ष्वाकुंमध्ये राघव राम ! म्हणून  शिरो मे राघवः पातु । 

भालप्रदेश म्हणजे ललाम म्हणजे कपाळ.  "काय लिहून ठेवले आहे भाळी , कळत नाही ? , असं म्हणतात. भाळ म्हणजे कपाळ ज्यावर जन्मल्याच्या पाचव्या दिवशी सटवाई नशीब लिहिते , असे मानतात.  कपाळ जसा दैवदर्शक म्हणजे भाग्य दर्शवणारा अवयव आहे तसाच शोभा वाढवणाराही भाग आहे. म्हणून तर कोणी सर्वोत्तम कामगिरी करणारा "ललामभूत" ठरतो.  तर हा अवयव नेमका दशरथात्मजाने राखावा.  कारण दशरथपुत्र र‍ाम चारही पुत्रांमध्ये स्वतःच्या त्यागादी आदर्श वागणुकीतून  ललामभूत ठरला .


कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥2॥

दृष्टी मग ती आंतरिक असो वा बाह्य , तिचे रक्षण कौसल्यापुत्र रामाने  करावे .  तर श्रुती म्हणजे कान व श्रुती म्हणजे ज्ञान. कानांचे रक्षण विश्वामित्रांचा प्रिय शिष्य रामाने करावे.   सुयोग्य विशेषणांचे चयन कसे असावे ? याचा वस्तुपाठ ह्या   साडेपाच अोळी आहेत.

 प्रत्येकाने आईच्या डोळ्याने जगाकडे पाहिले तर जग कधीच वाईट नसेल.   म्हणूनच तर डोळ्यांचे रक्षण कौसल्यापुत्र रामाने करावे. विश्वामित्रांसारखा शिस्तबद्ध , ज्ञानी , वात्सल्यनिधी असूनही कर्तव्यकठोर असा गुरु लाभणं भाग्यातच असावं लागतं. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कसब अशा गुरुमुळे अनायास लाभते.  माहिती गोळा करण्याचा प्राथमिक स्रोत म्हणजे ज्ञानाचे प्रवेशद्वार  कान होत. म्हणून कानांचे रक्षण विश्वामित्राचा प्रियशिष्य र‍ाम करतो. 

 सुकुमार असे चारही र‍ाजकुमार  उपनयन संस्कारानंतर सुखासीन व सुरक्षित राजेशाही जीवन सोडून गुरुगृही आश्रमात गेले. तिथे गुरुच्या आज्ञेवरून  तपाचरणात विघ्न आणणा-या राक्षसांना  ठार केले.  श्वास ज्या अवयवाने घेतात ते घ्राण म्हणजे नाक. आश्रमसंस्कृतीचा श्वास म्हणजे यज्ञयागज्ञानदानादी कार्य . हे कार्य ज्या रामामुळे सुरळीत झाले तो मखत्राता (यज्ञ-रक्षक)  आमच्या नाकाचे रक्षण करो.   कौसल्या महाराणी होती तर कैकेयी पट्टराणी. सुमित्रा मात्र अनसूय सेवेकरी व ममतामूर्ती होती. पतीच्या नजरेत ,घरात-राज्यात कुठेही प्रथमप्राधान्य न मिळताही स्वतःला लाचार न करून घेता , सतत समाधानी रहाण्याचं व्रत सोप नाही. दोन्ही मुलगे दोन्ही सवतींच्या मुलांसह अतिशय वेगवेगळ्या परिस्थितीत असतानाही , चिंताक्रांत न होता संयमाने स्वतःसह आजुबाजूच्यांना धीर देण्याचे कठीण कार्य सुमित्रा करीत होती.  सामान्यांचा  चेहरा भोगलेले सुखदुःख दाखवून देतो , सुमित्रेचा नाही.  तर असा चेहरा सुमित्राचा लाडका पुत्र राम रक्षण करतो. 

॥ इति द्वितीयो भागः श्रीरामार्पणमस्तु॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



Sunday, April 11, 2021

#सहजोक्त -रामनवरात्र

 


आज प्रतिपदा लागते आहे. पण चैत्राची सुरुवात उद्यापासून आहे. 

चैत्रमास , त्यातील शुद्ध नवमीला श्रीरामाचा जन्म झाला. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून र‍ामनवरात्र असते. 

काही स्तोत्र , मंत्र , अभंग , कवने न् स्तवने नित्यपाठांतरात असायला हवी. त्यातील मुख्य असे ,'रामरक्षा स्तोत्र' होय.

आमच्या घरी आमच्या लहानपणापासून 

घरातील वडीलधारी मंडळी सायंकाळी उच्च आवाजात देवासमोर काही निवडक स्तोत्र म्हणत असत. ती ऐकून ऐकून विनासायास मुखोद्गत झाली. सासरी आल्यावर वेगळे घर , वेगळे वळण यात बरेच वर्ष तो शिरस्ता मोडला. पण गेल्या लॉकडाऊन पासून ते जुने नित्यपठणाचे स्तोत्रे म्हणून पाहायला सुरुवात केली . आणि ती सुदैवाने कंठगत व्हायला वेळ लागला नाही.   अशाच काही निवडकांपैकी "रामरक्षा" ही महत्त्वाची. 

शब्दांचा , अर्थाचा विचार करण्याचा स्वभाव स्वस्थ बसू देत नाही. अनायसे गुढीपाडव्यापासून ,नवसंवत्सराच्या आरंभदिनापासून रामरक्षेतील  "वज्रपंजर नावाचे कवच " मला जसे भावले , उमजले  तसे यथाशक्ती मी  या नवर‍ात्रात मांडू इच्छिते. 

 हे छोटेसे कार्य का असेना ; तो बुद्धी देणारा राम नक्कीच माझ्या हातून पूर्ण करून घेईल , अशी  इच्छा रामचरणी बाळगते. 

 

वज्रपंजर रामरक्षाकवच. 

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥

 


जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥10॥

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।

न दृष्टुमति शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।

यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥

वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥14॥


या पहिल्या भागात रामरक्षेतील वज्रपंजर-कवचाचा  सलग भाग देत आहे. 

 पुढच्या प्रत्येक भागातून ते श्लोक सविस्तर स्पष्टीकरणासह देण्याचा प्रयत्न करीन .

 *रामरामेति रामेति*

 *रमे रामे मनोरमे*।

 *सहस्रनामतत्तुल्यं*

 *र‍ामनामवरानने।।*

 🙏बुद्धी दे रघुनायका🙏

 ©  डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Sunday, April 4, 2021

#सहजोक्त.

  


मराठी  भाषा व संस्कृती अतिशय प्राचीन  व समृद्ध आहे. तिचा अभिमान सर्वच मराठीजनांना असणे स्वाभाविक आहे.

 हा अभिमान कोणी कसा जोपासावा न् व्यक्त करावा ? हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य !

 शरीराचा ताप मोजायला तापमापक असते पण भावना मोजायचे यंत्र नसते. कधी-कधी  हा भाषिक-अभिमान डोकेदुखी ठरतो.   आजकाल "आम्ही म्हणू तीच मराठी, बाकीच्यांची अशुद्ध /भेसळयुक्त". हा भाव काहीजणांमध्ये  फारच तीव्र असतो. 



नुकतीच होळी , धुळवड व रंगपंचमी होऊन गेली.  या दरम्यान , 'रंगपंचमी वेगळी ,  आपल्यात रंगपंचमीलाच रंग खेळतात , होळीचे दुसरे दिवशी  हिंदीभाषक विशेषतः सिनेमाप्रभावाने रंग खेळतात' , वगैरे अर्थाच्या अनेक पोस्ट सोशलमिडियावर पडलेल्या पाहिल्या. 

त्यावरून सहज विचार आले न् ते शब्दात मांडले.

मूळात  भाषेतील शब्दांना अव्याप्ति-अतिव्याप्ती , सामान्यीकरण-वैशेषीकरण असू शकते.

जसे   तेल म्हणजे तिळापासून बनलेले  या मूळ-अर्थाने असलेल्या शब्दाचे सामान्यीकरण करून व्याप्ती वाढवत वाढवत खोबरेल-तेल , जवस-तेल वगैरे शब्द तयार झाले. मेथी+कैरी यांचा खाद्यपदार्थ मेथंबा झाला , त्याचेच सामान्यीकरण "पेरूचा मेथंबा" , या पदार्थाने झाले. 

वर्षाऋतूपासून सुरू होणारे संवत्सर म्हणून वर्ष हा मूळ शब्द तयार झाला . त्याची अतिव्याप्ती होत , चैत्रापासून काय किंवा जानेवारीपासून काय , सुरु होणारे 'संवत्सर' जनरीतीने 'वर्ष'च ठरते. 


तसेच काहीसे इथे आहे. होलिकादहन झाल्यावर दुसरे दिवशी तिथली  र‍ाख अंगाला लावणे व  होळीच्या निखा-यांवर पाणी तापवून स्नान करणे अशी जुनी रुढी होती. तिचेच उत्सवीकरण होऊन त्याच दिवशी परस्परांना पाण्याने भिजवणे , राख (आजकाल रंग) एकमेकांवर उडवणे (म्हणून धुळवड) सुरु झाले . यालाच सर्वसामान्य रंगपंचमी म्हणू लागले. "रंगपंचमी" या शब्दाचे इथे सामान्यीकरण झाले. "पंचमी" ही तिथी पौर्णिमेनंतर साधारणपणे पांच दिवसांनी येते वगैरे 'तिथी-वार-नक्षत्र' असे पंचांग सामान्यांच्या डोक्यात येत नाही. त्यामुळे  'आम्ही दुसरे दिवशी रंगपंचमी साजरी केली' , या वाक्यात गैर असे काही वाटून घ्यायची गरज नाही.  होळीनंतर येणा-या पंचमीला लहानमुलांना गुलाल लावतात , अोवाळतात न् गाठी घालतात , त्याला 'शिवशिमगा' म्हणतात. मराठमोळ्या उत्सवांच्या विविध चालिरीती   दर बारा कोसावर बदललेल्या आढळल्यास नवल ते काय ?  वैविध्यपूर्ण , नांदती न् ऐश्वर्यवती सुसंस्कृती असलेली ही मराठीची नगरी आहे. 




 खरे तर कोणतीही "भाषा" मुळात बोली म्हणून जनमानसात रुजलेली असते. साधर्म्य बाळगणा-या अनेक बोलींचे प्रमाणीकरण करून एका बोलीला "प्रमाणभाषा" असा दर्जा दिला जातो. ती बोली ज्या भागातील असते , तिथल्या रीतिरिवाजांना एकप्रकारे प्राधान्य दिल्या जाते. म्हणजे "तीच बोली शुद्ध न् बाकीच्या तिच्या बाटिक" , असा दुराभिमान त्या बोलीकरांमध्ये बळावतो न् परिणामी इतर बोलीभाषांना सापत्न्यभाव , हीनपणा येतो . अर्थात हे त्यांच्या अर्धवट संस्कार व ज्ञानाचे द्योतक असते.

 ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांच्या काळी सुदैवाने बोलींचे प्रमाणीकरण झाले नव्हते वा तसा गाजावाजा नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच स्वाभाविक बोलीत साहित्य निर्माण केले न् वर्षानुवर्ष ते साहित्य सर्वच मराठीभाषकांना मूर्धन्य झाले. 

 ज्ञानेश्वरीतही छप्पन बोलीभाषांचा उल्लेख आहे.

 आज जे संत-पंत-तंत साहित्य  वा लोकसाहित्य उपलब्ध आहे , त्याचे वाचन केल्यावर बोली-बोलींमधील फरक लक्षात येतो.  व सहज कळते की तेव्हाच्या काळी ज्या त्या  प्रांतातील कवी तेथील बोलीत साहित्यनिर्मिती करीत असे. बोलि-श्रेष्ठत्वाची न् बोली लादण्याची कल्पना नव्हती. म्हणून " मराठा तितुका मिळवावा" सोपे गेले.

 मराठ्यांची सत्ता  कटकेपासून ते अटकेपर्यंत सुखेनैव नांदती होती. नशीब ,  तेव्हा असे कट्टर भाषाभिमानी नक्कीच नसावे  ! 

   रंगपंचमी की धुळवड ? यावरून मराठीपण ठरविणारे कितेक जण आजकाल दिसतात.  दर बारा-कोसावर जशी बोली बदलते तसे सणवार साजरे करण्याच्या रूढीही बदलू शकते  , इतकं साधं समजून घेता येत नाही? 

   बारा बलुतेदारी , ग्रामीण-नागरी , विपन्न-संपन्न , अनवट-मुरलेले , स्त्री-पुरुष इत्यादी पोटभेदांसह प्रांता-प्रांताच्या  चालीरीती   या खरे तर "मराठीच्या" समृद्धतेचा पुरावा आहेत.  त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवायचा प्रत्येक बोलीला अधिकार आहे .  त्यावर अतिक्रमण करू नये न् त्यांना हीनपणा देऊ नये  , इतकी तमा "प्रमाण-बोली-वर्चस्ववाद्यांनी" बाळगायला हवी. 

   मराठीच्या काही बोलींमध्ये प्रचलित असलेले काही शब्द हिंदीभाषेत सामान्यपणे योजतात. मग प्रमाण-भाषा अभिमानी "लोक्स"  त्या शब्दाला न् ते शब्द योजणा-यालाही हिणवतात.

   हिंदीभाषेतील वा इतर भाषेंतील  एखादा शब्द असेल न् तोही मराठीने स्वीकारला तर बिघडलं कुठे न् किती ?  पण नाही ; मराठीचे स्वयंभू कर्तेधर्ते सरसावून उठतात.

   "फार फार जुन्या काळी पावाचा तुकडा विहिरींत टाकून गावेच्या गावे बाटवली होती" , असं लहानपणी वाचल्यावर बाटवणा-यांचा प्रचंड राग यायचा , आताशा "ते बाटले"  हे स्वीकारणा-यांची कीव येते. 

   हाच द‍ाखला मराठीभाषेलाही लागू आहे.   विशिष्ट बोलीच्या सार्वत्रिक थोपवण्याच्या वृत्तीमुळे कितीतरी जणं अक्षरशः वाळीत पडले न् बाटगे होऊन परभाषक झाले , हे लक्षात येत कसे नाही ?

 जसे  बडोदा हे गुजराथेतील मराठी संस्थान , तसेच  कर्नाटक , तेलंगणा , आंध्रप्रदेश , अोरिसा  ,बंगाल , मध्यप्रदेश ,माळवा , छत्तीसगड  , सिंध , पंजाब वगैरे प्रांतात मराठी साम्राज्य होते. मराठी संस्कृती तिथे रुजत होती. आजही यांच्यावर असलेली मराठी-छाप अवचित दिसून येते. या सर्वच ठिकाणी स्थानिक बोली न् ज्येते मराठा यांची मराठी बोली यांचा संकर होऊन मराठीची नवी बोली तयार होत होती , होत असावी.  

   

   नेमकी मराठीच्या या शुद्धीकरणाच्या नावानी त्या बोलींची मराठीशी असलेली नाळ सहज खुडण्याचे काम केले गेले कां ? हे बघायला हवे . त्याचा परिणाम म्हणून आज या प्रांतात "मराठी" नगण्य झाली की काय ? हा विचार करायला हवा.  मराठी साम्राज्याला न् संस्कृतिला संकोचित करण्याचे काम अशा चळवळी हिरिरीने करतात की काय ?  असे वाटले तर अजिबात चूक नाही. 

   भाषाप्रमाणीकरण म्हणजे काय ?  तर सोप्या भाषेत , "अनेक बोलीभाषांचा  कॉमनमिनिमम प्रोग्रॅम"!   विविध बोलीभाषांमुळे संवादात अडथळा येऊ नये म्हणून एका बोलीचा स्वीकार करीत इतर बोलीतील  शब्दांचा , मान्यतांचाही सादर समावेश करणे म्हणजे प्रमाणीकरण होय. 

   प्रमाणीकरण भाषेचेच होते असे नाही तर संकल्पनांचेही होते. जसे जुन्याकाळी ,"अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" म्हणत प्रत्येक कुटुंबात आठ मुलांचे प्रमाण समाजमान्य होते. नंतरच्या काळात चार / तीन वर हे प्रमाण आले. त्यानंतर ," हम दो हमारे दो" झाले . आता त्रिकोणी कुटुंबाची संकल्पना प्रमाणित झाली. 

   तसेच  भाषेतही अधुनिक गरजा लक्षात घेऊन नव्या बोलीशब्दांचा समावेश आदराने करायला हवा. "पुस्तक भेटलं , भाजी भेटली , चहा मांडला , येऊन राहिला " , इत्यादी रचना कानी पडल्यावर लगेच हिणवायची गरज नाही. भले तुम्ही तसे बोलू नका पण त्यांना चिडवू नका . 

 औपचारिक लेखन करताना ही वाक्ये नक्की प्रमाणित करून द्या (शुद्ध नव्हे! )परंतु  बोलणा-याला  न तोडता !  हे  सांगणे काळाची गरज आहे , नाही ?  

 मराठा साम्राज्य आज केवळ महाराष्ट्रपुरते उरले आहे . त्यातही असे भेद करून प्रांतिक अस्मितेला बळ येऊन तिथली बोली प्रमाण करण्याच्या चळवळींना खतपणी आपणच घालत नाही ना ? याचा प्रत्येक मराठीचळवळींनी गांभीर्याने विचार करायला हवा.

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

   

  


Friday, February 12, 2021

#सहजोक्त.

 #सहजोक्त.

संस्कृत सुभाषिते अनमोल खजिना आहेत. मानवी मनोव्यापारांना अचूक टिपणारे , मानवी मनाला शांतवणारे , समुपदेश करणारे असे अनेक सुभाषिते दिसतात साहित्यात. 


एखादी गोष्ट अतिशय तीव्रतेने आपल्याला मिळावी असं आपल्याला वाटत असते. योग्य वेळी , योग्य प्रमाणात त्या गोष्टीचा लाभ मिळावा , यासाठी आपली धडपड सुरु असते.  आपले धैर्य कमकुवत  होत जाते.   'आताच मिळावी' म्हणून आपण अधीर होतो.  'अमुक एका व्यक्तीच्या हातात देणं असू शकेल' असा कयास आपण बांधतो . न्  जी जी व्यक्ती आपल्याला सहायक ठरू शकेल त्या सर्वांजवळ आपण विनंती , याचना , वेळप्रसंगी  नवनीतलेपन , पाद्यपूजा  वगैरे करतो. 

खरे पाहता ती गोष्ट मिळविण्याची अर्हता , योग्यता न् पात्रताही आपल्यात असते. प्रश्न वेळ न् धीराचा असतो.

यथावकाश ती गोष्ट आपल्याला मिळतेही.  पण या अस्वस्थ कालखंडात आपण ज्यांना ज्यांना विचारले , भाव दिला , जोडे झिजवले ; त्या सर्वांचे विविध अनुभव आपल्याला येतात. कोणी आपल्या परिस्थितीवर हसतात , कोणी अजून खच्चीकरण करतात . कोणी स्वतःचा टेंभा मिरवून घेतात तर कोणी करणं टिचभर न् सांगणं गावभर  करतात. कोणी छुपी दुश्मनी काढता  तर कोणी दिखावू सख्य बाळगतात. 

फारच दुर्मीळ असे काही लोकं  बिनबोभाट काम करून निःश्रेयस ‍अलिप्त होतात. 

चालायचेच ! हीच दुनियादारी आहे. अनुभवातून शिकून  लक्षात ठेवून वागायला हवे. 

अशाच  अर्थाने एक अन्योक्ती श्लोक संस्कृतात आहे. 


रे रे चातक ! सावधान मनसा मित्र क्षणं श्रूयताम् ।

अम्बोदा बहवो हि सन्ति गगने सर्वेअपि नैतादृशा: ।।

केचिद् वृष्टिभिः आद्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा ।

यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः ।।( भामिनी विलासः )


अरे चातका , मित्रा सावध हो , जरा ऐक . आकाशात अनेक ढग असतात. कोणी वर्षणारे तर कोणी निव्वळ गर्जणारे. तू सर्वांकडे दीनपणे याचना करू नकोस. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Saturday, January 16, 2021

#सहजोक्त.


एक लेख लिहिण्यासाठी काही जुन्या कविता गुगळत होती. "पृथ्वीचे प्रेमगीत" ही आवडती कविता दिसली. अजुनही बिचारी तेच गीत गात असेल कां ? विरहाने उपेक्षेने  तुटून गेली नसेल कां ?? असा विचार आला न् शब्दात  व्यक्त झाला.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 पृथ्वीची विराणी 

 पृथ्वीच मी न् तू सूर्य तारा

 कर्तृत्वयुक्त तुझा दरारा ॥१॥

 तू सूर्य तूला कधी हे कळेना

 तू पोषवी या मर्त्य जीवाना॥२॥

  कशी ,कां तुझ्या मी कक्षेत आली

 माझेच मला मी मिटवून गेली॥३॥

विरही तुझ्या  मी झाली रे दग्ध

 भावनाही थिजल्या होवोनि स्तब्ध॥૪॥

 प्रेमगीताची आता झालीय विराणी

 कधी रे उगा कां छेडली तराणी॥५॥

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे

#सहजोक्त

 #मातृतीर्थ.

माहूर म्हणजे मातापुर . प्राचीन काळापासून  पुण्यनगरी. आई रेणुकेचे पवित्र स्थान . तसेच अनेक ऋषिमुनींची तपोभूमी. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक स्थान. डोंगरराजींमध्ये  कीर्र वनराईत आईचे वसतीस्थान . 


मधल्याकाळात जंगलतोड , शहरीकरण , रस्तेविकास  आदींमुळे  जंगल विरळ झाले होते.  भूजलपातळी न् पर्यावरणावरही याचा कुप्रभाव पडत असणारच. याची प्रत्यक्षाप्रत्यक्ष झळ माहूरवासी  न्  यात्रेकरूंनाही बसत होती.  माहूर गडावरील  मंगल्याला या बाबींमुळे मरगळ येत होती. 


'देवालाच काळजी सर्व संसाराची '! 

या उक्तीनुसार  गेल्या दशकापासून माहूरदेवस्थानाचे विश्वस्तमंडळ , माननीय  तहसीलदार  वरणगावकर साहेब न्  सामाजिक बांधिलकी जपणारे  केदार गुरुजी या सर्वांच्या द्रष्ट्या प्रयत्नांतून वृक्षारोपण , संगोपन , वनसंवर्धन , जलस्तर संवर्धन , जलकुंडांची सफाई न् देखभाल , प्राचीन वारस्यांची जपणुक व सौंदर्यीकरण आदी सातत्याने सुरु आहे.

या सर्वांच्या प्रयत्नांना अात्ता आत्ता जरासे फळ दिसू लागले आहे. 



 सुदैवाने याची दखल  संवेदनशील प्रशासनाने घेतली. माननीय  जिल्हाधिकारी नांदेड , माननीय  सहायकजिल्हाधिकारी किनवट यांनी आवर्जून या क्षेत्राकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. आता या तीर्थक्षेत्राचा कायापलट नक्कीच होणार  व तीर्थाची महती वृद्धिंगत होणार , यात शंका नाही.


प्रशासनानी  माहूरवासींच्या मदतीने  मधील मातृतीर्थ , भानुतीर्थ  वगैरे पुनरुज्जीवित करण्याचे तसेच  डोंगरावर न् कुंडांच्या आजुबाजूला वृक्षारोपण , स्वच्छता वगैरे नियमित करणे सुरु केले.  त्याचा परिणाम म्हणजे  आज मातृतीर्थ ,  माहूर परिसरातील एक प्रेक्षणीय स्थळ झाले आहे .  हा  सुखद दर्शनीय बदल आहेच . या शिवाय अजून एक मानाचा तुरा माहूरकरांच्या शिरपेचात खोवल्या गेला आहे.


दीपकजी मोरताळे यांच्या पुढाकाराने  "गोदावरी नदी सांसद" या संस्थेमार्फत माहूरमधील  मातृतीर्थ, भानुतीर्थ, काशीकुंड, ऋणमोचन कुंड जलाशयातील  जलस्त्रोतांचे परीक्षण करण्यात आले होते .  मातृतीर्थातील  पाण्यात विरघळलेल्या प्राणवायुचे (ऑक्सिजनचे)  प्रमाण 11.00 ppm आढळून आले.   भानुतीर्थातील पाण्यात प्राणवायुचे प्रमाण १०.५० तर  ऋणमोचन कुंडातील पाण्यात १० इतके आहे. इतके उच्च असे प्रमाण    हिमालयातील नद्या  व गंगा नदीच्या उगम क्षेत्रात आढळते.  असे पाणी मानवी शरीरास निश्चितच लाभदायक ठरेल. 


आपल्या ऋषिमुनींनी हे सगळे फायदे लक्षात घेऊनच या स्थानाची  तपोभूमी म्हणून निवड केली असावी की काय न कळे! शिवाय  आपल्या वाडवडिलांनी या स्थानांचे पावित्र्य टिकवण्याचे काम इमाने-इतबारे केले आहे. भौतिक विकास व आधुनिक साधनसामग्री नक्कीच हवी पण  समृद्ध-पर्यावरणीय वारसा जपणे हे आपले परम कर्तव्य आहे. कोणत्याही तीर्थक्षेत्राचे पावित्र्य याच निरोगी पर्यावरणावर अवलंबून असते. 

सुदैवाने माहूरला त्याचे पर्यावरणीय वैभव मिळवून देण्यासाठी आई रेणुका नक्कीच माहूरवासीयांना  ,  प्रशासनाला सद्बुद्धी देत आहे , असेच म्हणावे लागेल. 

लवकरच माहूरला  साडेतीन पिठामधील आपले जागरूक न् अग्रगणी स्थान परत मिळावे  , अशी  आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना .🙏  शुभं भवतु ॐ 🙏 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, January 7, 2021

#सहजोक्त.

 TUESDAY, JANUARY 7, 2020

#चिंतनात्मक लेख.


आहार व आरोग्यशास्त्र

• प्रस्तावना

"काऊ ये , चिऊ ये ,दाणा खा ,पाणी पी ,भुर्कन उडून जा !" किंवा  " इथे इथे बस रे मोरा ,बाळ घाली चारा ,चारा खा ,पाणी पी ,भूर्कन उडून जा"!   लहान बाळांना खाऊ घालताना हमखास सांगण्याच्या या गोष्टी !

नवजात बालकाचा  पहिला परिचय हा आईच्या दुधाशी होतो. बाकीची समज येण्याआधी त्याला आईचा वात्सल्यपान्हा व स्पर्श  पुरेपुर समजतो. अशा प्रकारे मानवाचा आहाराशी अर्भकावस्थेपासून परिचय व संबंध येतो. "अन्नाने शरीर वाढते " याचे प्रात्यक्षिक म्हणजे , अर्भकाचा विकास होणे.

आहार , अन्न ,खाद्य , भक्ष , भोजन ,घास, कवळ ,खाऊ ,भातकं असे अनेक शब्द आपण व्यवहारात नेहमीच योजतो.  गोळाबेरीज अर्थ सारखा असला तरी प्रत्येक शब्दाचा मूळ स्रोत व अर्थच्छटा वेगळी आहे.   खाण्या विषयीचे शब्द व त्यांचे मुळ धातू पुढील प्रमाणे आहार (आ+हृ = ) , अन्न (अद् ) , खाद्य (खाद् ) भोजन (भुज्) , भक्ष्य (भक्ष्)  , घास (घास् )   , खाऊ व भातकं हे खास मराठी शब्द समजण्यास हरकत नाही. हे शब्द जरी तसे समानार्थी असले तरी ते कसे व कुठेही न वापरता  अौचित्याने  वापरले जातात.


• अन्न विचार.

मूलभूत गरजांपैकी अन्न ही अत्यंत निकडीची मानवी गरज आहे.

अन्नाने केवळ शरीर पोषण होते असे नाही तर एकूण व्यक्तिमत्वाला समतोल करण्याची तकद अन्नात आहे.

जसा आहार तसा विचार ,

जसा विचार तसं वर्तन ,

वर्तनातून  जडण-घडण ,

व्यक्तिमत्वा मुळ जाण

आहार  हाचि एक करण ॥

म्हणून आहार ,अन्नशास्त्र व आरोग्य याचे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे.


• मराठी संस्कृती व आहार

फार जुन्या काळापासून आपल्या मराठी लोकांना आहार व आरोग्य यांचे साहचर्य वा समप्रमाण  ज्ञात होते. मराठी खाद्या संस्कृती व मराठी थाळी ही समतोल आहाराचे उदाहरण म्हटली जाते.

लिंबू , मीठ , चटणी , कोशिंबिर , पंचामृत , भाजी , पातळभाजी , सार , कढी , वडे-भजी ,सांडगे, पापड ,  गोड पदार्थ , वरण ,भात ,पोळी ,ताक इत्यादी सर्व घटक जेवणात असायचे. इतकेच नाही तर ताटात ते वाढण्याची ठराविक पद्धत असे ,ज्यावरून पदार्थांचे जेवणात किती प्रमाण असायचे हे ही ठरायचे.  विविध ऋतुंमध्ये नेमके तेच पदार्थ घरी केल्या जायचे ,ज्याची शरीराला गरज आहे. उदाहरणार्थ ,संक्रांतीला तिळगुळ ,गणपतीला मोदक , दिवाळीत पुरणपोळी , वगैरे .

जुन्या काळी अन्न हे पूर्ण ब्रह्म या भावनेतून शिजवले व खाल्ले जात असे. 

(जिज्ञासुंनी डॉ. जयश्री पेंढरकर यांचा १ नोव्हेंबर २०१३ ला महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित झालेला लेख वाचावा ).

खाद्यसंस्कृती विषयक परंपरा व रूढी या गतानुगतिक न्यायने समाजात अखंड सुरु असतात. कालौघात त्यांची विज्ञाननिष्ठता तपासून योग्य परंपरांचा आदर केल्या गेला पाहिजे.


• अन्न विषयक कथा

जुन्या काळी मुलांना कहाण्या-गोष्टी सांगितल्या जायचे . गोपाळकृष्ण हे आबालवृद्धांचे लाडके दैवत . त्याच्या कहाण्या मुलांना आवडतात. नंदराजाचा मुलगा बाळकृष्ण व त्याचा दादा बलराम  हे दोघेही सामान्य प्रजाजनांच्या मुलां सोबत रोज गायी चारायला जंगलात जायचे . हे वर्णन किती मनोवेधक आहे , होय ना ? मग दुपारी ते सगळे बाळगोपाल यमुनेच्या काठी भोजनाला बसत. कोणी अति गरीब ,तर कोणी बरे ,कोणी सधन तर कृष्ण स्वतः अतिश्रीमंत ; तरीही कृष्ण स्वतः सगळ्यांच्या शिदोरी (आजकालं डब्बा) एकत्र कालवून देत असे . मग सगळ्याना समान वाटणी करून देत असे. हाच गोपालकाला.  या छोट्याश्या कथेतून कितीतरी गोष्टी सहज सुचवल्या गेल्या. जेवण ,हे समान असावे ,सर्वांना सकस व पुरेसे मिळावे. एकत्र जेवण्याने अन्न जास्त धकते व अंगी लागते. एकीची भावना बळावते.


• भोजन मंत्र

जुन्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असताना , घरोघरी जेवणाच्या पंक्ती असत. त्यामुळे अन्नसंस्कार ,सहभोजनाचा आनंद व परस्पर जिव्हाळा सहज वाढत असे. शिवाय ,अतिथींची सुद्धा सोय सहज होत असे.

अशा सहभोजनाच्या पंक्ती सुरु होताना भोजनमंत्र म्हटले जायचे. त्या मंत्रांतून सुचारित्र्याचे संस्कार अोघात केले जायचे.

(१) मुखी घास घेता करावा विचार

कशासाठी मी अन्न हे सेवणार

घडो माझिया हातुनी देशसेवा

म्हणोनि मिळावी मला शक्ती देवा.

(२)  वदनी कवळ घेता

नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते

आपुल्या बांधवांचे

कृषिवल कृषिकर्मी

राबती दिनरात

श्रमिक श्रम करोनि

वस्तु या निर्मितात

करुनि स्मरण तयांचे

अन्न सेवा खुशाल

उदरभरण आहे

चित्त होण्या विशाल ॥

(३)  साईं इतना  दीजिये

ज्या में  कुटुंब समाय ।

मैं भी भुखा ना रहूँ

साधु न भुखा जाय ॥ (संत कबीर)


• शाळा , एक संस्कार केंद्र.

आता एकल वा विभक्त अशा बदललेल्या कुटुंबसंस्थेमुळे  शाळा हेच सर्व चांगले संस्कार करण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे सहभोजन , समवर्तन , राष्ट्रप्रेम रुजविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यासाठी खालील गोष्टी आवर्जून कराव्यात.

•  शाळेत मधल्या सुट्टीत सगळे विद्यार्थी एकत्र येतील .

•   हात-पाय-तोंड स्वच्छ धूतील .

•   संपूर्ण वर्ग गोलाकार करून वा आमने-सामने पंगत करून आपले जेवण करतील .

•   जेवताना कविता , श्लोक , सुविचार यांचे समजपूर्वक सादरीकरण करतील .

•   सगळेजण मिळून मिसळून संपूर्ण भोजनाचा आस्वाद घेतील .

•   उजव्या हाताने नीट जेवतील.

•   आजुबाजुला अन्न सांडवीणार नाहीत .

•   पानात उष्टे टाकणार नाहीत.

•   ताट / डबा नीट स्वच्छ करतील .

•    जेवणानंतर  जेवणाची जागा स्वच्छ करतील.

•     हात व तोंड विशेषतः दात पूर्ण काळजी घेऊन स्वच्छ करतील .

•     त्यानंतर हात व चेहरा स्वतःच्या रुमालाने पुसतील .

•     डबा वा जेवणाचे सामान नीट पिशवीत भरतील .

•     रुमालाची घडी करून योग्य जागी ठेवतील .

•      जेवणानंतर जेवणात काय अन्नघटक होते? , ते कसे तयार करतात ?

•      त्यात पोषकतत्वे किती ?

•      धान्य उगवणारे , अन्न शिजवणारे  सगळे घटक याविषयी प्रकट शब्दातून जाहीर कृतज्ञता व्यक्त करतील .

•   दररोज आनंदाने व मैत्रीपूर्ण वातावरणात जेवण होईल .

• सणवारां विषयी माहिती सांगून त्या दिवशी कोणता विशेष पदार्थ शिजवितात , त्याचे पौषकमूल्य व ऋतुनुसार उपयुक्तता तसेच परिसरातील स्थान याबद्दल रंजक माहिती अत्यल्प शब्दात सांगावी.

• जर कोण्या विद्यार्थ्याचा जन्मदिवस असेल तर कल्पक योजना करून सहकार-सामंजस्य-सौहार्द भावना रुजवावी.

सहभोजनाचा कल्पक वापर करून विद्यार्थ्यांना उत्तम संवेदनशील मानव बनविता येते , हे लवकरच चांगल्या शिक्षकांच्या अनुभवाला येईल .


• अन्नविषयक म्हणी वा वाक्प्रचार

मराठी ही समृद्ध ज्ञानभाषा आहे. तिच्यात  अनेक विषयांवर दैनिक व्यवहारातून , अनुभवातून म्हणी व वाक्प्रचार निर्माण झाले आहेत . म्हणी वा वाक्प्रचारांच्या मागील कारण शोधणे वा अर्थ शोधणे  ; भाषा प्रगल्भ करायचे साधन होय. अन्न विषयक  वानगी दाखल इथे काही देत आहे. अधिकाधिक संग्रह करणे , उपक्रमासाठी योग्य ठरेल .

• खायी त्याला खवखवे.

• आधी पोटोबा मग विठोबा.

• खायला काळ न् भुईला भार.

• खायला कोंडा ,निजेला धोंडा.

• कोंड्याचा मांडा करणे.

• बाई मी सुग्रण न् केलं आज शिकरण .

• खाल्ल्या अन्नाला जागणे.

• खाली पेट भजन न भाये गोपाला.

• अन्न हे पूर्णब्रह्म.

• बोलाचिच कढी ,बोलाचाच भात.

• धीर धरा , मी खीर करते , साबुदाण्याची.

• रांधता येईना अोली लाकडे.

• हातावर पोट घेऊन जगणे.

• पाठीवर मारा पण पोटावर मारू नका.

• अन्नान्न दशा होणे.

• अन्नासाठी दाही दिशा ,आम्हा फिरविशी जगदीशा.

• देवाला वास न् माणसाला घास.

• घासातला घास देणे

• एक तीळ सात जणांत वाटून खाणे.

• असतील शिते तर जमतील भुते .


• प्राचीन संस्कृती व अन्नविषयक विचार.

अतिशय प्राचीन काळापासून भारत हा ज्ञानगुरु होता. आहार ,अन्नशास्त्र ,खाद्य संस्कृती  विषयक उल्लेख अनेक ग्रंथातून केलेला आढलतो.


उपनिषद् म्हणते ," आहारशुद्धौ सत्वशुद्धिः ।" (शुद्ध आहाराने बुद्धी शुद्ध होते.)

ऋग्वेदात म्हटले आहे की ,"केवलाघो भवति केवलादि।" (एकटा खाणारा  पापी असतो )

शतपथ ब्राह्मण ग्रंथात , " अन्नं प्राणः । अन्नम् आयुः ।"  ( अन्न म्हणजेच प्राण , अन्न म्हणजे आयुष्य )

तैत्तिरीय उपनिषद् म्हणते ," अन्नं न निन्द्यात् । तद् व्रतम् । अन्नं न परिचक्षीत । तद् व्रतम् । अन्नं बहु कुर्वीत । तद् व्रतम् ।॥ ( अन्नाची निंदा ,नासाडी करू नये. अन्न वाढवावे , हेच व्रत आहे.

तैतरीय उपनिषद ,कठोपनिषद् मांडुक्योपनिषद्  यातील शांतीमंत्र असा आहे ,

"ॐ सह नाववतु।सह नौ भुनक्तु।सह वीर्यं करवावहै।तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥"  (आपण एकमेकांचे रक्षण करावे ,एकत्र जेवावे , एकत्र पराक्रम करावा ,आमचे अध्ययन-अध्यापन तेजस्वी होऊ दे ,आमच्यात द्वेषभाव नकोत.)

अशा प्रकारे वेदात अन्न व आहार विषयक अनेक उद्धरणे आहेत.

श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथातही आहार विषयक अनेक उल्लेख आहे.

"अन्नाद्भवति भूतानि।" ३.१૪ (अन्नापासून जीव निर्माण होतात.)

भुञ्जते ते त्वघं पापा  ये पचत्यात्मकारणात् ।३.१३ (जे स्वतःपुरतं शिजवून खातात , ते पाप खातात. )

याशिवाय अनेक श्लोक ,सुवचने ,सुभाषिते संस्कृत साहित्यात आढळतात ,ज्यातून आहार व आरोग्य या विषयी सखोल चिंतन करता येते. इंटरनेटच्या वा ग्रंथालयाच्या माध्यमातून आरोग्य विषयक सुभाषितांचा संग्रह करता येईल .


• आयुर्वेद व आहार .

आयुर्वेद  हे निव्वळ शास्त्र नसून जीवन पद्धती आहे. रोगोपचार हे त्याचे मुळ ध्येय नसून स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य टिकविणे हे उद्धिष्ट्य आहे.  आयुर्वेदाचे प्रयोजन असे सांगतात ," प्रयोजनं चास्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणमातुरस्य विकारप्रशमनं च।"

त्यामुळे आयुर्वेदाचा भर नैसर्गिक  जीवनशैलीने आहार-विहार-विचार यातून स्वास्थ्यलाभ यावर आहे. आयुर्वेदात पथ्य-अपथ्य-कुपथ्य  ,विषमद्रव्य यावर व आहार या विषयावर अनेक ग्रंथ व ग्रंथातील प्रकरणे खर्ची घातली आहेत.

इथे काही ग्रंथांची नावे देत आहे.

वैद्यकीय सुभाषित संग्रह

चरक संहिता

सुश्रुत संहिता

आयुर्वेदीय हितोपदेश

आयुर्वेदीय सूत्र

माधवनिदान  इत्यादी इत्यादी.

आयुर्वेदाचे आहार विषयक अत्यंत महत्वपूर्ण सूत्र असे आहे ," यस्य देशस्य यो जन्तुः , तज्जातस्यौषधिहितम् ।"  म्हणजे जो ज्या भागात जन्माला आला तेथील चराचर-जीवाजीव सृष्टी हीच त्याचे अौषध असते. म्हणजे कोकणातील व्यक्तीसाठी पित्तशामक आमसुल असेल तर विदर्भातील व्यक्तीसाठी तेच कार्य बोरफळ करते. 

"अन्न हे निव्वळ जिभेचे चोलचे पुरवून पोट भरणे नसून तेच अौषध आहे." हे तत्व आयुर्वेद व आहार विषयक प्राचीन ग्रंथांनी पुरेपूर पाळले.

भारतात प्रांता प्रांतात आढळून येणारे खाद्य वैविध्य हे त्याचेच द्योतक आहे. गतानुगतिक न्यायने परंपरा-रुढींमध्ये  भारतीय आहारशास्त्र अडकले आहे. त्याचे तटस्थ संशोधन करून आधुनिक काळाच्या बदललेल्या संस्कृतीला झेपेल या पद्धतीने पुनर्मांडणी करायला हवी.

आयुर्वेदिक ग्रंथांशिवाय संस्कृत व तमिळ अादी जुन्या भाषांमध्ये अन्न निर्मिती संदर्भात अनेक उत्तमोत्तम ग्रंथ रचले गेले आहेत. त्यांचा कालवधी इ.स च्या पहिल्या शतकापासून ते १५/१६ व्या शतकापर्यंत आहे. त्यातील काही नावे -> नलपाकदर्पणम् , मनसोल्लास  इत्यादी होय.

या शिवाय कुठेही न लिहिलेले पण वाडवडिलांच्या आचारपरंपरेने ,मौखिक स्वरूपात किती तरी मोठे घान भारतीयांना उपलब्ध झाले आहे. हे अनेक दाखल्यांतून सिद्ध होते . जसे सर्दी झाली तर आल्याचा वापर . खोकला झाला की सुंठ ,  जंत असेल तर वावडिंग /हिंग/कडुलंब /कळमेघ , पोटातील वायु =अोवा ,उष्णता शामक जीरे  , जखम झाली तर हळद , सुज असेल तर आंबेहळद ,थंडाव्यासाठी गुलकंद ,चंदन , खश  असे घरगुती उपाय सर्रास केल्या जातात घरोघरी.

या घरगुती उपयांचेही  शास्त्रशुद्ध संशोधन करणे गरजेचे आहे.


• आहार शास्त्र व करियर

दुसरे महायद्ध झाल्यावर जागतिक समीकरणे वेगाने बदलली.  देशोदेशीचे पारंपरिक  व्यवसाय , ज्ञानशाखा माघारल्या गेल्या . नवे नवे क्षितिज दिसू लागले. भारतात बंगालचा दुष्काळ ,जगाच्या इतर भागातील कुपोषणग्रस्त प्रदेश , दुष्काळ-अकाळ ग्रस्त प्रदेश इत्यादींमुळे  अन्नशास्त्र  , अन्नतंत्रज्ञान , कृषिविद्या ,आहारशास्त्र , गृहविज्ञान इत्यादी नवनवीन ज्ञानशाखा निर्माण झाल्या.  भारताचा विचार करता भारतात कृषिव्यवसाय  प्रमुख उपजीविका साधन आहे. तरीही भारतात अन्नधान्याचा तुटवडा पडतो . कारण अन्नधान्यांची साठवणुक व वितरण अजूनही सुयोग्य पद्धतीने होत नाहीय. रस्ते-महामार्ग विकास , धान्यगोदामे , कोल्डस्टोअरेज वगैरेंचे जाळे वेगाने विणले जात आहे व वितरणातील न् साठवणुकीतील तृटी कमी करण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षात  "अन्नप्रक्रिया मंत्रालय" स्वतंत्र करून भारताने "अन्नाची हमी" विषयी आम्ही सकारात्मक आहोत हे सिद्ध केले आहे. वाढती लोकसंख्या ,जनजागृतीचा अभाव  ,  शास्त्रशुद्ध तंत्रज्ञनाचा प्रभावी वापर न करणे , ह्या मोठ्या आव्हानांना सामोरे जात ,भारत सरकार अन्नप्रक्रिया उद्योगांना भरपूर सहकार्य करून प्रोत्साहन देत आहे.  भारतातील जैवविविधता ,उत्पादन क्षमता , सर्वंकष हवामान आदी बलस्थानांचा वापर करून अन्न प्रक्रिया उद्योगाद्वारे देशाला  अन्नसंपन्न व अन्न निर्यातदार देश करणे ही काळाची गरज आहे.


• शालेय स्तरावर अन्न शिक्षण विषयक जागृतीची आवश्यकता

कृषिप्रधान व धान्य उत्पनानार वरचा क्रमांक असतानाही  भूकबळीच्या समस्येने भारताला ग्रासलेलं अाहे. कारण  देशभरात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होत असल्याचंह स्पष्ट झालं आहे.

अन्नाचा अपव्यय हे भारतातल्या भूकबळी समस्येचं मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारतात 40 टक्के अन्न वाया जातं. या खाण्याचं रुपांतर पैशात केलं तर रक्कम 50 हजार कोटी रुपये एवढी भरेल असं आकडेवारी सांगते.आकडे बाजूला ठेवले आणि आजूबाजूला पाहिलं तर अन्नाचा अपव्यय होतो, हे आपल्याही लक्षात येईल. लग्नसोहळे, हॉटेल्स, कौटुंबिक तसंच सामाजिक कार्यक्रम आणि घरीही प्रचंड प्रमाणावर अन्न टाकलं जातं. हे अन्न वाचवून गरजूंना दिलं तर अनेकांची उदरभरणाची सोय मार्गी लागेल.

हे सगळे भीषण वास्तव आहे . यावर मात करायची असेल तर अन्नाविषयक जागृती व अन्न-रक्षणासाठी मानसिकता ही संस्कारक्षम अशा बालवयातच करायला हवी . 


• जागतिक अन्न दिवस  व भारत


1945 साली स्थापित संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization -FAO) चा स्थापना दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

अन्नाच्या मर्यादित साठ्याकडे पाहता उत्पादन वाढविण्याची गरज वाटायला लागली. या चित्राला पाहता संयुक्त राष्ट्रसंघाने 16 ऑक्टोबर 1945 रोजी रोममध्ये ‘अन्न आणि कृषी संघटना (FAO) ची स्थापना केली. उपासमारीला संबोधित करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता फैलावण्यासाठी सन 1980 पासून 16 ऑक्टोबरला 'जागतिक अन्न दिवस' साजरा करण्याचे सुरू केले गेले. यांच्या प्रयत्नाने जगभरात अन्नविषयक कायदे , नियम , नियामकसंस्था , संशोधक संघटना आदी निर्माण झाले.

भारतातही "अन्नवैज्ञानिक व तंत्रज्ञ संस्था" सुरु होऊन अनेक वर्षे झाली. या संस्थेच्या प्रयत्नांनी जनसामान्यांमध्ये अन्नविषयक जागृती निर्माण केल्या जाते. आज  भारतात अन्नतंत्रज्ञान  विषयक   पदविका , पदवी,पदव्यत्तर शिक्षण  अनेक  विद्यापीठांतून उपलब्ध आहे. भारतात आज "अन्नतंत्रज्ञान" ही ज्ञानशाखा हॉट करियर म्हणून बघितली जाते.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Monday, January 4, 2021

#सहजोक्त.

 

'न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति।' असे श्लोकाचे अर्धवट पद  उल्लेखून वेद-पुराणादी ग्रंथ कसे  महिला विरोधी होते , प्राचीन हिंदुधर्म कसा अन्याय करणारा होता , आदींवर ठेवणीतले भाषण , लेखन वर्षानुवर्षे सुरु आहे.   जनसामान्यांच्याही मनात तेच रुजवले जाते.

पण वरील श्लोक पूर्णपणे सांगितला जात नाही न् ऐकणारेही शोधत नाहीत.

एकूणच अन्याय , शोषण , उच्च-नीच आदी आवडीच्या गृहीतकांवर अनेकांची दुकानदारी जोमात सुरु राहते. असोत बापडे !  "जो जे वांछील तो ते लाहो । मानवी जमात!!" 

  

हिंदुधर्म हा श्रुतिस्मृतिपुराणोक्त म्हटल्या गेला आहे.  "बाबा वाक्य प्रमाणम्" , या धर्मात मान्य नाही. या ग्रंथामधील अनेक चिरंतन , त्रिकालाबाधित सत्य आजही सर्वांसमोर येत नाहीत. शास्त्रचर्चा ,धर्मचिकित्सा पूर्वी नेहमी होत असे. मधल्या काळात भारतीय ज्ञान परंपरा हेय ठरविल्या आणि भारतीयांची तेजस्विता हरपली.

आजकाल तर छिद्रान्वेषी दृष्टीनेच या ग्रंथांकडे पहण्याची फॅशन आली.  मग काय?   "नावडतीचे मीठ अळणी" , प्रमाणे पुराणग्रंथांतील सर्वच "फालतु" ठरवण्याची अहमहमिका लागली तर नवल काय ?  

 एकूणच धर्मग्रंथात  व्यष्टी ते समष्टी सुखी व्हावे याविषयी सांगितले आहे.  सांगण्याची पद्धत आजच्यापेक्षा वेगळी आहे. न् ते समजायला जरासा बदल स्वतःच्या गृहीतकांमध्ये करायला हवा. 

 जसे मॉडर्न लोकांनी विरोधाची धार तेज ठेवली तशीच (पुरुषसत्ताक) परंपरावाद्यांनी स्वतःला  गैरसोयीच्या बाबी लपवून ठेवल्या. असो. 

 

 भगवान् वेदव्यासांनी अठरा पुराणे लिहिली. त्यातील एक स्कंदपुराण होय.

स्कंद पुराणाच्या  माहेश्वरखण्डातील कौमारिकाखण्डच्या २३व्या  अध्यायात   कन्यागौरव केला आहे. तो पुढील प्रमाणे.


दशपुत्रसमा कन्या 

दशपुत्रान्प्रवर्द्धयन्।

यत्फलं लभते मर्त्यः

तल्लभ्यं कन्ययैकया॥ २३.४६ ॥


एक कन्या दहा पुत्रांच्या बरोबरीची आहे. दहा मुले पोसून जे फळ मानवाला मिळते , तेच फळ एका कन्येच्या पोषणाने मिळते. 

( एक पुत्री दस पुत्रों के समान है। कोई व्यक्ति दस पुत्रों के लालन-पालन से जो फल प्राप्त करता है वही फल केवल एक कन्या के पालन-पोषण से प्राप्त हो जाता है।) 


चक्क पुराणात कन्येचा इतका मोठा सन्मान केला आहे.

अशा प्रकारची उद्धरणे शोधून आजच्या वाचकांसमोर ठेवायला हवीत. न् वाचकांनीही डोळसपणे चांगली उदाहरणं शोधायला हवीत. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...