Tuesday, December 1, 2020

#सहजोक्त.


वृन्तस्थितस्य  पुष्पस्य मित्रे वरुणभास्करौ ।

वृन्ताच्च्युतस्य तस्यैव क्लेशद‍हकरावुभौ॥ 


झाडाच्या देठावर असलेल्या फुलासाठी पाऊस न् उन्ह दोघेही मित्र (पोषक)  असतात. तेच देठाहून तुटलेल्या फुलासाठी हेच दोघे त्रासद‍ायक  व तापदायक ठरतात. 


लोकं तेच असतात , त्यांचा स्वभावही तोच असतो ,  त्यांची वागण्याची त-हाही तशीच असते ; मात्र आपल्या स्थितीनुसार  त्यांच्या वागण्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. 


आता या श्लोकाच्या दाखल्यातून  समजून घेऊ या.

तेच फूल , तोच पाऊस न् तेच उन्ह असतात. फूल जेव्हा  झाडाच्या देठावर असते तेव्हा पाऊस न् उन्ह त्याला पोषक मित्र ठरतात . न् तेच फूल  झाडापासून विलग झाले की  पाऊस क्लेश देणारा न् उन्ह ताप देणारे ठरतात.


आपलं मन , भावना न् शरीर सुस्थिर व स्वस्थ असेल तर जगातील सर्वच बाबी (वास्तवात खडतर असूनही ) आपल्याला सुसंगत न् अनुकुल  ठरतात. तेच आपणच  अस्वस्थ (शरीर वा मनाने) असू तर सर्वच वातावरण , पर्यावरण  (जरी बाहेरच्यांना ते  सुसंगत वाटत असले तरी )  दूषित होऊन जाते आपल्यासाठी. 


म्हणून  " स्वस्थ"  (म्हणजे स्वतःमध्ये स्थिर  व बाह्य गोष्टींसाठी अलिप्त )  र‍हण्याचा सराव करायला हवा , प्रत्येकानेच  ; नाही कां ? जेणे करून 

बाह्य परिस्थिती /आलंबन यांचा परिणाम होणार नाही. 

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.






 ‎ 

 ‎

Friday, November 6, 2020

#सहजोक्त.

 



 मोठ्या भावाला शालेय अभ्यासक्रमात संस्कृत श्लोक होते. तो पाठ करायचा , आमच्या कानी पडायचे. एक श्लोक न्  श्लोकापेक्षाही त्याचा अर्थ कायमचा लक्षात राहिला .  तो श्लोक असा होता.


आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ: लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् |

एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ||


संपत्तीने अंध झालेल्या [गर्विष्ठ] मूर्खा, संकटात सापडलेल्या या [गरीब माणसाला] तू कां हसत आहेस? अरे लक्ष्मी [कधी कोणाकडे] कायम राहत नाही यात आश्चर्य काय? रहाटगाडग्याच्या चाकावर असलेले हे घडे तू पाहतच आहेस, की रिकामे असलेले घडे भरतात आणि भरलेले रिकामे होतात.


रोजच जगताना अनेक प्रसंगी हा श्लोक आठवतो ,अनुभवाला येतो व  पटतो . दाणदाण चालताना , किडेकिटुक  चिरडल्या जातात याचे भान हत्तीला नसते पण किटकाचा जीव तळमळतो .  भर्र वेगाने जाणारी कार , पायदळ चालणा-यांच्या अंगावर चिखलफेक करून सुसाट निघून जाते. पायी चालणारा फजित पावतो , हे त्या कारचालकाच्या गावी असेलच असे नाही. 

यौवन-धनसंपत्ती-प्रभूत्व-अविवेकिता आदी हवेहवेसे (?) गुण   असल्यावर         माणसाचे      सहज    वर्तन  कारचालकाप्रमाणेच असते न् ते तसे आहे , याचे त्याला नकळत भूषणही  वाटत असते.

 "आपण पर्फेक्ट ,   आपण मेहनतीने कमावले , आपण कर्तृत्ववान , आपली आपकमाई , आपण परोपकारी , आपण  सहृदय , आपण न्यायी , आपण चुकीचे वागतच नाही" असे ठामपणे वाटणारी अनेक व्यक्तिमत्वे "कारचालक" मानसिकतेत जगत असतात.  यांच्या   "सर्वोत्तमतेचे" बळी यांच्या आजुबाजूला विखुरले असतात न् संधीची वाट पहात असतात.

 कवि भास म्हणतात...

कालक्रमेण जगतः परिवर्तमाना । चक्रारपंक्तिरिव गच्छति भाग्य-पंक्ति ।।

आपल्या वागण्याने आपण कितेकांना दुखवले , डावलले , उठवले , त्रस्त केले याची जाणीव नसणे , हेच अशा महान (!)  लोकांचे विशेष असते. या सर्वच नरोत्तमांचे  भान इथे सुटलेले असते की परिवर्तन हे काळाचेच दुसरे रूप आहे न् ते अटळ आहे. 

वर सांगितलेल्या सुभाषिताच्या अर्थाला पूरक अनेक सूक्ती भाषांमध्ये आढळतात.

(१) हे हेमकार परदुःख विचारमूढ....

(२) माटी कहे कुम्हार से, तु क्या रोंदे मोय। एक दिन ऐसा आएगा, मैं रौदूंगी तोय।।

(३) की तोडिल्या तरु फुटे आणखी भराने...

अशा अनेक सूक्ती कां निर्माण झाल्या ? तर असं वागणं पूर्वापार घडत आलय म्हणूनच ना ! 

 आज सासुरवाशीण असलेली सून पुढे आपल्या सुनेला थोडाफार तसाच सासुरवास करते.  रॅगिंगला नाव ठेवणारे  आजचे  फ्रेशर्सही पुढच्या बॅचचे रॅगिंग घेतातच घेतात. न् अशा प्रकारे लोकं आपली वेळ विसरून गतानुगतिकपणे तसेच वागतात , ज्याचा त्रास त्यांनी स्वतः अनुभवला असतो.  

 पैसा-अधिकार वगैरे पचवणं , ऊतमात न करणं ; हे अन्न पचवण्या इतकं सोप्प नाही.    "अहंकाराचा वारा न लागो माझिया अंगा" ,  हे आत्मसात केलेल्यालाच  पैसा-अधिकार पचवता येऊ शकतो. 

काल  डावलल्या गेलेले ,  आज ईप्सित स्थान लाभल्यावरही  उन्मत्त न होता ऋजुतेने वागतील तरच खरे संस्कारी ठरतील न् खरी सुसंस्कृत पिढी घडेल , यात शंका नाही.

 नाही तर 

"रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः।"  असं रहाटगाडगं अखंड सुरूच राहील. 

प्राचीन काळापासून चालत आलेली ही "मत्त-मानसिकता" जाणूनच  सर्वज्ञ  भगवान  बुद्ध म्हणाले असतील कां   , 

"न हि वैरेण वैराणि शम्यन्ति ह कदाचन ।

अवैरेण च  शम्यन्ति  एष धर्मो सनातनः ॥" 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 









Saturday, September 26, 2020

#सहजोक्त.

 #आई अंबे तू झोपी नको जाऊ .....

कवी कविता करतात , ते अंतःप्रेरणेने. ती अंतःप्रेरणा बहुतेकदा त्यांच्या भावविश्वातील व्यक्ति-वस्तु-प्रसंग वगैरे असते. एकदा कां त्यांच्या इप्सिताची प्राप्ती वा पूर्ती झाली की कवींची काव्य-झरणी लुप्त होते. संतांचे अंतःकरण ईशप्रेरणेने भारलेले असते.  कविता करावी ,  या हेतूने त्यांच्या रचना नसल्यामुळे काव्य-निर्झर अखंड वाहता असतो म्हणून त्यांचे वाङ्मय "अभंग" ठरते. शब्दसंग्रह करून , यमकादी अलंकार जोडून काव्य करण्याकडे कवींचा कल असतो . हेच संतांच्या रचना चिरंतनातून आल्यामुळे  शब्द , अलंकार , वृत्त-छंद वगैरे , त्यांच्या रचनेत  उत्स्फूर्त येतात.  सहज बोली भाषेतील शब्द रचणे , सोपी रचना करणे ही तर संतांच्या रचनेची विशेषताच असते. समजायला सोपी पण आचरायला कष्टसाध्य रचना संतांची असते.


आता हीच रचना बघा ना  - 


माझी पतिताची पापकृती खोटी 

तुझी पावन करण्याची शक्ती मोठी समजवता मी काय समजावून 

उठ अंबे तू झोपी नको जाऊ ॥१॥

जरी गेलीस तू माय बाई झोपी 

तरी बुडतिल भवसागरात पापी

ब्रह्मज्ञानीही लागतील वाहू ॥२॥

काम क्रोधादिक चोरटे गृहात 

शिरुनी पडले ते दृष्ट आग्रहात 

लुटू म्हणती हणू , मारू जीव घेऊ॥३॥ 

काळसर्प मुख वासुनी उशाला

टपत बसला तो, भिईना कशाला कितीतरी या निर्वाणी तुला वाहू ॥૪॥

कृपा सोडूनि निजलीस यथासांग उपेक्षीसी मज काय अता सांग 

कृपावंते निष्ठूर  नको होऊ ॥५॥

तुझ्याविण मी कोणाशी हात जोडू

 आई म्हणुनी, कोणाचा पदर ओढू

  तुझे पाय सोडुनि कुठे जाऊ ॥६॥

  जगी त्राता तुजविण कोणी नाही 

  माझी कोणी कळवळ जाणी नाही

  तूच जननी तू जनक बहिण भाऊ ॥७॥

    नको सांड करू माझ्या जीवाची

     तुला एकविरे आण भार्गवाची 

     नको सहसा जगदंबे अंत पाहू ॥८॥

      जरी माझी ना करिसी तू उपेक्षा 

      तरी वाढेल तुझे नाव याहीपेक्षा विष्णुदास म्हणे गुण तुझे गाऊ ॥९॥

      

विष्णुदासांचे रेणुकेशी आईचे नाते आहे. अवखळ वयातील मुले कमीच झोपतात.  आई  संसाराची सगळी कामे करून दमते , तिला झोप येते. आई झोपली की लेकरांना करमत नाही , आई तू उठ ना म्हणून मागे लागतात. ह्याच मूळभावाने  ही रचना झाली आहे. प्रत्येकच कडवे इतके लडिवाळ पण गभीर (आशयघन व सखोल) आहे की ज्याचे नाव ते !  


 आईपणाचा स्नेह व क्षमेचा पदर  इतका मोठा  असतो की मातृवत्सल बाळे  आडवळणाला जायला धजावतच नाही. वात्सल्याची हीच खरी कसोटी असते की  स्नेहानी बालकाचे अपराध लीलया संपून जातात. "मुलाचे कल्याण व्हावे" ही तीव्र इच्छा व कृती कायमच असते. शिवाय निखळ वात्सल्यामुळे बालकाच्या 'पापराशी' सहज वितळून जातात. जसा उजेड जास्त होत गेला की अंधार संपवावा लागत नाही , तो आपोआप संपतो.  म्हणूनच कवी विष्णुदास म्हणतात माझ्या सारख्या पतिताच्या पापराशींहूनही  , तुझी  पावन करण्याची क्षमता अतिशय जास्त आहे.   


"आई" केवळ शरीर-प्रक्रियेने घडत नाही तर मन-भावनांनी घडते.  "आई" होणे अपघातही असू शकतो पण "आईपण" मात्र संस्कारांनी  बाणवावा लागतो.   

आईला परोपरी समजावत आहे की तू झोपू नको ना गं ! पण आई ही मुळातच समजदार असते तिला समजवावे कसे ? हे ही मुलाला कळत नाही ना !  


आई झोपी गेली की चुकार , व्रात्य मुले नको त्या खोड्या करतात न् शहाणी मुलेही उगाच गमजा करतात.  जगदंबा जर झोपी गेली तर जगात भवसागर पार करूच शकणार नाहीत. ब्रह्मज्ञानीसुद्धा त्यांच्या ब्रह्मज्ञानापासून चळतील. 


 गृहकृत्यदक्ष आई गाढ झोपली तर चोरटे लूटपाट , प्रसंगी जीवहत्याही करू शकतात. जगदंबेच्या झोपण्याने कामक्रोधरूपी षड्रिपु  घरात शिरतील आणि सन्मार्गी साधकालाही आडमार्गी नेतील न् जीवाची अवनती करतील . 


जुन्या काळी घरात साप , विंचू  निघणे सामान्य असायचे. झोपलेल्याला वा गाफील असलेल्याला  दंश करायचे. जगदंबा झोपली तर  टपून बसलेला काळसर्प जीवात्म्याला दंश करणारच.  त्याला कोणाचीही भीती उरणार नाही.   अतिशय आर्ततेने , परोपरीने आईला विनवीत आहे की तू झोपी जाऊ नकोस.


आई ग , तू निष्ठूर होऊ नकोस , तू तर कृपाळू ,कनवाळू आहेस . माझी उपेक्षा कां ग करतेस ?  मुलांना कायमच वाटतं की आईने फक्त माझ्याच कडे लक्ष द्यावे , फक्त माझाच लाड करावा. सतत माझ्याच अवती भवती असावे. 


  आजकालच्या भाषेत "मी ममाज् बॉय" आहे .  शिवाय  'तुजविण अंबे मज कोण तारी' हे तर सत्यच आहे ना ? तुलाच अनन्यशरणागत आहो मी , जगदंबे तूच मला सांभाळ. आईचा पदर म्हणजे बाळाचे अभयस्थान असते.  मायच्या पदराची ऊब मोठ्ठ्या व्यक्तिमत्त्वालाही तान्हं करते.(अभिमानाच्या /बडेजावपणाच्या  झुला ,आईच्या ऊबदार  मायेत गळून पडायलाच हव्या.) 

  

  "त्वमेव माता च पिता त्वमेव , 

  त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव

   त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ,

    त्वमेव सर्वं मम देव देव " ॥  

     तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो ।

तुमही हो बंधू, सखा तुमही हो ॥

तुम ही हो साथी, तुम ही सहारे ।

कोई ना अपना सिवा तुम्हारे ॥

ह्याच  भावनेला किती सुरेख खुलवले आहे ना  या कडव्यातून ?  मराठी वाङ्मयाची महत्ता इथेही दिसून येते. आईशिवाय जगात इतर कोणालाही खरा कळवळा नसतो , हे खरेच आहे. 



     अजूनही रेणुका-आई म्हणावं तसं लक्ष देत नाही , आर्जवाला जुमानत नाही ; हे बघून विष्णुदास म्हणतात की तुला परशुरामची शपथ आहे , माझी आबाळ करू नकोस . ( परशुराम हे भार्गव गोत्रोत्पन्न म्हणजे भृगु ऋषींच्या चौतीसव्या पिढीत जन्मले , असे म्हणतात . शिवाय परशुरामाचे वडील- जमदग्नी हे भार्गव वशांचे प्रवर प्रमुख आहेत . )  

     

लहान मुलां इतके मानसशास्त्र कोणालाही येत नाही. आईला वळविण्यासाठी रडतील , पडतील ,  काय काय शपथा घालतील , कोणा कोणाचा धाक दाखवतील सांगता येत नाही. इथं बालमानसिकता छानच व्यक्त झाली आहे.



      'तुझ्या शिवाय मी किती पोरका आहे' हे सांगून झाले. तू दुर्लक्ष केल्यावर  घोर दुर्गती होईल , हे  ही सांगून झाले.  निर्वाणीचा इशारा देऊन झाला ,  आर्जव झाले , अनन्यशरणागती झाली , धाकही दाखवून झाला. आता मात्र  तिच्याच कर्तव्यपरायण लौकिकाला साद घालणे हेच शेवटचे शस्त्र ठरते. 

      "तू जर मला जवळ केलेस तर तुझीच कीर्ती वाढेल , माझे काय ? मी तर भक्ती करीनच ! तुझे नाव तूच सांभाळ ग बाई !" 

      The ball in your court madam , असाच काहीसा भाव यातून व्यक्त होत आहे. 

      आई-लेकराचा अनुबंध विष्णुदासांच्या लेखणीतून सहज उतरतो न् तो वाचकांच्या मनाचा ठाव घेतो. शिवाय अध्यात्माची आवड असलेल्यांना चिंतन करण्यास भाग पाडतो तर सामान्य वाचकांनाही भावविभोर करतो , यात शंका नाही. 

      ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

      नागपुर 


Tuesday, September 22, 2020

#सहजोक्त.

 माझी रेणुका माऊली....


'माझी रेणुका माऊली' ऊषा मंगेशकरांनी गायलेलं हे गाणं नवरात्रामध्ये बरेच ठिकाणी ऐकायला येते . अतिशय सुरेख चाल आणि  मंगेशकरी स्पर्श यामुळे हे गाणं लोकप्रिय तर होणारच ना !  गुगलवर शोध घेतला तर गीतकार म्हणून विष्णुदास हे नाव दाखवतात ! बिचारे विष्णुदास महाराज ! त्यांना काय कल्पना ? की भक्तशिरोमणी  , प्रसिद्धिपराङ्मुख असे ते पुढे  'गीतकार' म्हणून पडद्याच्या मागे राहतील न् आवाज देणारे त्यांची प्रसिद्धी करतील !  कालाय तस्मै नमः । 


माझी रेणुका माऊली।

कल्पवृक्षाची साउली ॥१॥

जैसी वत्सालागी गाय ।

तैसी अनाथाची माय ॥२॥

हाके सरसी घाई घाई ।

वेगे धावतची  पायी ॥३॥

आली तापल्या उन्हात ।

नाही आळस मनात ॥૪॥

खाली बैस घे आराम ।

मुखावरती आला घाम ॥५॥

विष्णुदास आदराने ।

वारा घाली पदराने ॥६॥ 


हे गाणं भक्तिगीत म्हणून  सर्वत्र गाजते . 

शाक्तपंथात देवीला स्त्री-ऊर्जा म्हणून पूजतात . इथे मात्र देवीच्या मातृरूपाची पदोपदी अाळवणी दिसते.  


  ' मानव' जर निसर्गाची उत्तम निर्मिती असेल तर स्त्री ही नक्कीच  सर्वोत्तम निर्मिती होय , यात शंका नाही. पण याच स्त्रीचे मातृत्वरूप हे जगातील सर्वोच्च व श्रेष्ठ अशी अवस्था असते. मातृत्व ही वृत्ती आतून येणारी न् सर्व विश्वाला   वात्सल्यधाग्यात बांधणारी असते. 

  " स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची आई असते"  या उक्तीला देवीही अपवाद नाही.  बाळाचे रक्षण करण्याच्या वेळी स्त्री अतिशय कठोर व सामर्थ्यशाली होते .  बाळासाठी संपूर्ण जगाशी ती वैर घेऊ शकते न् कोणत्याही परिस्थितीत बाळाला राखण्याचा आटोकाट प्रयत्न करते. 

  

 कल्पवृक्ष म्हणजे कल्पना करू ते सर्व सत्यात आणणारा वृक्ष . प्रत्येकच आई आपल्या बाळासाठी कल्पवृक्षच असते. तिच्या क्षमतांच्याही जास्त मुलांना मिळावे यासाठी झटत असते.  

गाय जशी धावत वासरापाशी येते , वासराला मिळावे म्हणून पान्हा चोरते , तशी रेणुकासुद्धा  सर्व अनाथांसाठी धावून येते. 

बाळाचा टाहो ऐकला की हातचे काम सोडून आई धावते , तशीच रेणुकाही येते. भक्ताने आर्ततेने आळवले की ती उन्हातान्हात  धावत येते. विदर्भातले उन्ह तेव्हाही प्रसिद्ध असावे.  

बाळासाठी आई सतत जागरुक असते . बाळाच्या संगोपनात  आळस , कामचुकारपणा याला थाराच नसतो.  तशी रेणुकाही  धावत आली. 


आईचे कर्तव्य रेणुका पुरेपूर पार पाडतेच . 'क्वचिदपि कुमाता न भवति।' हे त्रिवार सत्य आहे.  


आईने तर आईपण जागे ठेवले , आता बाळाची वेळ आली. "माझ्यासाठी आई इतके ताप न् कष्ट सहन करते" , याची जाणीव असलेला सुपुत्र इथे विष्णुदासांच्या पदांतून दिसतो.


"आई , तू उन्हात घाईने आलीस , तुझ्या मुखावर घाम आला , तू जरा बस , आराम कर "  इतके म्हणून विष्णुदास थांबत नाहीत , तर उपरण्याच्या पदराने वारा घालत आहेत.  आईच्या वात्सल्याला स्वतःच्या जाणीवेतून प्रतिसाद देत आहेत. आई आणि मुलाचे मनोबंध जगात अद्वितीय असतात.  ते या अभंगातून  उलगडलेले  दिसतात. 


बरेचसे धार्मिक वा संत वाङ्मय  प्रमाणभाषा-बोलीभाषा , प्रस्थापित साहित्य-विद्रोही साहित्य इत्यादी इत्यादी   कोणत्याही  वादात न फसता ,  या रचना सर्वतोमुखी होतातच आणि रचनांचा आशयही सर्वांना कळतो.  हेच या साहित्याचे मांगल्य आहे. 

  मला नेहमी विस्मय  होतो की कोण्या एका कोप-यात रचलेले हे  संत वाङ्मय असो वा धार्मिक वाङ्मय , संपूर्ण मराठी विश्वात वाणवल्या जाते. 

इतक्या सोप्या , आशयघन तरीही उच्च साहित्यिक मूल्य असलेल्या रचना या अभ्यासानी घडतात की तपाने ? हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

Monday, September 21, 2020

#सहजोक्त


विष्णुदास ~कविराज 

भारतात देविभक्ती सर्वत्र प्रचलित आहे.

बंगालची दुर्गा/काली , गुजराथेत दुर्गा , काश्मीरात शारदा , एकूणच भारतीय उपखंडांत ५१ शक्तिपीठे पसरलेली आहेत. ही सर्व शक्तिपीठे देवि-उपासनेच्या अतूट  धाग्याने जोडलेली आहेत. विभिन्नतेतही एकजिनसीपणा टिकवून ठेवण्याच्या अनेक कारणांपैकी हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे. 


 शाक्तपंथ म्हटला की 'तंत्र/तांत्रिक' यांचे जंजाळ आलेच असे सामान्यांना वाटते. वामाचतंत्राने भारतीयांच्या मनात गूढ व जुगुप्सित भाव निर्माण केले आहे. त्यामुळे शक्ति-उपासनेकडे बघण्याची सामान्यांची दृष्टी गढूळ झाली. परंतु 'सत्यं शिवं सुंदरम्' हे भारतीयांच्या गुणसूत्रातील शाश्वत सत्य आहे. वात्सल्य-प्रेम-भक्ती यांच्या द्वारे शक्तीची उपासना करणारे अनेक तीर्थक्षेत्रही भारतीय उपखंडात भरभराटीला आले आणि त्यांनी वामाचाराला गुप्त-लुप्त होण्यास हातभार लावला. 


 भागवत् धर्मातील प्रेमभक्ती विष्णुदासांच्या रचनेतून दिसते. अन्य पंथ मोक्षाला अंतीम ध्येय मानतात मात्र भागवत्धर्म मोक्षाहूनही भगवत्भक्ति व भगवत्प्रेम यांना अधिक महत्त्व  देतात.

 विष्णुदासांच्या रचनेतून आपल्याला हीच  वात्सल्यरसयुक्त अनन्यसाधन भक्ती दिसून येते.


इथे विष्णुदास रचित एक आरती देत आहे. हीच आरती पहिले कां निवडली ? तर माझ्या सास-यांना ती फारच आवडायची. महालक्ष्म्यांना आवर्जून हीच आरती म्हणायचे . या आरतीतील लयबद्ध ,पुनरुक्त ठेका मनाला आनंदित करतो. 


जय जय जगदंबे श्री अंबे 

रेणुके कल्पकदंबे

 जय जय जगदंबे ॥ध्रु॥

 अनुपम स्वरूपाची  तुझी धाटी 

 अन्य नसे या सृष्टी 

 तुजसम रुप दुसरे परमेष्ठी 

 करिता झाला कष्टी 

 शशी रस रसरसला वदनपुटी

  दिव्य सुलोचन दृष्टी 

  सुवर्ण रत्नाच्या शिरिमुकुटी

   लोपति रवि शशि कोटी 

   गजमुखि  तुज स्तविले हेरंबे 

   मंगळ सकाळारंभे ॥१॥ 

    कुंकुमचिरि शोभे मळवटी

     कस्तुरी टिळक लल्लाटी

      नासिक अतिसरळ, हनुवटी 

      रुचिरामृतरस ओठी 

      समान जणु लवल्या धनुकोटी

      आकर्ण  लोचन भ्रुकुटी

       शिरि  निट भांग वळी 

       उफराटि कर्नाटकाची धाटी 

       भुजंग निळरंगा परि शोभे 

       वेणी  पाठीवर लोंबे ॥२॥

        कंकणे कनकाची मनगटी 

        दिव्या मुद्या दश बोटी

         बाजूबंद नगे बाहवटी 

         चर्चुनी केशर उटी 

         सुगंध पुष्पाचे हार कंठी

          बहु मोत्यांची दाटी 

          अंगी नवी चोळी जरीकाठी

           पित पितांबर तगटी

       पैंजण पदकमली अति शोभे 

       भ्रमर धावती लोभे ॥३॥ 

           साक्षप तू क्षितिच्या तळवटी

            तूच स्वये जगजेठी 

       ओवाळिती आरती दीपताटी         घेऊनी करसंपुटी 

       करुणामृत  हृदये संकटी

       धावसि भक्तांसाठी 

            विष्णुदास सदा बहुकष्टी

             देशिल जरी निजभेटी 

             तरी मग काय उणे या लाभे

             धाव पाव अविलंबे ॥૪॥

             

  चार कडव्यांची ही आरती रेणुकाभक्तामध्ये प्रसिद्ध आहे. काव्यगुणांचा विचार करता यात यमक , अनुप्रासादी अलंकारांचा मुक्तहस्ते वापर केला आहे. आजच्या दैनंदिन (प्रमाण) मराठीतून काहीसे हद्दपार झालेले अनेक शब्द या आरतीत आहेत. जसे धाटी , चिरी , उफराटी , मनगटी ,नगे ,मुद्या  वगैरे. 

  आई ही ऐश्वर्यवती , सौभाग्यसंपन्न असून  सौभाग्यदायिनी आहे. त्यामुळे तिच्या दागदागिन्यासह भरजरी वस्त्रांचे वर्णन येथे केले आहे . रत्नांचे मुकूट  , दहाही बोटांत अंगठ्या , सोन्याच्या बांगड्या , हि-याचे बाजुबंद  , मोत्यांच्या हारांची दाटी , पैंजणे , जरीकाठी चोळी न् पितांबरी (रेशमी व पिवळ्या रंगांचे) पिवळे पातळ असे वर्णन आहे.

  उपमा , रूपकदी अलंकारयुक्त समास यांचाही सुयोग्य उपयोग केला आहे. पदकमल ,करुणांमृत , शिरीमुकुटी  वगैरे वगैरे.

  होयसळ-राजवटींच्याकाळी दक्षिणेकडे भारतीय संस्कृती व प्रगती अतिविकसित झालेली होती. कर्नाटक हे  तेव्हाचे प्रगत साम्राज्य होते. होयसळ कालीन मूर्ती ह्या अतिशय देखण्या व सौदर्यांचा परिपाक होत्या. मूर्तिकला व इतरकलांसाठी ते होयसळयुग अतिशय परमोत्कर्षाचे होते. या आरतीत देवीचे वर्णन करताना कर्नाटकाची धाटी (built)  म्हटले आहे.

   देवीच्या केसांचे वर्णन करताना,  'डोक्याचा नीट भांग पाडला आहे ' असे सांगून  ' निळसर , जाड , सापासारखी (एकसारखी) वेणी पाठीवर लोंबते आहे' ,  असे म्हटले आहे. निळसर झाक असलेले केस हे पतिव्रता स्त्रीचे लक्षण मानले जाते .

      आईच्या भुवया (दोन्ही) धनुष्याच्या टोकासारख्या तीव्र , अणुकुचिदार न् वक्र आहेत. (धनुकोटी = धनुष्याच्या टोकासारखे)  आकर्ण लोचन म्हणजे डोळे मोठे व लांब असे सुंदर आहेत.  

      

 कपाळावर कुंकुम (केसर) चिरी (रेष) आहे. कस्तुरीचा टिळा आहे. (शाक्तपंथाची खूण म्हणजे टिळा)   नाक सरळ आहे. खाली हनुवटी आटोपशीर आहे. अोठ रसरसित (तजेलदार) आहेत. (शुष्क निस्तेज नाहीत)  सर्वांगाला केशराची उटी लावली आहे.

 

  अशा आईची महती गात विष्णुदास दीपयुक्त  ताटानी (तबकानी ) अोवाळत आहेत. आईने लगेच येऊन  (अविलंब) हात धरून घ्यावेत न्  नीजभेट द्यावी.  

  

  अशा प्रकारे आईची विनवणी करताना तिच्या संपूर्ण स्वरूपाचे अत्यंत उत्कट व बारकाव्यांसह वर्णन , करून तिने बालकाला जवळ घ्यावे  हा या आरतीचा मूळ सारांश होय.

   या आरतीतून शक्तीची मातृरूपाने आळवणी केली आहे. 

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

   

  

             

Sunday, September 20, 2020

सहजोक्त

 #कवि विष्णुदास.

माहूर हे साडेतीन शक्तिपीठातील एक जागृत-तीर्थक्षेत्र आहे.

शक्तिपीठांचा स्वतःचा असा एक इतिहास असतो , संस्कृती असते. माहूरलाही ती आहे. माहूर बाबतील अजून एक  खास वैशिष्ट्य आहे.  रेणुका देवीचे अभंग , जोगवे , पदे , आरत्या आदी विपुल भक्तिसाहित्य सर्वत्र सहज उपलब्ध आहे.

 धार्मिकसाहित्याकडे 'साहित्य'  म्हणून बघण्याचा कल नसतोच. धार्मिकसाहित्यावर श्रद्धेचा असा काही पगडा असतो की त्या साहित्याचा रसास्वाद घेण्यापेक्षा , त्यातील भाषिक सौंदर्य आस्वादण्यापेक्षा , निव्वळ भक्तिभावाने ते साहित्य म्हणणे , यातच सगळे भाविक समाधानी असतात.  आणि इतर अभ्यासक या साहित्याच्या वाटी जातच नाहीत. यामुळे  पद , पाळणा , शेजारती , विडा , प्रसाद , जोगवा , आरती वगैरे वगैरे  रचणारे रचनाकार  साहित्यक्षेत्रात तसे अप्रसिद्ध राहतात. 

आरती संपवून प्रसादाची घाई जास्त असल्यामुळे आरतीच्या शेवटच्या चरणातील कवीची नाममुद्रा वाचूनही त्या पलीकडे काहीच माहीत नसते. याच वागणुकीने , अत्यंत धार्मिकपणा असूनही  धार्मिक साहित्यिकांना अज्ञातवास सोसावा लागतो.  नावापलीकडे ते बरेचसे अज्ञातच असतात.

रेणुकेसंबंधी दर्जेदार , अत्युच्च साहित्यिकमूल्य असलेले विपुल लेखन करणारे  "विष्णुदास"  हे ही तसे अज्ञातच  ठरले .  अहमदनगरातील धांदरफळ हे मूळ गाव असलेले  विष्णुदास यांचे मूळ नाव कृष्णाजी रावजी धांदरफळे होते. त्यांचा जन्म  सन 1844  सातारा येथे  झाला तर   माहूर (मातापुर)  येथे सन1917  मध्ये समाधीस्थ झाले.   शेवटच्या काळात  त्यांनी संन्यास घेतला होता त्यामुळे  त्यांचे   नाव परिव्राजकाचार्य  पुरुषोत्तमानंद सरस्वती असे  झाले होते. सर्व साहित्यात मात्र "विष्णुदास" हीच त्यांची नाममुद्रा होती. 

विष्णुदास यांच्या रेणुके विषयक काही निवडक रचना अशा....

  •आली आई भवानी स्वप्नात 

  •माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साउली

  •जय जय जगदंबे श्रीअंबे रेणुके कल्प कदम्बे॥

  •जय जय रेणुके आई जगदंबे ।अोवाळू आरती मंगलारंभे ॥

•विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबरा श्री रेणुके वो । 

•जय जय रेणुके ,सदा सदय तू प्रसन्न रूपमूर्ती 

•जय जय नदिपती प्रिय तनये ।भवानी महालक्ष्मी माये 

•जय जय श्री रेणुके , अंबे मुळपीठनायके हो ,अोवाळू आरती सौभाग्य दायके हो ॥

•अखिल पतितांची दुरित कृति केली।

•लक्ष कोटी चंडकीर्ण सुप्रचंड विलपती

•श्री मूळपीठ शिखर स्थळ कोटी लक्ष।

•सदा सर्वदा मोरया शारदाही ।

•जय जय विश्वपते हिमालयसुते सत्यव्रते भगवते ।

•माझि पतिताची पापकृति खोटी। 

•आम्ही चुकलो जरी तरी काही , तू चुकू नको अंबाबाई ॥

•अंबाबाई माहूर, आता राहिले दूर ।

•दीनअनाथांची आई, तुला म्हणती अंबाबाई ॥

विष्णुदास हे भक्त म्हणून थोर होतेच . ते अत्यंत अधिकारी संतपुरुष होते.  त्यांच्या साहित्यातून त्यांना जाणून घ्यावे ,  साहित्यातून भक्तीसह भाषावैभव समजून घ्यावे आणि  जे आपल्याला गवसले ते सर्वांना कळवावे या भावनेतून लेखन आरंभले आहे.

 🙏श्रीरेणुकार्पणमस्तु ।🙏

 डॉ. प्रज्ञा देशपांडे 

  















Saturday, August 29, 2020

#सहजोक्त.

 


#सहजोक्त.

बाईचे वय हा फारच कळीचा मुद्दा असतो. कोणत्याही स्त्रीला तिचे वय विचारणे हा शिष्टाचाराचा भंगच नसून  फार मोठा अपराध  आहे , असं समजतात. 

"आँटी मत कहो ना !" हे केवळ स्त्रियांसाठीच असतं , असं कुटाळ , कुविचारी मंडळी मानतात. 'संतुर' हे महिलास्पेशल समजतात , हीपण पुरुषी मानसिकताच.   बाकी  "प्रत्येकालाच मिरवताना चिरतारुण्य हवे असते न् जबाबदारी पडली की वृद्धत्वाचे फायदे हवे असतात !"  , हे ही समाजात दिसते. 


जोक , टोमणे सोडून द्या . पण क्वचित विरळच  स्त्री स्वार्थकेंद्री वागते. बहतेक सगळ्याच स्त्रिया आपलं कुटुंब , आप्त स्वकियांचा गोतावळा लीलया सांभाळत , नोकरी/उद्योग  वगैरे करीत घराला हातभार लावत असतात. या सगळ्यांमध्ये त्या घरातल्यांची शुश्रुषा  परिचर्या करतात न् स्वतःकडे हमखास दुर्लक्ष करतात . कोणी प्रामाणिकपणे कबूल करो अथवा न करो , स्त्रियाच संसाराचा कणा असतात. सगळ्यांसाठी झिजता झिजता तिचे आयुष्य संपून जाते.  नेमकी स्वतःसाठी न् स्वतःपुरता ती जगतच नाही . मग  प्रश्न पडतोच की तिचे  नेमके वय काय मानावे ? 



  यावर उपाय सुचला . कोणत्याही स्त्रीचे वय दोन पद्धतीने मोजावे. 

  आणि महत्त्वाचे म्हणजे जिचे वय मोजायचे आहे तिला महिला न म्हणता मुलगी म्हणावे !

  

  पद्धत क्रमांक १ > 

  तसं जगातील समस्त मुलींचे कमाल वय १६ हेच असते , हा ठराव कायद्याने संमत करून घ्यावा. सोळाव्या वर्षांच्या नंतर फक्त अनुभव  वाढत असतो.

जसं  => वय १६ वर्षे  + अनुभव ३૪ वर्षे. 

 महिलेचे वय  ५० वर्ष ठरविणारे शुद्ध वेडे असतात , त्यांना कायद्याने कठोर शिक्षा देण्याची तरतूद असावी. 


पद्धत क्रमांक २ > 

तिला पहिले अपत्य ज्या वर्षी झाले , तेच  तिचे कायमचे वय . कारण आई म्हणून  बाळासोबत तिचाही नवाच जन्म होत असतो. तिचे व्यक्तिगत प्राधान्यक्रम केवळ अपत्याभोवती   फिरत असतात.   पूर्वीची ती न् नंतरची ती पार वेगळीच असते. 

जसे  => तिला  २६ व्या  वर्षी  अपत्य झाले . म्हणजे स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती कायम २६ वर्षांचीच मानावी. अपत्यजन्मानंतर तिच्यातील  "आई" पण जन्माला आली ना !  म्हणून जसे जसे मूल वाढेल तसे  तसे आईचे वय  ठरवायचे.   म्हणजे ती  किती वर्षांची ? तर मुलाच्या  आईपणाच्या वयाचीच !!  

तिचे वय  २६ +१ 

२६+२ .....या प्रकारे मोजावे. उगाच  ૪० /५० असं अविवेकी मोजणी करू नये.


अजून कोणाला कोणती पद्धत सुचत असेल तर नक्की सांगा. 

तर हे झाले "महिला-वय-महात्म्य"! 

पुरुषांनाही  उगाच मन कोतं करून घेऊ नये .  वय मोजण्याचे विविध उपाय  त्यांनीही सुचवावेत.  एखादा लेख "त्याचे वय" यावरही लिहिता येईल.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



 


Tuesday, August 4, 2020

#सहजोक्त.

.

 पूर्वार्ध

जगात सद्गुणांना प्रतिष्ठा मिळाली तुझ्याच मुळे.
तूच नात्यांचे सुंदर बंध जपायला शिकविले.
 
त्यागाची परिसीमा स्वचारित्र्यातून गाठलीस तू . 
वै-याशीही कसे वागावे हे ही शिकविलेस तू.

सर्व सुरळीत असताही  अल्पसंख्यांकाच्या आरोपास बधला.
बहुसंख्य सोबत असूनही , असंतुष्टांना झेलत बसला.

स्वतःच्या चांगुलपणात तुझा तूच अडकला. 
परिटाचे काय गेले? आप्त-स्वकीय भरडला. 

कर्तव्यकठोर भूमिकेने  तुझ्या अर्धांगिनीची परवड झाली.
 पितृगृही जन्माच्या हक्कापासून लवकुशही वंचित झाली  .
 
कळवळले मन सीतेचे पण तिने सारे पचवले.
 शेवटी सल उरात ठेऊन तिथेच भूम्यार्पण केले. 
 
 सर्व दुःख , सर्व सल पचवून तू रामराज्य घडवण्यात मग्न झाला .
 सर्वस्व अर्पून , लोकरंजनात रमला न् जनहृदयी राम झाला.
 
 जन मनात वसला राम , अयोध्या मात्र आढ्य झाली.
 जिथे तिथे शंकासुराचा बाणा उगारत सुटली.
 
 तू होता तोपर्यंत सर्वत्र राम होता
 नंतर केवळ नावातच  सत्य उरला.
 
 उत्तरार्ध 


तू होता तोपर्यंत सर्वत्र राम होता
 नंतर केवळ नावातच  सत्य उरला.


असे वाटून  प्रतिष्ठितकलियुगात अयोध्या शेफारली.
 सीताचारित्र्य सोडा चक्क जन्मभूमीवरच शंका घेऊ लागली.
 
 तेव्हा सुद्धा अल्पसंख्यांकरंजन केले होते रामानी.
 तोच वसा चालविला नंतर येणा-या शासकांनी. 
 
 दुष्टांचे काय गेले ?आरोपास्त्र उगारत सुटले .
वर्षानुवर्षे तेच सल , तेच पीळ, जनतेनी अनुभवले.

  सीतेचा वसा जपत भूमी दान करून टाका.
 निर्लज्ज आरोपकर्त्यांनी असा सूर  लावला .

  न्यायालयातील अग्निपरीक्षा शेकडो वर्षे चालली.
आरोपकांची हवस तरीही संपता संपली नाही.

तेव्हा एकच परिट होता , आता हजारो झाले.
त्रेतायुगातून कलियुगात प्रगत पुरोगामी झाले .

 न्याय झाला , मुक्त झाली जन्मभूमी  प्रिय रामाची.
 आरोपकांना बक्षिसी द्या हो सीताजन्मस्थानाची  .
 
धरणीमाते उदार होऊन घे की त्यांना पोटात.
शंकासुरांचा नाश करूनि यावे रामराज्य विश्वात .

मर्यादापुरुषोत्तमच्या मंदिराची    अयोध्येत स्थापना  व्हावी.
कोदंडधारी रामाने आक्रमकांना कायमची अद्दल घडवावी. 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
५.८.२०२०
नागपूर

Saturday, August 1, 2020

सहजोक्त. कविता

असेच सौख्य नांदू दे 
 असेन  मी जरी नसेन मी ॥ध्रु॥
नको तडाखा उन्हचा 
असो ही सावली सदा 
स्नेह शिरवा पावसाचा
तृप्तसा अलवार साचा ॥१॥

 ही फुले उमललेली
बहरल्या वृक्षवेली
दिनरात असावी अशी
समृद्ध सोज्वळ सन्निधी ॥२॥

सुसंगतीचे सुख हे
सर्वदा तुज लाभू दे
सर्व सुखाचे हो घडे
चरणी तुझ्या अर्पू दे॥३॥

भोवती राशी सुखाच्या
नित्य बरसो रे तुझ्या
निमिष तरी विरहाचा 
व्याकळावा तूझ्या मना॥૪॥

परिपूर्त असूनि क्षण असा
 एक अवघा तो असावा
 ज्यामुळे आयुष्य सारे
 मज विना व्यर्थ व्हावे ॥५॥
  
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

 

Thursday, July 30, 2020

#सहजोक्त.


#दोन  श्रुतकथा . 
(१) एकदा मराठीच्या अध्यापकांच्या समोर प्राचार्य राम शेवाळकर उद्बोधन करीत होते.  एका अध्यापिका ने प्रश्न विचारला की ," मराठीमध्ये डिस्टिंक्शन कां मिळत नाही ?"  त्यावर शेवाळकरांनी उत्तर दिले, " तुम्ही देत नाहीत म्हणून !" 

(२) दुसरी घटना अशी आहे की नागपूर विद्यापीठात बरेच वर्ष मराठी  MA ला बी प्लस ग्रेड ने उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीला विशिष्ट  पुरस्कार मिळायचा.  अनेक वर्ष तो पुरस्कार मिळविणारी व्यक्ती   विद्यापीठाला लाभत  नव्हती. 
नंतर काही वर्षांनी यूजीसीचे नियम बदलले . 55 टक्के च्यावर गुण असल्याशिवाय नेट सेट परीक्षेला पात्र ठरणार नाही . ही अट आली आणि कशी काय जादू झाली , माहिती नाही . पण 55 च्या खाली गुण मिळविणारे आताशा कमी झालेले आहेत. किंबहुना  ७५% च्या वर अधिक आढळतात. 


या दोन घटना ! यावर भाष्य काय करायचे ?

 एकंदरीतच   फक्त बोर्डाचे  रिझल्ट ,  इतकच नाही  तर  केजी टु पीजी अशा सर्वच परीक्षांचे रिझल्ट याकडे फार वेगळ्या पद्धतीने बघाणे गरजेचे होत आहे.  किमान  शिक्षकांनी तरी गुणवत्ता  ही फक्त मार्क ओरिएंटेड राहणार नाही ,  याची दक्षता घ्यावी की काळाचा महिमा म्हणून सोडून द्यावे ?    ज्याचे त्याच्या परी . नव्या धोरणाकडे आशेने बघावे. आशा बलियसी ! 
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, July 26, 2020

#सहजोक्त ~

शब्दचिंतन .

काल  एका समूहावर "कलदार" या शब्दावरून  चांगलीच  चर्चा रंगली  होती . सकाळी एकत्र वाचून बौद्धिक चालना मिळाली. बरेचसे शब्द संस्कृत-शब्दकोषात  सापडतात , असा अनुभव आहे. 
मला संस्कृत , मराठी , पाली शब्दकोषांतून शब्द  बघायला आवडतात. 

कलदार हा शब्द प्रत्यय घटित प्रकारातील पण मिश्र प्रवृत्तीचा आहे असे वाटते. "द‍ार" हा प्रत्यय  खचितच पाली , मराठी वा संस्कृत नाही. खबरदार , चौकीदार  वगैरे वरून तो फारसी किंवा अरबी असावा .( मला या भाषांची माहिती नाही. )


निरुक्तकार यास्काचार्यांच्या मते कोणताही शब्द हा धातूजन्यच असतो. म्हणजे प्रत्येक शब्द हा कुठल्यातरी मूळधातू पासूनच तयार होतो. काळाच्या अोघात शब्द-निर्मितीची प्रक्रिया लुप्त होते. पुढे त्या शब्दाचा असा भाषिक प्रवास ( विकार ,आगम ,विपर्यय आदींनी ) होतो की मूळ रूप व प्रचलित रूप वेगवेगळेच वाटते.  असो.

कोषांमध्ये मला  "कल" या शब्दासाठी अनेक अर्थ दिसले .  जसे मधुरध्वनी , सालवृक्ष ,कोलिवृक्ष , शुक्र , अजीर्ण  (इति राजनिर्घण्टः । कलयति मान्द्यं नयति जाठराग्निम् ।) , अस्पष्ट आवाज ,  गोंगाट  आदी.   याच कल पासून कलकलाट , कलरव कलकल अादी  आहेच.  [ हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकांनी !, अशी काव्यपंक्ती आहे. इथे काका म्हणजे कावळा असा अर्थ आहे ].

शिवाय  "कल्ल"  हा शब्द   'अव्यक्त शब्द ' या अर्थाने योजतात . यापासूनच  कल्लोळ  हा शब्द तयार होतो.  पुढे याचेच समुद्रकल्लोल , संशयकल्लोळ आदी तयार होतात.  आमच्या नागपुरी ग्रामीण भाषेत "कल्ला करणे " (गोंधळ , गोंगाट करणे  या अर्थी ) असाही वाक्प्रयोग आहे. 


कल् हा मूळ धातू  (गतौ , सङ्ख्याने , क्षेपे , शब्दे)  गतिवाचक , मोजमापीसाठी , क्षेपणासाठी व शब्द या अर्थाने  योजतात.  (कलते आकलते, सङ्कलते, परिकलते, प्रत्याकलते, विकलते।)

कल् याच धातूपासून  "काल" (काळ)  हा शब्द तयार झाला आहे.
शिवाय  कलन , संकलन  , विकलन , आकलन  हे ही त्याच्याच पासून शब्द आहेतच .

शब्दांचा प्रवास एकाच भाषेतून जरी झाला तरी  काही काळाने अोळखेनासा होतो , त्यात इतर भाषांतून आलेले शब्द मिसळले की मग विचारायलाच नको. 
 
शब्दकोषांच्या वाचनानी बरीच माहिती मिळते. कोणत्याही भाषेचा विशेष लोभ वा द्वेष न करता  शब्दांचा तर्कसंगत समूळ प्रवास उलगडण्याकडे माझा 'कल' असतो. 

या सर्व शोधाशोधीत  "कलदार" शब्द अगदी  तसाच्या तसा मिळाला नाही. लहानपणी चांदीचा अंश असलेल्या रुपयाला कलदार म्हणायचे , बंदा रुपया म्हणायचे.  नंतर नंतर सर्वच नाण्यांना (खणखणीत  आवाज करणारी ) कलदारच म्हटल्या जायचे.  

तसं बघता रुपया ( रुपे= चांदी) या पासून तयार झालेला शब्द असून कालांतराने अॅल्युमिनियम , पितळ , तांबे , निकेल आदी कोणत्याही धातूपासून तयार झाल्यावरही रुपयाच ठरला , तसं इथे झालं असणं शक्य आहे.  
असा हा शब्दाचा कलदार प्रवास खाचखळग्यांसह जाणून घ्यायला हवा. 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.


.
आमच्या हडस शाळेचे माजी विद्यार्थी म्हणजे खासच रसायन असतात. ते ज्या ज्या क्षेत्रात जातात , तेथे  विशेष स्थान प्राप्त करतात. शिवाय कितीही ज्येष्ठ-श्रेष्ठ झाले तरी शाळेशी जुळूनच असतात. हे शाळेचे भाग्य न् विद्यार्थ्यांच्या संस्कारी व्यक्तिमत्वाचे दर्शन होय. शाळेला आता ७८ वर्षे झालीत पण माजी विद्यार्थ्यांच्या मनातील तिचे मानाचे हार्द स्थान तसेच आहे.
हडसचे विद्यार्थी सर्वोत्तम कार्य करत त्या त्या क्षेत्राला मोठे करत आहेत. आज भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आमच्या शाळेची ही नररत्ने विखरून चमकत असतात. असे एकही क्षेत्र नाही ज्यात आमचे विद्यार्थी नाहीत !
देशाविषयी कृतज्ञता , अभिमान दर्शवण्यासाठी काही दिनविशेष असतात . त्यापैकी एक म्हणजे कारगील-विजय-दिन. कारगील हे सर्वोच्च उंचीवरील युद्ध-क्षेत्र आहे. 
या निमित्ताने आठवले की , "भारतात लडाख प्रदेशात सर्वोच्च उंचीवरील धावपट्टी आहे. या धावपट्टीला  पुनरुज्जीवित करून  लढावू विमान उतरवण्याचे विक्रमी कार्य केलेले महान देशभक्त व शूर सैनिक आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी  एअर व्हाईस मार्शल (सेवानिवृत्त) सूर्यकान्त चाफेकर हे आहेत.
"प्रतिपक्ष" नावाचे मराठीतील गाजलेले न् लाखांच्यावर प्रेक्षक लाभलेले युट्य़ूब चॅनेल आहे. त्यात श्री. चाफेकरांची मुलाखत दोन भागांतून प्रकाशित झाली आहे. त्यांच्या या अतुलनीय पराक्रमाची दखल तत्कालीन राष्ट्रीय व अांतर्राष्ट्रीय  माध्यमांनी घेतली होतीच . पण इतके वर्षांनंतरही त्यांच्या पराक्रमाची उपयुक्तता व महत्व  तसुभरही कमी झालेले नाही.
ती मुलाखत बघतांना  श्री. चाफेकरांचे व्यक्तिमत्व प्रकट होते.  देशप्रेम , आत्मविश्वास , हटके विचार करण्याची वृत्ती , मराठीवरील प्रभूत्व , विनम्रता न् मुख्य म्हणजे निगर्वीपणा आदी गुण , त्यांच्या विषयीचा  आदर  वाढविणारे ठरतात.
श्री . चाफेकर यांच्या बद्दल आवर्जून  सांगण्यासारखं म्हणजे मला मराठी शिकविणा-या आवडत्या चाफेकर बाईंचे ते सुपुत्र होत.  ' चाफेकर बाई म्हणजे मराठीच्या सर्वोत्तम शिक्षिका'  , हे माझेच नाही तर लोकांच्या शाळेत शिकलेल्या सर्वच विद्यार्थीनींचे निश्चित मत  आहे.
भारतीय वायुदालातील सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या संमिश्र वातावरणात  अनेक वर्षे र‍ाहूनही श्री. सूर्यकांत चाफेकरांची मराठी भाषा आजही उत्तम असण्याचे कारण म्हणजे चाफेकर बाईच ! श्री. चाफेकरांची मराठी ही   शब्दशः व व्यावहारिक अर्थानेही मातृभाषा आहे , हा विलक्षण योगच आहे.
आपण सुखाने जगत आहोत , त्यासाठी कितेक ज्ञात-अज्ञात  शास्त्रज्ञ , शेतकरी , सैनिक , समाजसेवक  आदी अखंड राबत असतात , याची जाणीव ठेवून वागण्यासाठी असे दिनविशेष  साजरे करणे गरजेचे आहे. 
या छोटेखानी माहितीवाजा लेखनासह कार्यक्रमाची लिंक पाठवत आहे. सर्वांनी नक्कीच बघावी . 
https://youtu.be/2FXbKhny8ag

तुमच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत...
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, July 24, 2020

#सहजोक्त.

कविता.

नागोबाला गर्व झाला
म्हणे मीच भयंकरा
बाधे माझे विष ज्याला
नाही उपाय जीविताला ।१।

गेला मानवा डसाया
पण  वार हो चुकला
स्वतः वेगे  गवसला
सर्पमित्राच्या हो जाळ्या ।२।

विष काढूनि विकले
नागाला सोडून दिले 
  विषाची केली लस
नसे भीती लवलेश  ।३।

जरी असे मी विषारी
मानव महाभयंकारी
हालाहलही बापुडे
त्याच्या वासनेच्या पुढे ।૪।

काय माझा लागे पाड
मानवी लालसा द्वाड
तृष्णेच्या ह्या कुबुद्धीने
ठरे  क्रौर्य दीनवाणे ।५।

पुन्हा नको वाटी जाणे
मानवाच्या संग रहाणे
निसर्गाचे हो हत्यारे
मानव दुरून साजिरे ।६।
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.







Wednesday, July 22, 2020

सहजोक्त.


देवा तुझा रे लहरी ,
 खेळ उन्ह-पावसाचा 
शेतक-याच्या मनात 
पिंगा आशा-निराशेचा ॥१॥
धोका देण्याचे कसब 
शिकविले मानवाने 
गुरुनिसर्गाला जणु
 केले बाधित संसर्गाने ॥२॥
सत्ता गाजवण्याची हाव,
कशाला तू बाळगतो?
यादवी मानवातील 
कां निसर्गात घडवीतो ॥३॥ 

मानवाचे कोतेपण
 स्वार्थी सुखाची तहान ।
अंगीकारोनी  कशास 
 करी स्वतःला लहान ?॥૪॥
बापा निसर्गा नको रे 
वागू मानवासारखा ।
माणुसकीच्या सद्गुणाला
 नको होऊ तू पारखा ॥५॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Monday, July 20, 2020

सहजोक्त.





दिवस उजाडतो मालवतो , काळ समोर जातो , कालगणना माणूस करतो , ना सूर्याला त्याचे भान ना पृथ्वीला खंत-खेद ! त्यांच्या गतीत खंड नाही ,  त्यांच्या मनात बंड नाही , कारण त्यांना मुळात सिद्धच करायचे नाही !  

नदी उगमापासून ते मिलनापर्यंत वाहत असते अखंड सदोदित .
तिच्या गावीही नसते कोणत्या गावातून , कोणत्या प्रदेशातून ती जातेय , कोण्या भागाला ती समृद्ध करून सोडतेय.  कोसळते , अडखळते , खोल गर्ता निर्माण करते , डोहात सामावते , बागबगिचे फुलवते कधी , वाळवंटही करते कधी . 
लोकं मोजतात लांबी-रुंदी आणि तिची खोली. धरणे-बांध-बंधारेही बांधून करतात विकास स्वतःचा , रोखून नैसर्गिक मार्ग तिचा . थबकते , बदलते तरी वाहतेच वाहते , नव्या रूपात न् स्वरूपात. नदी म्हणूनच नदी असते कारण तिला कुठे काय सिद्ध करायचे असते ? 

झाडही तसेच माळावर , बांधावर , रस्त्याच्या काडेवर  उगवते , जगते , येण्या-जाण्या-यास  समाधान देते. कोणी तोडले तरी परत जगते. किती अवर्षण किती अतिवर्षण सहज पचवून परत जगते. फुले देते , फळे देते , बसाल छायेत तर ती ही देते.  आपल्याच गतीने न् यथेच्छ मतीने झाड बहरते , वठते.   उपेक्षेने खंगत नाही , कौतुकाने पुष्ट होत नाही.  सिद्ध करायची गरजच नसते कारण झाड , झाडासारखेच असते. 

"आमची काळजी घेते , आमची विचारपूस करते , स्वयंपाक छान बनवते , घराला घरपण देते , शिकलेली असून मर्यादेत रहाते , कमावती असूनही माज नाही" ,  या सगळ्या अोझ्यात  "ती" मात्र अभिमन्यू होते. 
जरा कुठे चुकली की माहेरपासून , अकलेपर्यंत उद्धार हा ठरलेलाच . डिग्रीवरही प्रश्नचिह्न कायमच रोखलेले . 
तिची इच्छा असो नसो , तिलाच सर्व जोखत असतात ,पारखत असतात , पदोपदी अग्निपरीक्षा तिलाच तिलाच द्यायला सांगत असतात . तिच्या अस्तित्वासाठी प्रत्येक गोष्ट , प्रत्येक क्षण  सिद्ध करायला भाग पाडत असतात. 

समाजाने चौकटीची मखर पूर्वापार केलीय , त्यात मातृशक्ती ,नारायणी म्हणून तिला बसवली आहे.  जन्मापासून मृत्यूपर्यंत तिला सिद्धच करायचे आहे , नवे नवे उच्चांक तिने सतत गाठायचे आहे , आदर्शाचे अोझे तिनेच वाहायचे आहे , स्त्रीत्वाची अनमोल किंमत तिला नेहमीच चुकवायची आहे.

"तू चांगली मुलगी आहेस , चांगली बहीण , चांगली पत्नी आहेस , चांगली मैत्रिण आहेस न् चांगली आई आहेस ,
एक कर्तृत्ववती स्त्री आहे , बुद्धि-सौंदर्याने युक्त आहेस , गृहकृत्य दक्ष आहेस , उत्तम  बॉस आहेस , सर्वच क्षेत्रात अव्वल आहे." 
या सर्व अपेक्षा वजा आज्ञा त्यांच्या असो वा तिच्या  ; पाळता पाळता ती मूळात उरलीच कुठे ? 
सतत समज आल्या पासून केवळ 'त्यांना' चांगले वाटावे म्हणून सारखी धडपडते आहे .     

#आताशा ना मला सिद्ध करायचा कंटाळा आला आहे .  म्हणजे काय समजू मी ? माझा  जगायचा अधिकार संपलाय ? 
छे ; अजिबात नाही.  ब्रह्मदेवाला बाजूला सारून मी परत जोमाने नवसृष्टीची  रचना  करायची वेळ आता आली आहे !  
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, July 19, 2020

#सहजोक्त.


एक दिवस कोरोना सा-या जगावर रुसला ।
म्हणे कां उगाच बागुलबुवा तुम्ही मला केला ?
चायनीज माल कधी टिकाऊ असत नाही।
आता पर्यंत अनेकदा सिद्ध केलय , नाही ?
मी काही यमाचा होलसेलर दूत नाही ।
आलो उगा घाबरवायला मला कामं नाही ।
वेगवान चालत्या गाडीला बघा मी खिळ घातली।
जगाच्या विकासचक्राची गती मी थांबवली ।
तुम्ही सगळ्यांनी माझ्या नावानी  व्यापार केला भीतीचा ।
असले नसले सारे प्रयोग खपवताय नावे माझ्या ।
 सुखी कितीतरी जंतू न् विषाणु मानवी देहात नांदतात ।
मग माझ्याच छोट्या अस्तित्वाचा किती बवाल करतात ?
विविध रोगांनी पोखरलेल्या शरीरात मी जातो ।
त्याच्या लवकर मुक्तीसाठी मीच कारण ठरतो ।
कँसर , टिबी , हार्टप्रॉब्लेम आणि  वार्धक्यरोग ।
किडनी  ,डायबेटिस , बिपी आदी इतर गुप्त रोग ॥
कावळा बसायला न् फांदी तुटायला एकच पडली गाठ।
तसेच माझ्या प्रवेशाचे निमित्त झाले अफाट ॥

व्यायाम , शुचिता , शिस्त, नियम सारे धु-यावर बसवले ।
जीर्ण रोगी शरीर गेले, बिल माझ्या नावे फ़ाडले ।
 निसर्गावर कुरघोडी करण्यात अख्खी हयात गेली ।
 समस्त मानवांनी पहा  दुनिया वेठीस धरली ॥
 आलो मी , गाजलो मी , जरी नाही पूर्ण कळलो ।
हाव सोडा,  निसर्गाकडे वळा न्  सुधरा रे मानवांनो ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, July 16, 2020

सहजोक्त


अौचित्यहीन.
काही कारणाने काही काही गोष्टींचे औचित्य नष्ट होते. औचित्य नष्ट होण्याची अनेक कारणे असू शकतात. पण परिणाम मात्र एकच की गोष्ट असूनही औचित्य संपलेले असते.
काही परंपरा , रूढी  , कर्मकांड यांना जसे लागू पडते तसे वस्तु , प्रसंग , साहित्य , व्यक्ती यांनाही ते लागू पडते. 
औचित्यहीन गोष्टी अप्रासंगिक , संदर्भहीन सुद्धा ठरतात. 
आता हेच बघा ना. पूर्वी पत्रलेखन ही कला होती.  पुराणकाळापासून ते दशकापूर्वी पर्यंत तिचे महत्त्व होतेच. शालेय शिक्षणात अौपचारिक न् अनौपचारिक पत्रलेखन पाठ्यक्रमाचा भाग होते. पुराणात रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहिले होते. इतिहासात संयोगितेने पृथ्विराजाला पत्र लिहिले होते. चाचा नेहरुंनी तुरुंगातून छोट्या इंदिरेस लिहिलेल्या पत्रांचे पुस्तकरूप आज उपलब्ध आहे.  पत्रातून इतिहास कळतो , तसा पत्राने इतिहास घडवलाही आहे. जसे  'ध'चा 'मा' पत्रातूनच झाला.  
अनेक दिवस डोक्यात विचार घोळवून , पत्र लिहायला घ्यायचे , कितेकदा खोडतोड करीत कच्चे लिहायचे मग ते एकदाचे फेअर उतरवायचे. पोस्टात टाकायचे , खूप दिवसांनी पत्र मिळायचे . मग पत्राचे पहिले वाचन मग आवर्तन मग त्याच्या उत्तरासाठी केलेली तजवीज .   मग उत्तर लिहून पाठविण्यासही  तसेच सायास करायचे. असा एकूण पत्रांचा प्रवास असायचा. 
साधे पोसचटकार्ड , इन्लँड , लिफाफा वगैरेंसह गुलाबीपत्रे इत्यादी सर्वच पत्रप्रकार आपापले महत्व टिकवून होते. 
पण हाय रे दैवा. इंटरनेट , डिजिटलायझेशन , स्मार्ट फोन आदी मंडळी आल्या नि बिनबोभाट चालणारा पत्रव्यवहार ठप्प पडला. 
परिणामी आज पत्रलेखन-प्रकार अप्रस्तुत , अप्रासंगिक  झाला. "पत्र" प्रकारच अौचित्यहीन  झाल्यामुळे  "पत्र"
विषयक  सर्वच साहित्य बादच झाले ना ! 
कितेक हिंदी/मराठी सिनेमाची गाणी खत , चिठ्ठी , पत्र यावरून आहेत . जसे
•लिखे जो खत तुझे जो तेरी याद में हजारो रंग के सितारे बन गये...
•ये मेरा प्रेमपत्र पढकर कि तुम नाराज ना हो ना ...
•चिठ्ठी अायी है , आयी है चिठ्ठी आयी है....
•आपका खत मिला आपका शुक्रिया ....
•हम दोनो मिलके चाहत से खिलके चिठ्ठी लिखेंगे जबाब आयेगा...

असे बरेच गाणे , प्रसंग ; जरी आज औचित्यहीन वाटत असले तरी अविस्मरणीय ठरलेले होते.
असे प्रसंग वा गाणे तुम्हाला आठवत असतील तर कॉमेंट-बॉक्स मध्ये कळवा. 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Wednesday, July 15, 2020

सहजोक्त.

#कृष्णकथा .
कृष्ण मग तो कोणत्याही रूपातील असू दे , मनमोहनच ठरतो. आबालवृद्धांना कृष्णाच्या कथा आवडतातच . अशीच एक कृष्णकथा. 
इंद्राच्या नंदनवनात असलेल्या या झाडाच्या फुलांच्या सुगंधाने मोहून जात कृष्ण ती फुले वेचतो , द्वारकेत येतो रुक्मिणीच्या महाली न् सहज तिच्या हातात ती स्वर्गीय सुगंधी फुले  देतो ,सहाजिकच ती मोहरून जाते. कृष्ण निघून गेल्यावर शेजरच्या सगळ्या सवती गप्पा मारायला जमतात.  नव-याचे आपल्यावर प्रेम आहे ह्याची फक्त जाणीव बायकोला पुरेशी नसते तर चारचौघात त्याचे प्रदर्शन करणे आवडत असते. रुक्मिणी स्त्रीसुलभ भावनेने ती फुले सगळ्या जणींना दाखवते . इतर  सर्व सवती तिच्या आनंदात सहभागी होतात.  वरवर दाखवले नाही तरी सत्यभामेला आतून प्रचंड राग येतो. मुळात सत्यभामा अतिशय रूपगर्विता असते . शिवाय तिच्याकडे स्यमंतक मणी असतो ,जो रोज आठ भार सोनं देत असतो. (स्यमंतकाची कथा पुढे कधीतरी .) ती फारच श्रीमंत असते . कृष्णाने फक्त न् फक्त माझ्याचकडे जास्त लक्ष द्यावे असे तिला कायम वाटत असते. 'कृष्णाने रुक्मिणीला फुले दिली म्हणजे माझ्या सौंदर्याचा न् प्रेमाचा अपमान झाला, मी हरली' असे ती मानून घेते.  जेव्हा कृष्ण तिच्या महाली येतात , तेव्हा ती फारच रुसलेली असते. तिला समजवण्यासाठी कृष्ण बरेच प्रयत्न करतात . 'न च सुंदरी करू कोपा  मजवरी धरी अनुकंपा' अशा प्रकारे लाडीगोडी लावू लागतात. पण स्त्रीहट्ट सोपा नाही. तिचा एकच हेका , 'तिलाच कां फुले दिलीत , मग मी कोण? माझं स्थान काय ? वगैरे वगैरे '  शेवटी कृष्ण तिला म्हणतात , "अग बाई नको अशी रागावू , तिला दिली फुलं ,चुकलंच माझं !पण तुला झाडच आणून देतो , मग तर तू खूश होशील ना ?" झालं बाई जरा खुलतात. पण विसरत नाहीत. कृष्ण परत नंदनवनात जातात न् इंद्राला मागून त्या स्वर्गीय वृक्षाचे रोपटे आणतात, द्वारकेत सत्यभामेच्या अंगणात लावायला. बाईंची कळी खुलते . बालकवी या प्रसंगाचे वर्णन 'श्रावणमासी' कवितेत करतात की ," पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला" . अंगणात कुंपणाच्या कडेला लावलेले ते झाड छान मोठे होते , फुलांनी बहरून येते. पण जास्ती फुले नेमके शेजारी असलेल्या रुक्मिणीच्या घरी पडतात ,असे नारद तिच्या लक्षात आणून देतात. मग काय ? "फुले कां पडती शेजारी?" असा भुंगा हिच्या डोक्यात लागतो. (त्यावरूनही पुढे कथा घडते ,ती पुढच्या भागात.) 
तर कथेचा मथितार्थ असा की कृष्णासारखा द्वारकाधीश बायकोच्या  नखरे व संशयातून सुटला नाही , तर बाकीच्या पामरांनी ,"आलीया भोगासी असावे सादर" , कायम रहावे , हेच बरे ! 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.


एक लबाड कोल्हा असतो. तो तळ्याच्या काठाने शिकार शोधत फिरत असतो. तळ्यात एक करकोचा असतो. कशी काय माहीत ? पण दोघांची मैत्री होते. करकोचा कोल्ह्याला तलावातील माश्या पकडून देत असतो. रोज रोज चवदार माश्यांचा पाहूणचार खाणारा कोल्हा , एकदा  आपल्या मित्राला अगत्याने घरी बोलावतो.  म्हणतो ,"मित्रा , तुझ्या स्वभावावर भाळलेला मी , तुझा उत्तम पाहूणचार करून जराशी उतराई होऊ इच्छितो. तर कृपया माझ्या घरी ये."   साधा-भोळा करकोचा निमंत्रण स्वीकारून कोल्ह्याकडे जातो.
कोल्ह्याच्या गुहेत. जंगी पार्टी असते. खास पाहूणा अर्थात करकोचा असतो.
जेवणात खीर बनवलेली असते. जेव्हा दोघेही जेवायला बसतात , कोल्हा दोन थाळ्या घेतो न् खीर वाढतो. करकोच्याची चोच लांब असते. त्याला थाळीतून खाणे जमत नाही. इकडे कोल्हा (हे सगळं लक्षात येऊनही) त्याला आग्रह करत असतो. "मित्रा , इतक्या मेहनतीने खास तुझ्यासाठी सारं केले. पण तू नीट जेवतच नाहीस . मी नाराज होईल अशाने !" वगैरे वगैरे.
करकोचा म्हणतो ,"अरे खातोच आहे मी , बघतोय ना तू ".
झालं .करकोचा उपाशीच घरी परततो.
#बालवाङ्मयातील ही कथा ,आजही बोधप्रद आहे.
• समाजात विविध लोकं र‍हतात. मदत केल्याचे दाखवून स्वतःचेच हित साधतात.
•  मैत्री आहे ,असे भासवून शत्रुवत् वागतात.
• शब्दाला जागण्याचा दिखावा करतात न्  शब्द फिरवतात.
• विश्वासु म्हणवतात न् नेहमी विश्वासघात करतात.
 •स्वतः मूळे व्यवस्थेत प्रचंड गोंधळ उडवून द्यायचा न् मीच कसा सांभाळतो हेच सांगत सुटायचे .

ही तर मोठमोठी उदाहरणं झालीत. दैनंदिन जीवनातही छोट्या छोट्या गोष्टींतून लबाडीचा गुणधर्म लपता लपत नाही काही जणांचा.


जसं
•फोन करीन म्हणायचं न् फोनच नाही करायचा.
•नक्कीच येतो सांगायचं न् यायचेच नाही.
•फोन ब्लॉक करायचा न् नेटवर्क इश्यू सांगायचे.
•भरपेट खाऊन यायचे न् खुशाल उपास आहे म्हणायचे.
• एखादा पदार्थ आवडतो  म्हटलं की नेमकं त्याची अॅलर्जी आहे म्हणायचे.
• आपण रीतसर निमंत्रण दिल्यावरही  , मिळाले नाही /अोहो उशीरा पाहिले / घरातील लहानग्यांनी फोन बिघडवला/ नेटवर्क इश्यू आहे अशा सबबी द्यायच्या.
• काँन्टॅक्ट लेन्स लावायचे न् डोळ्याला चष्मा नाही सांगायचे.
• चिल्लर पैसे नाहीत , झाली की परत करतो ,असे नेहमीच सांगायचे.
 इत्यादी इत्यादी

तुमच्या अवती भवती असे लबाड-कोल्हे (इथे स्त्री व पुरुष असा भेद नाही) असतील तर आठवा न् तुम्हाला नेमकं काय सबबी सांगितल्या वा कशा टोप्या घातल्या ते आठवून मेसेज बॉक्समध्ये कळवा .😊
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, July 14, 2020

सहजोक्त.



#शब्दचिंतन.
मनस्वी , मनसोक्त , मनःपूर्वक, मनापासून.
आजकाल शुभेच्छा देताना 'मनस्वी शुभेच्छा वा अभिनंदन'  असं म्हणण्याचा प्रघात पडू लागला आहे. "भारी शब्द" वापरून  समोरच्यांना प्रभावित करण्याच्या हौसेतून अश्या  अनेक शब्दांना योजल्या जाते. 
पण हे शब्द नेमके कोणता अर्थ व्यक्त करतात ? असे बघणे गरजेचे आहेच. त्याही पलीकडे शब्द कसे तयार झाले ? हे ही विचारात घ्यायला हवे. 

मनस्वी =  मनस्विन्  या    पुल्लिंगी विशेषणाचे प्रथमा एकवचन आहे. "मन (ताब्यात) आहे असा".  याचेच स्त्रीलिंगी रूप 'मनस्विनी' , असे होते. मनस्विता  हेही भाववाचक रूप आहे. याला तद्धित-रूप  असे म्हणतात.  मनस्विता या शब्दाचा अर्थ मनस्वीपणा हा होईल. 

मनस्वी हा शब्द एका विशिष्ट प्रक्रियेने झाला आहे. मनस् + विनिः = मनस्विन् हे तद्धित-रूप आहे. 
 विनि प्रत्ययाचा अर्थ "असलेला , झालेला , मिळालेला" वगैरे होतो. 
 याच शब्दासारखे आणि व्यवहारात प्रचलित असलेले अनेक शब्द आहेत. जसे तपस्विन् (तपस्वी/तपस्विनी ) , यशस्विन् (यशस्वी/यशस्विनी) , तेजस्विन् (तेजस्वी/तेजस्विनी) , ओजस्विन् (ओजस्वी/अोजस्विनी)  .
 मूळात मनस्विन् हे विशेषण आहे. त्याचा प्रचलित अर्थ-  मन-मानेल तसा वागणारा , स्वैर वागणुक असलेला , मोकाट - आदी अर्थच्छटेने घेतल्या जातो . 
शुभेच्छा किंवा  अभिनंदन मनस्वी कसे काय असेल बरे ?  

मनसोक्त =  प्रचलित भाषेत मनमुराद , मनाप्रमाणे , मन मानेल तसं  आदी अर्थाने हा शब्द आहे. 
पण हाही शब्द जरा वेगळा आहे . मनसा + उक्तम् = मनसोक्तम्  असा संधी सह असलेला शब्द आहे तो. मनसा म्हणजे मनाने . उक्तम् म्हणजे सांगितलेले. मनसोक्त म्हणजे मनानी सांगितलेले.
या प्रकारातीलही अनेक शब्द भाषेत आढळतात. जसे शास्त्रोक्त (शास्त्रात सांगितलेले/म्हटलेले)  , वेदोक्त (वेदांत सांगितलेले/म्हटलेले) , श्रुतिस्मृतिपुराणोक्त , उपरोक्त ( वर सांगितलेले /म्हटलेले)   वगैरे . 
आपण मात्र  रूढं अर्थानुसार "मनसोक्त" वागावे ! 

मनःपूर्वक = मनापासून या अर्थाचा  हा शब्द. अभिनंदन , शुभेच्छा , सदिच्छा  इत्यादी  मनापासूनच करायला पाहिजे  , होय ना ? मनस्वी म्हणजे मनमानेल तशा नकोत . 

मनापासून = हा शब्दाचा अर्थ इतका स्पष्ट आहे की याला स्पष्टीकरण कशाला हवे ना ?  

आपला भाषिकस्तर  उंचावण्यासाठी शब्दांचे कोशातील अर्थ बघणे , या पलीकडे शब्दांच्या व्युत्पत्ती देखील लक्षात घ्यायला हव्या. 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 





 
  

Wednesday, July 8, 2020

#सहजोक्त







*उपकार घ्यायला शिका*. 

लॉकडाऊन पूर्वी पर्यंत ब-याचशा सामान्य लोकांचीही जीवनशैली अत्यंत वेगवान् आणि गरजेपुरता संबंध अशी झाली होती. समाज विकसित होत होता पण भौतिक-सुबत्तेतच . एकाएकी  ही अनन्यसाधारण स्थिती उद्भवली न् विचार करण्याची वेळ आली .
 
फार वर्षापूर्वी मध्यमवर्गीय घरांघरांतून सहज उसन्या वस्तु आणल्या जायच्या . अगदी बुटली भर दूध , अर्धी वाटी साखर पासून ते सणावरी भारी कपडे वा दागिणे यांची हमखास देवाणघेवाण चालत असे. त्यात फार वावगं कोणालाही वाटत नसे.  देणाराही उपकाराच्या नव्हे तर मैत्रीच्या संबंधाने देई न् घेणाराही तसाच असे. प्रत्येकालाच एकमेकांची गरज पडे . या देवाण-घेवाणीमुळे आडनिडीला धावून जाण्याचे संस्कार घरातूनच होत असे. "पैश्यापेक्षा माणसं जोडावी" , हे पुढच्या पिढ्यांना स्वतःच्या उदाहरणातून द‍ाखवणारी पिढी नामशेष होत आहे , आताशा.  

जसे जसे समाजात पैसा येऊ लागला , वस्तुंची सुबत्ता वाढली तसं तसे "शक्यतो दुस-यांची मदत घेऊच नये" , असे वागणे वाढू लागले.  
पूर्वी लग्नकार्य असले की गोतावळा जमा होऊन कामात मदत करीत असत. कधी त्या कामात हातभार लागे कधी मनाजोगं काम होतही नसे. पण कोणालाही दीर्घ काळ वाईट वाटून घ्यायची सवय नसे. 
आता मात्र "सारं कसं पर्फेक्टच झाले पाहिजे" , या हट्टाने इव्हेंट मॅनेजमेंट, कॅटरिंग वगैरे बोलावतात . तेही ठिक,  पण बोलताना वर ऐकवतात की "आम्हाला कोणाचे उपकार घ्यायची गरज काय ? पैसा फेकला की सारं मिळतेच आजकाल" . 
 "कोणाची" हा शब्द इतका  सापेक्ष आहे की यात शेजारी , मानलेले नातेवाईक ,  चुलत घराणं , सासर-माहेर इतकेच काय तर सख्खे जन्मदाते , वेळ प्रसंगी जोडीदार  इत्यादीही असू शकतात.  पराकोटीचा "आत्मनिर्भर" (की धननिर्भर) पणा आजकाल समाजात दिसतो.
 पैशांमुळे  "अहं" पराकोटीचा वाढलाय की कोणीही  कोणाला सहनच करत नाही . निखळ प्रेमानी स्वीकारणं फारच दूर राहीले.  त्यामुळे पैसा हे सुखी जीवनाचे  साधन न र‍हता साध्य होऊन बसले . तर  नातेवाईक , मित्रमंडळ हे  साध्य न होता साधन झाले जीवन जगण्याचे. 
 यातून प्रचंड घोळ झाला आहे. आज कोणीच समाधानी दिसत नाही. मनापासून संतुष्ट , सुखी असा कोणीच  नाही.  'असं असं घरात असेल तरच सुख' ,  'हे हे वागलं , केलं की सुख' अशा  सुखकल्पनांच्या अोझ्यांसह धापा टाकत पाय-या चढण्यात जो तो मश्गुल. 
 
  पैसा-सत्ता-अहंपणा यांच्याच प्रभावात जगण्याची धूंद चढली आहे.  अमुक एका उंचीवर चढायची प्रत्येकाची अोढ . आणि तिथे दुसरा नसावाच याची सर्व प्रकारे खबरदारी घेणे सुरु. (इथेही दुसरा ही सापेक्ष संज्ञा आहे , ज्यात 'मी' सोडून सर्व जगच असू शकते)  मग चढून गेल्यावर एकाकी पोकळी असणारच . ती एकाकी पोकळी दूर करण्यासाठी मग "षौक"  पोसणे वा आभासी जगात जगणे हे अोघाने आलेच . 
  या दुष्टचक्रात आज बरेचजण अडकलेले दिसतात.  वास्तवात सुखी-समाधानी  असण्यापेक्षा , दाखविण्याकडे जास्त कल आहे समाजाचा. सुखाचा आभास करीत  "निर्लेप"(काहीही लावूनच न घेण्याची वृत्ती)  जगण्याची वेगवान घोडदौड सुरु झाली आहे.  सुखांची मृगजळे सर्वत्र फैलले ,  संतृप्ती न् संतुष्टी मात्र दिसत नाही. 
  या दुष्टचक्रातून निसटायचे असेल तर माणसं  रुजवायला , कमवायला , जोपासायला , वाढवायला  शिकावेच लागेल .   छोट्या छोट्या गोष्टींचे उपकार करण्या-घ्येण्याचे संस्कार प्रयत्नपूर्वक  स्वतःवर  करायला हवे .  न्  त्या उपकारांची परतफेड  कोण्या दुस-यांवर  जास्त उपकार  करून फेडत जावे . उपकार-रूपी चलन समाजात मोकळेपणानी रुळू द्या.  पैशापेक्षा हे चलन जास्त प्रभावी न् समाधान देणारे नक्कीच ठरेल. 
 समाज निर्लेप नको तर निकोप हवा .  त्यासाठी "उपकार करण्याचा वसा " घेऊ या.   जशी "गुरुच्या वस्याची परतफेड पुढील  पिढीला ज्ञानदान करून होते" , तसेच उपकाराचेही होऊ द्यावे .  
 "उपकार घ्यायला , न् रुजवायला शिका."   हा नवा मंत्र  नव्या जीवनमानाची सुरवात ठरेल यात शंका नाही. 
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 
  
  
  
 
  
 
 

Thursday, July 2, 2020

सहजोक्त.


#चित्रकविता
*स्त्रीभ्रूणाचे बीज*

अोसाड माळरानी,
 शुष्क धरा उललेली
  दगडी कपारित,
   बीज पडले कधी तरी
नाही ऊब ना माया
निसर्गाची हो करणी
जीव बिजाने धरला,
 कोणाच्या नसे गावी ॥१॥
बीज अंकुरले अहा ,
इवलीशी पाती पहा
कोवळा जीव तान्हा
 सुकुमार कोमलसा
किती छोटीशी नाजूक
त्याची इवलीशी काया 
कसं पेलावे आव्हान
 दुष्ट जगाचे या सा-या ?॥२॥
वरी टणक जमीन
आणि मोठाला हा धोंडा
कसा साहवे हा भार
अंकुराचा जीव तान्हा
 विपरित परिस्थिती ,
 विरोधी हा उन्हवारा
 देवा कसा तुझा न्याय ,
  कां बा घेतो रे परीक्षा ?॥३॥
 अहो आश्चर्य जाहले !
 अंकुरे दगड भेदिले
 कठोरत्व दगडाचे
 न् कोमलपण अंकुराचे
 स्वभावाला न च त्यागिले ,
  तरी जीवनी जिंकले
  दगडाला भेदूनिया
  बीज-अंकुर टरारले ॥૪॥
बीजासम स्त्रीभ्रूण
माते उदरी अंकुरते
नकुशीच्या पोटी बघा
 नकुशीच चाहूलते
जरी जग तिचे वैरी
जन्माच्याही आधी होते
दोन्ही घरा उजळून
क्षमाशील धरणी होते ॥५॥
© *डॉ.प्रज्ञा देशपांडे*.
नागपूर

Sunday, June 21, 2020

#सहजोक्त.

#शब्दचिंतन
खरे तर किती तरी दिवसांपासून शब्दचिंतन लिहायचं लिहायचं असं डोक्यात होतं . आज दुपारी तर चक्क शब्दरंजनही केलं , पण लिहिलं नाही . मग मात्र  स्वतःलाच ताकीद दिली न् लिहायला (म्हणजे टायपायला) बसली.
# तुझे ठायी माझी भक्ती । विरुढावी गणपती॥
तुझे ठायी ज्याची प्रीती । त्याची घडावी संगती ॥
#ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ॥
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥
#म्हातारा इतुका न अवघे , पाऊणशे वयमान ।
दंताजीचे उठले ठाणे , नन्ना करिते मान !।
#ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी । शुद्ध वस्त्री,  शुद्ध मनी ॥
हे झाले गीत , अभंगातील . आता व्यावहारिक भाषेत बघू .
#त्याचा कुठेच धड ठिकाणा नसतो.
#ध्रुवाचे स्थान अढळ अाहे.
# पोलिसठाण्या समोर मारुती मंदिर  आहे.
#ठाई ठाई तोच भरलाय चराचरात.
#बसस्थानक इथून जरा दूर आहे.
# ऐकणा-यांच्या मनाचा ठाव घेणारे त्यांचे शब्द सर्वांना  तोषवायचे.
#काय देवा , असता कुठे आजकाल ? काय ठावठिकाणा नाही ?
#अजुन किती वेळ तिष्ठत राहायचे ?
 कळवून टाका म्हणावं एकदाचं काय ते !
 # अतिपावसामुळे  फारच वाईट स्थिती झाली बघा शेताची.
 #अशा भीषण महामारीमुळे  सर्वच सार्वजनिक कार्यक्रम स्थगित केले आहे.
 #या संबंधीचे स्थगन आदेश वरूनच आले आहेत.
 # स्थिर मन आणि फिरते शरीर हेच स्वस्थ जीवनाचे रहस्य आहे.
 #विधिवत् स्थापन केलेली मूर्ती .

वरील पैकी  अनेक वाक्यांमध्ये   असे काही शब्द आहेत , ज्याचा अर्थ "स्थान"  हा  होतो.
ते शब्द आहेत , ठिकाण , ठाणे , ठायी , ठाई , ठाव , ठाणं ,  ठावठिकाणा , स्थानक , तिष्ठत रहाणे ,   इत्यादी.

हे सर्व शब्द वेगवेगळे दिसतात . ह्या शब्दांचे व्युत्पत्तिस्थान  एकच आहे.
स्था (तिष्ठ)  [ थांबणे)   या मूळ धातू पसरलेली ही विविध रूपे आहेत.
स्था > स्थान > ठाण  > ठाणे
स्थायी >  ठाय > ठायी >  ठाई
स्थायी > ठाय > ठाव 
स्थानक > ठानक  > ठिकाण
स्था> तिष्ठति > तिष्ठत  (रहाणे).
या शब्दांपैकी आजच्या दैनिक भाषेत आपण किती शब्द सहज योजतो /वापरतो ? याचा प्रत्येकानी विचार करावा. आपली भाषा किती समृद्ध आहे  , हे जाणून जास्तीत जास्त आपले शब्द वापरावेत.

 स्थानवाचक शब्दांशिवाय  इतर शब्दांचाही विचार करू.   स्थिर , स्थिती , स्थगन , स्थगिती , स्थापना 
ही सुद्धा  स्था(तिष्ठ) याच मूळ धातूपासून तयार होतात.
याशिवाय परिस्थिती , संस्था  वगैरे शब्दांतही हाच मूळ धातू आहे.

शब्दांचा अभ्यास करणे म्हणजे महावृक्षाची पाने मोजत बसण्यासारखं आहे.   तर मूळ धातूंचा अभ्यास करणे बियांची परीक्षा करणे होय.
 दैनिक बोलचालीत  आपल्याला मूळच कळले तर नवनविन शब्द घडवताही येतील .
 जुन्या-नव्या  , प्रमाण-बोली आदी सर्वच भाषांमधले शब्द अधिकाधिक वापरून भाषाश्रीमंती वाढती ठेवावी , नाही कां ?
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








Thursday, June 18, 2020

#सहजोक्त.

#बागड/अमरवेल/परजीवी
आमच्या लहानपणी सगळ्या घरांच्या कुंपणाला हिरवीगार , कडवट वासाची बागड  ऊर्फ मेंदी असायची. भींतीसारखी जाड ,हिरवीकंच राखण्यात गृहस्वामीचे कौतुक असे . सरसकट सगळ्यांचे जीवन सायकल सारखे विना प्रदूषण ,विना आवाजाचे अन् स्वतःच्या कुवतीच्या गतीने पुढ सरकणारेे होते. कुठेच कर्णकटू भोंगे वा अोव्हरटेक नव्हते. वेगाचा उन्माद नव्हता.
जाड भींतीसारख्या बागडीतून अंगणातले आवाज ,अंधूक दृश्य रस्त्याहून दिसे न् घराच्या अंगणातून रस्त्यावरचे सारे दिसे.लाकडी फाटकाशी उभे राहिले तर सरळ मागच्या अंगणात काय सुरु आहे हे दिसणार ! इतकी सरळ ,पारदर्शी गृहरचना सगळ्यांचीच होती.  न मागता सर्वत्र  ट्रांसपरेंसी हेच त्याकाळाचे व्यवच्छेदक लक्षण .  सायंकाळी उन्हं  उतरल्यावर अंगणात पाणी शिंपडतांना मेंदीवरही शिंपडायचे. गार झुळूक अोघाने यायची.
दुपारी बक-या पाळणारे कळप घेऊन समोरच्या मैदानात येत. बक-यांना ,गाई-म्हशींना ही बागड खाद्य म्हणून चालत नसे कदाचित तिचे वेगळे कडवटपण कारण असावे. मग असे मेंढपाळ त्या मेंदीवर पिवळ्या रंगांचे वायर सारखा  वाढणारा पशुखाद्य असा  अमरवेल टाकायचे. त्या हिरव्याकंच बागडीवर पिवळाजर्द तो वेल ; रंगसंगतीनुसार तसा छानच दिसत असे. आम्ही वायर म्हणून अोढून खेळायचो त्याच्याशी. या हिरव्या बागडीला उग्रवासाची पांढरी फुले यायची . त्या फुलांचा गजरा कोणीच घालत नसे कारण त्या फुलांमुळे डोक्यात उवा होतात असा समज! या पिवळ्या वायरवेलालाही पांढरट तु-यासारखा  बहार यायचा. 
या पिवळ्या वेलीमुळे बागड सुकते ,पिवळीवेल परजीवी तर आहेच पण ज्यांच्या जिवावर जगते त्यांना ती जगू देत नाही ,त्यांचा जीवनरस शोषून घेते असा अनुभव आहे. म्हणून मोठी जाणती माणसं या पिवळ्या वायरीला खेचून काढायचे.
बरेच दिवसांनी बाळपणीचा हा अनुभव  दृष्टांतासारखा सुचला काही प्रसंगावरून  ! चालायचेच  !!!
बागड ,अमरवेल , मेंढपाळ ,गृहस्वामी , रंगसंगतीने डोळ्यांना सुख वाटणारे आमच्या सारखे दर्शक  आदी सगळे  "जीवो जीवस्य जीवनम्।" साधणारे घटक होय ; हे मात्र निर्विवाद !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, June 15, 2020

सहजोक्त

#शब्दचिंतन .
काल सारखंच आजही ढगं दाटून आले. भर दुपारी अंधार पडला . न् पाऊस कोसळू लागला.  लाईनही गेली .मग काय करावं ? खिडकीत बसून  धो धो कोसळता पाऊस , अंधारलेलं आसमंत न् चिंब भिजणारी झाडं-पाखरं बघू लागली. अशा पावसाळी , काळोख्या दिवसाला संस्कृतात  'दुर्दिन' म्हणतात. किती चपखल आहे ना ?

 या अंधारी पावसाळी दिवसाला "मेघाच्छन्नदिनम् " असं अमरकोशात म्हणतात.  दुर्दिनाला घनान्धकार सुद्धा म्हणतात.  दुर्दिन म्हणजे काय तर  “घनान्धकारे वृष्टौ च दुर्द्दिनं कवयो विदुः ॥”  बरसणारा  घनांधकारी दिवस .

 संस्कृतातील किती तरी काव्यांमध्ये कवींनी  या दुर्दिनाचे वर्णन अतिशय हळूवारपणे न् प्रणयपोषक केले आहे.
 अशा दुर्दिनी अभिसारिका लपत छपत अभिसार करायला जाते वगैरे. जसे कुमारसंभवात एके ठिकाणी ,   “यत्रौषधिप्रकाशेन नक्तं दर्शितसञ्चराः । अनभिज्ञास्तमिस्राणां दुर्दिनेष्वभिसारिकाः ॥"(। ६ । ४३ ।)

संस्कृत साहित्यात  दुर्दिन हा प्रेमी जीवांसाठी भलेही सुयोग न् आनंददायी वर्णिला असला तरी  सामान्यांना तो काहूर माजवणारा , हुरहूर वाढवणारा,  काहीसा उदास वाटतो.

 खरोखर मनाला चुटपूट लावणारा हा दुर्+दिन असतो कां ?  रिकाम्या मनाला हे चोचले सुचणं स्वाभाविक आहे.
 "सम्प्राप्ते दुर्द्दिने काले दुर्द्दिनं भाति वै नभः ॥”(हरिवंशे । ६७ । ६६ । )   एकूण मनच निराश असेल तर सर्वच अंधारलेलं दिसते.

  स्वतःच्या कर्तव्यात अखंड बुडलेल्यांना सुदिन काय की दुर्दिन काय ? सारे सारखेच असतात. आपले कर्तव्य नियमितपणे केले की  अशुभ काहीच होत नाही. सर्वच शुभ घडत असते.
 “सुदिनं दुर्द्दिनञ्चैव सर्व्वं कर्म्मोद्भवे भव । तत् कर्म्म तपसां साध्यं कर्म्मणाञ्च शुभाशुभम् ॥”  ( ब्रह्मवैवर्त पुराण)

ढगाळ पावसाळी  बरसत्या काळोख्या दिवसाला भलेही दुर्दिन म्हटले तरी कर्तव्यपरायणांसाठी  सगळेच दिवस सुदिन  अन् कामचुकारांसाठी  सगळेच दिवस दुर्दिन असतात , हेच खरे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








Sunday, June 14, 2020

#सहजोक्त.


संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुख दुःखांची
जाणीव तिजला नाही ....
गाणं बरेचदा कानावर पडले आहे.  नदीवर मानवी भावभावनांचा आरोप करून चेतनगुणोक्ती साधत केलेलं हे काव्य. आधुनिक वाल्मिकी , रससिद्ध कवीश्वर ग. दि. माडगुळकर यांची ही रचना.

कवितेचा संपूर्ण आशय बघता  , 'नदी तिच्या गतीने वाहते , कोणी पूजा वा निंदा , तिला व्यवधान नाही. तीरावरच्या मानवी सुख-दुःखांशी घेणे-देणे नाही.'
हे सर्व आरोप नदीलाच नाही तर  सगळ्या निसर्गाला लागू होतात. दगड , माती ,डोंगर ,तलाव , झाडे , जंगल , जंगली श्वापदे न्  धादांत स्वार्थी माणूस !  नाही कां ?

निसर्ग परवडला एकवेळेस ! किमान तो इतरांना दावणीला जुंपत नाही . पण स्वकेंद्री माणसाचे नेमके उलट असते. असो. 

तसं बघता वृक्षवल्ली , पर्यावरण घटक 
इतरांच्या जीवनात स्वार्थी लुडबुड न करता ,  आत्ममग्न राहून सर्जकतेने स्वतःचे जीवन जगत असतात.  त्यांचे जगणे परस्परानुकूल तरीही  आत्मनिर्भर असेच असते  . आणि यांच्या अशाच जगण्याने मानवी जीवन समृद्ध होत असते.

कल्पनारम्य म्हणून असा विचार करू की हे निसर्गघटक मानवी भावभावनांच्यात गुंतू लागले. मग तेही कोणाशी तरी जवळिक साधतील. कोणाला तरी फटकारतील . कोणावर मेहरबान होतील तर कोणाला दे माय धरणी ठाय करतील .
इतकेच नाही , तर त्यांच्यातही उच्च-नीच , गरीब-श्रीमंत , मूलनिवासी-उपरे , अल्पसंख्याक -बहुसंख्याक असे भेद होतील . मानवी स्वभावाशी सह-अनुभूत झाल्यावर त्यांच्यातही वैचारिक , तात्विक  वगैरे संघटना होतील.  तसेच तेही सोयीचे राजकारण करतील.
असं झाले तर काय भीषण होईल , होय ना ? माणसांना जगताच येणार नाही. म्हणून निसर्गघटक अलिप्त असतात हेच उत्तम .


मानवांनी आपले गुण निसर्गावर आरोपित करण्याची इच्छा न करता निसर्गाकडून खूप काही शिकावे.
बाह्य परिस्थितीला न जुमानता आपल्याच गतीने ,आपल्याच प्राणशक्तीने  पण  प्रचंड स्वयंशिस्तीत जगण्याचा या निसर्गाचा गुण माणूस इतके वर्षात कां घेऊ शकला नाही ? याचे निसर्गालाही कोडे पडले असेल नाही कां ?
त्यामुळे संथ वाहणा-या कृष्णामाईला वाहू द्यावे , निसर्गाला त्याचे निसर्गत्व निभवू द्यावे. इतकी माणुसकी नक्की जपावी.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Sunday, June 7, 2020

सहजोक्त

#शब्दचिंतन.
आज एक मराठी वाक्प्रचार आठवला.
"कच्छपी लागणे" . कच्छपी लागणे याचा अर्थ आश्रय करणे , तंत्राने चालणे , मागे मागे करणे , त्रास देणे ,पाठपुरवठा करणे , नादी लागणे इत्यादी होतो.
शब्दांचे चिंतन करायला मनापासून आवडते. आज हा वाक्पचार आठवला मग लागली याचे चिंतन करायला.
कच्छ , कच्छप , कच्छपी हे वेगवेगळे शब्द तर आहेतच त्यांचा अर्थही वेगवेगळा आहे.
कच्छ म्हणजे पानथळ जमीन , समुद्रकिना-याची पानथळ जमीन , नावेचा विशिष्ट भाग , दलदलीचा भाग वगैरे अर्थ होतात.
कच्छप  याचा अर्थ  गूढाङ्गः , धरणीधरः, कच्छेष्टः , पल्वलावासः , कठिनपृष्ठकः , पञ्चसुप्तः, क्रोडाङ्गः म्हणजे  कासव . कच्छपचा अजून एक अर्थ लाल देवदार  असा होतो. असे म्हणतात की कच्छप हा मल्लयुद्धातील एक पवित्रा अथवा चाल असते.
 
तर कच्छपी म्हणजे कूर्म्मी ,डुलिः,  दुलिः ,  कमठी  म्हणजे कासवी .
कच्छपीचा दुसरा अर्थ वीणाविशेष म्हणजे सरस्वतीवीणा  असाही अर्थ आहे तर आयुर्वेदाने  क्षुद्ररोगविशेष  असेही म्हटले आहे. 

आता "कच्छपी लागणे" हा वाक्प्रचार नेमका कधी ? कसा ? आणि कां रूढ झाला असेल ? हे मोठेच कोडे पडले मला.
जर कोणी यावर भाष्य करून समजावून सांगेल तर मग या शब्दाच्या परत कच्छपी लागणार नाही मी.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.





  

Wednesday, June 3, 2020

#सहजोक्त.


#भानुतीर्थ.

सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत् ताः चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहः ते वन्दिनः ताः कथाः
सर्वं यस्य वशात् अगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नमः॥
बलवान् काळाचे महात्म्य सांगणारा हा श्लोक . किती तरी नंदत्या , वैभवशाली र‍ाजवटी या काळाने कवलीभूत केल्या आहेत.

 आज मोठ-मोठे विकसित शहर म्हणून  जे नगरं उदयाला आली आहेत , ते प्राचीन काळात होतेच असे नाही. तसेच तेव्हाची नगरं आज जंगल , गाव , मैदान वा रया नसलेले नगर असू शकते.

 भारतात कितीतरी असे प्राचीन वैभवशाली वारसे आहेत .  उत्खनन , पुनरुज्जीवन केले की लक्षात येते , त्याकाळातील विकसित , सुसंस्कृत समाज न् त्यावेळचे दक्ष राज्यकर्ते . आज पुरातत्वविद्येची  आणि स्थानिक खंबीर प्रशासनाची आवश्यकता आहे.

आज सर्व आठवण्याचे कारणही तसेच आहे.  आजच्या वर्तमानात नांदेड जिल्ह्यातील माहूर ही एक  तहसील आहे. आजचे माहूर पाहिले की ग्रामीण  खाणाखुणा डोळ्याला प्रकर्षाने जाणवतात.  कोणे एके काळी इथे नांदते   प्रगत राज्य असेल याची कल्पनाही येत नाही. पुराणकाळापासून प्रसिद्ध  असलेल्या या तीर्थक्षेत्राची  आजची स्थिती तेथे गेल्यावर जाणवते.

आमचे कुलदैवत म्हणून तीसेक वर्षांपासून तेथे दरवर्षी आमचे जाणे होते. काही वर्षांपासून माहूरचे रूपडे वेगाने  पालटत आहे.  आजकाल शहरांप्रमाणेच गावांचाही बाह्यांगी विकास करण्याचा सपाटा शासनाने चालवला आहे , त्यातीलच हा एक ; असा माझा समज होता. पण माहूरचा विकास हा निव्वळ बाह्यांगी आधुनिक नसून प्राचीन वारश्याचे पुनरुज्जीवन करून संपन्न देखभालही तेथे सुयोग्य पद्धतीने होत आहे , हे जाणवले. या मागची प्रेरणा व सद्बुद्धी नक्कीच आई रेणुका आहे असे वाटून तिला नमोमन हात जोडले.

  माहूरच्या धार्मिक -सांस्कृतिक वारश्याचा ख-या अर्थाने सुयोग्य वारस म्हणजे श्री. निलेश केदार. श्री. निलेश यांच्याकडे पाहिले की रेणुकेचे अनन्यभक्त कवी विष्णुदास यांचीच आठवण येते.
सध्याचे  रेणुका मंदिर प्रशासनही या कामासाठी तत्पर आहे.  अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी रेणुकाच योजना करते ,  यात शंका नाही. याच जोडीला सुदैवाने माहूरच्या  समृध्द वारश्याला जाणणारे कर्तव्यदक्ष व काटेकोर योजना करून कार्यान्वित करणारे स्थानिक प्रशासक  श्री. वरणगावकर तेथे तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत.

 सुजाण व सक्रिय नागरिक आणि दक्ष , उद्यमी प्रशासन यांचा मणिकांचन योग जुळला की तेथे चांगले होणेच आहे . हे माहूरला घडतय.
 मातृतीर्थाचा जीर्णोद्धार , विष्णुकवींच्या मठाचा जीर्णोद्धार  , शिवाय तेथील प्राचीन अनेक बाबींची यादी करून लवकरात लवकर जीर्णोद्धार करायचे स्थानकं यांची यादी. असे अनेक प्रकल्प   रेणुका संस्थान ,  स्थानिक प्रशासन व श्री. केदारांसारखे जागरुक नागरिक यांच्या समन्वयाने माहूरमध्ये सफलरित्या होत आहेत.
 सध्या तेथे भानुतीर्थ नावाचे स्थानक दुरुस्तीचे कार्य सुरु आहे. पिण्यायोग्य पाण्यांच्या स्रोतांचे पुन्हा पुनरुज्जीवन करून त्याचे गतवैभव त्याला मिळवून देत , तीर्थस्थानाचे महत्व पुनर्प्रस्थापित करणें हे सर्व कार्य जोमात सुरु आहे.

माहूरच्या प्राचीन वारश्याला सर्व प्रकारे जपणा-या या सर्वांना कृतज्ञतापूर्वक  वंदन .
भारतातील ठायी ठायी असणा-या अशा दुर्लक्षित वारश्यांचाही भाग्योदय व्हावा हीच जगन्नियंत्याकडे प्रार्थना.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
  

Monday, June 1, 2020

सहजोक्त.


# चिंतन.
अम्भोजिनीवननिवासविलासमेव
हंसस्य हन्ति नितरां कुपितो विधाता
न त्वस्य दुग्धजलभेदविधौ प्रसिद्धां
वैदग्ध्यकीर्तिमपहर्तुमसौ समर्थः ॥
कोपलेला विधाता हंसाचे कमलवन , पाणी वगैरे काढून घेऊ शकतो पण दूध-पाणी वेगळं करण्याचे कसब न् तशी कीर्ती मात्र काढून  घेऊ शकत नाही.
दोन दिवसांपूर्वी माझी ज्येष्ठ सखी डॉ. रंजना दाते मॅडम यांनी फेसबुकवर हा श्लोक पोस्ट केला. त्या श्लोकाचा साधारण आशय दिला आहे.
या श्लोकाचे स्पष्टीकरण देण्यापेक्षा एका लोकोत्तर नेत्याची कथाच सांगते.
लोकनायक बापुजी अणे उपाख्य माधव श्रीहरी अणे (ऑगस्ट २९,इ.स. १८८०-जानेवारी २६,इ.स. १९६८) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशातील राजकारणी होते. ते जानेवारी १२,इ.स. १९४८ ते जून १४,इ.स. १९५२ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.
तसेच  अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि   इ.स. १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये  महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या निवडक लेखांचे ‘अक्षरमाधव’ हे पुस्तक निघाले, तर ‘श्रीतिलकयशोर्णव’ या बापूजींनी रचलेल्या संस्कृत काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.

तर असे हे  बापुजी अणे मुळचे यवतमाळचे. त्यांचे वडिल  वेदशास्त्रसंपन्न होते. वडिलांनी  यांनाही ते ज्ञान दिले होते. पुढे बापुजी  नागपुरातील मॉरीस कॉलेजातून बीए झाले . नंतर कलकत्ता येथून वकीलीची पदवी घेतली. या सर्व काळात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतच होते.   स्वातंत्र्य लढ्यात  सहभाग घेतला म्हणजे शासना विरुद्ध बंड म्हणून त्यांची  सनद एक वर्षासाठी थांबवून ठेवली होती. बापुजी उदास झाले. घरी विमनस्क बसले असता त्यांच्या वडिलांनी म्हटले , "अरे ते तुझी सनद काढून घेऊ शकतात , तुझ्या डोक्यातील बुद्धी नाही. वकिली नाही करता आली तरी काय झालं ? गरजूंना सल्ला देऊ शकतो . रामायण-महाभारतावरील प्रवचनांनीही पोट भरता येते . निराश  वा लाचार होण्याची गरज नाही ".
पुढे वर्षभराने त्यांना सनद मिळाली. आणि आपल्या बुद्धिसामर्थ्याने तत्कालीन भारतीय राजकारणावर त्यानी प्रभाव टाकला.
श्लोकाचा  मथितार्थ आजही  आचरणीय आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




Sunday, May 31, 2020

सहजोक्त.


*पीनो देवदत्तः दिवा न भुङ्क्ते।*
 लठ्ठ देवदत्त दिवसा जेवत नाही. शास्त्रग्रंथांमध्ये (न्याय-वैशेषिक-सांख्य) हे वाक्य सामन्यपणे वाचायला मिळते. अर्थापत्तीचे उदाहरण म्हणून या वाक्याचा उपयोग करतात.  ज्या अर्थी देवदत्त दिवसा जेवताना दिसत नाही तरीही लठ्ठ आहे म्हणजे तो रात्री भरपूर जेवतो , हा सरळ तर्क  आहे.
  वरील वाक्य प्रतिनिधिक आहे. 
    पैशांचा अपहर न करणारे (कोट्याधीश) , एकपत्नीत्व निष्ठेने पाळणारे (अनेक मानलेल्या राधा असणारे) , अतिशय कर्तव्यकठोर (कोणत्याही मार्गाने हवे ते पदरात पाडून घेतल्यावर) , सत्यासाठी झगडणारे (त्यांच्या सोयीचे सत्य)  असे नाना प्रकारचे देवदत्त (आणि हो ,देवदत्ती सुद्धा <महिला समानता>) अवती भवती सुखाने वावरत असतात. 
 आपल्याला   वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या स्तराचे अनेक देवदत्त अनुभवायला मिळतात. 
 आठवा बरे तुम्ही , तुमच्या माहितीतील देवदत्त ,
 अन्  *पीनो देवदत्तः दिवा न भुङ्क्ते।* या उदाहरणाची सत्यता पडताळून पहा.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, May 30, 2020

सहजोक्त.

#शब्दचिंतन
 "माझं झालं बर समाधान" ,  'आहे त्यात समाधान मानणे", "ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान"... वगैरे अनेक वाक्यांतून समाधान हा शब्द कानी पडतो.

 समाधान ही एक मनो-अवस्था आहे. तृप्त होणे , मनातून संतुष्ट होणे म्हणजे समाधान पावणे असे साधारण आपण समजतो. व्यवहारात ते बरोबर आहे .

"समाधान"  ह्या शब्दावर विचार करताना लक्षात आलं की सम+आधान  ज्याने मिळेल तेच समाधान .
आधान म्हणजे स्थान , ठिकाण , ज्याच्या आधाराने ठेवता येतं ती बाब . सम म्हणजे सारखे , समान वगैरे.
आधान कशाचे ?  तर आनंदाचे. जेव्हा आनंदाची अनुभूती देणा-याला न् घेणा-याला  सम प्रमाणात प्राप्त  होईल  तेव्हा ते खरे  "समाधान" होईल .

उदाहरणार्थ  लाडक्या मुलांसाठी आई अतिशय मायेने काही पदार्थ बनविते. मुलेही मनापासून खातात .  त्यांना  आनंदाने , पोटभरून  खाताना पाहून आईचे श्रम सफल होतात. मुले जेव्हा मनातून म्हणतात  , "किती छान झाला ग हा पदार्थ , वा मजा आली खाताना !" तेव्हा त्या पदार्थ निर्मिती पासून ते पदार्थ उपभोगापर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी  झालेल्या प्रत्येकात त्या आनंदाचे सम+आधान होते .  त्यातून त्या सर्वांना  समाधान मिळाले.

समाधान ही एकेरी मानसिक अवस्था नसते. त्या प्रक्रियेत जे जे म्हणून सहभागी असतात ते सर्वच समान अनुभूतीच्या पातळीवर आले की खरे समाधान होते.

आणि एक  , समाधान ही जरी मानसिक  , भावनिक अवस्था असेल तरी तिची अभिव्यक्ती करणे हे सगळ्यांच्याच हिताचे असते.  त्याने आनंद शतपटीने पसरत जातो न् सुख वाढते. (सुख म्हणजे काय ?याचे चिंतन पूर्वीच केले आहे.)
सुरुवातीला तीन वाक्य उदाहरण म्हणून दिली आहेत . त्यातील पहिल्या दोन वाक्यात  समाधान शब्द जरी योजला तरी  तेथे समाधानाची पूर्ती नाही. कारण समाधान हे एकट्याचे नसतेच .
तिसरे वाक्य मात्र समाधानकारकच आहे!  कारण चित्ताच्या समाधानाच्या प्रक्रियेत अनंत म्हणजे ईश्वर आहे . तो  चांगले ठेवतो याची खात्री व अनुभव असल्यामुळे देव नि भक्त यांना "सम+आधान" असणारच.
तर अशा  ह्या  सम+आधानात जितके  वाटेकरी जास्त तितके त्याचे प्रमाण ही जास्त !  झाले ना समाधान ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.





Friday, May 29, 2020

#सहजोक्त.



नाति धैर्यं प्रदातव्यम्
नाति भीतिश्च रोगिणि ।
नैश्चिन्त्यानादिमे दानं
नैराश्यादेव  नाऽन्तिमे ॥
 कलिविडम्बनम् नावाचे एक रंजक-काव्य , महान संस्कृत कवी  निलकंठ दीक्षित यांनी रचले आहे.
या काव्यात विडम्बनातून सामाजिकवृत्तींवर  प्रहार केला आहे.

वरील श्लोकात कवी वैद्याला(डॉक्टरला)  सांगतो , की  , " रोग्याला अतिशय जास्त धीर देऊ नये. तसेच अतिशय जास्त निराशही करू नये . पहिल्या परिस्थितीत रोगी मनातून निश्चिंत होतो न् दान (फीज) देत नाही तर शेवटच्या परिस्थितीत रोगी जगण्याची उमेदच हरवून बसतो म्हणून दान (फीज) मिळत नाही.

श्लोक तसा वैद्यांना समुपदेशन आहे. रोग्याच्या मानसिकतेला जपूनच उपचार करावा जेणे करून सतत आवक र‍हील.
हीच बाब सर्वच क्षेत्राला लागू होते ना ?
"इतकेही ताणू नये की तुटून जाईल , नि इतकेही जुळू नये की अस्तित्वच र‍हणार नाही"
खयाल अपना अपना , नसीब अपना अपना ....
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, May 27, 2020

सहजोक्त

शब्दचिंतन .
शब्दधन आम्हा शब्दचि साधन
शब्दांनीच होती जीवन अर्थपूर्ण ॥
शब्द अन् त्याचा अर्थ किंवा अर्थ न् त्यासाठीचे शब्द या दोहोंचे सुंदर नाते सांगणारा कालिदासाचा श्लोक आहे. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ । । १.१ । ।(रघुवंश-पहिल्या सर्गातील पहिला श्लोक) कलिदासासारखा सिद्धहस्त शब्दप्रभु म्हणतो की वाणी आणि अर्थ यांच्यासारखे एकमेकांत मिसळून गेलेल्या ,एकजीव झालेल्या शब्दसृष्टी व जीवसृष्टीचे जनक असे पार्वती-शंकर यांची वाणी व अर्थ यांच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करतो .
तर असे हे शब्द न् त्याचे अर्थ जणु शिवपार्वतीसारखे एकजीव झाले आहेत. असे सार्थ-शब्द योग्य प्रकारे वापरले तरच हे अमोघ होतात ,नाही तर आहेच शब्दबंबाळलेपणा ! शब्द ही शक्ती अाहे ,असे साहित्यकारच नाही तर भौतिकशास्त्र देखिल म्हणते. साऊंड म्हणजे ध्वनी आणि शब्दाचे मूळ ध्वनीतच असते. शक्ती म्हणजेच ऊर्जा . ऊर्जा एका रूपातून दुसरे रूप सहज धारण करीत असते म्हणुन ऊर्जा सांभाळून वापरावी. मग शब्द देखील जपूनच वापरावेत , होय ना ?
शब्द नेहमी सार्थ म्हणजे अर्थपूर्ण असावेत , निरर्थ , व्यर्थ नकोत. त्यातल्या त्यात व्यक्ती , घर , वस्ती , गाव , पाळीव प्राणी इत्यादी इत्यादी यांची नावे सार्थच असायला हवीत.
जुन्या काळी देवादिकांवरून अपत्यांची नावे ठेवत .त्यात दोन हेतू असे , एक तर देवाचे मंगलमय नाव सारखे तोंडात येई , दुसरे नाव सार्थच असे.
आपल्या अोळखीच्या कितीतरी व्यक्तींची नाव राम , कृष्ण , राधा ,रमा , विष्णु , शंकर , महादेव , गंगा इत्यादी असतात. ही देवांची नावं आहेत ,हे खरेच पण त्यांना छान अर्थ आहे . जसे े ज्यात रममाण होते (मन) तो राम . (मन) आकर्षून घेतो तो कृष्ण , राध् म्हणजे ऐश्वर्य राधा म्हणजे ऐश्वर्यवती , रमा म्हणजे जिच्यातमन रमते अशी लक्ष्मी , विष्णु ,शिरण्याची /व्यापण्याची इच्छा असलेला , शंकर म्हणजे जो शम् (कल्याण) करतो , गंगा म्हणजे जी सारखी पुढे जाते.
शब्दकोशांमध्ये शब्दांचे अर्थ उलगडून दाखविले असतात , तसेच त्यांचा उपयोग कुठे ,कोणत्या संदर्भात केला याचेही सोदाहरण उल्लेख केला असतो. अापटें ,मोनारविल्यम इत्यादी आधुनिक कोश यासाठी उपयुक्त ठरतात. जुन्या शब्दांप्रमाणे आजकालचेही शब्द , शब्दकोशपद्धतीने मांडणे ,मोठा मनोरंजक उपक्रम ठरतो. संस्कृत मध्ये अमरकोशादी अनेक कोश उपलब्ध आहेत. त्यात शब्दांना पर्यायी शब्द दिले असतात. अमरकोशाच्या धर्तीवर मराठीतील खिडकी या शब्दाचे एक विडंबनपर उदाहरण असे , " विंण्डो-वातायनो-खिडकी-गवाक्षो-भोंक भिंतीचे !" असे मनोरंजनपर अाधुनिक कोश ,आपणही तयार करू शकतो.
शब्दांना मुळात काही अर्थ असतोच , तो समजून घेणे फारच रंजक आहे .काही शब्द आपण समानार्थी म्हणून योजतो . वरवर वाचताना ते समानार्थी वाटतातही .उदाहरण म्हणून झाड शब्दाचे समानार्थी शब्द बघू . जसे पादप (मुळांनी पाणी पिणारा ), महिरूह (जमीनीवर उगवणारा) , शाखी (फांद्या असलेला) , विटपी (कक्षीगत कोंब असलेला) , तरु ((जमीन फोडून बाहेर येणारा) , वृक्ष( छाटल्या जाणारा) . म्हणजे या प्रत्येक शब्दातून झाडाचा एकेक गुण दिसून येतो.
" शाखा " हा शब्द फांदी या अर्थाने आपण सहज वापरतो . शाखा शब्दाची उकल अशी करतात , "खे शयति इति (आकाशात झोपतात ) " , म्हणजे फांदी आकाशात पसरलेली असते ना म्हणून .
शब्दांची मुळापर्यंत अशी उकल करणे हे भाषेच्या श्रीमंतीचे लक्षण आहे. यास्काचार्य लिखित निरुक्त नामक ग्रंथात अशा कितीतरी शब्दांचे अर्थ उलगडून सांगितले आहेत. अर्थ उलगडून सांगण्याच्या निरुक्तातील पद्धतीला निर्वचने असे म्हणतात. जुन्या शब्दांची निर्वचने वाचून नव्या शब्दांना ती लावून पाहाणे , उत्तम चाळा ठरेल.
शब्दांशी , त्याच्या अर्थांशी अशी गट्टी झाली की पुढची पायरी आहे की इतर भाषांमधील त्याच अर्थाचे शब्द व आपल्या भाषेतील तो शब्द , यांच्यात झालेले परिवर्तन (खरे तर भाषा-अंतर) अोळखणे ,आपली भाषा व दुसरी भाषा यांच्या विकासाची पाऊलवाट अोळखणे इत्यादी होय.
एक उदाहरण बघू या. संस्कृत मध्ये "भ्रमर" हा शब्द आहे . विविध भारतीय भाषांमध्ये या अर्थाचे आलेले शब्द पाहू बरे !
भ्रमरः ( संस्कृतम् )
भमरो (पाली)
भँवरा ( हिंदी )
भुंगा ( मराठी )
ભમ્મર ( गुजराती - भम्मर )
ভ্রমর ( बांगला - भ्रॉमोर )
ਭਰਿਂਗ ( पंजाबी - भरिंग )
बुमरो (काश्मिरी)

भँहर (ऊडिया ) 

Bumblebee ( इङ्ग्लिश)
उच्चारणाचे मुख्य साधन म्हणजे "मुख" होय. भौगोलिक परिस्थिती ,मुखवैविध्य यामुळे भाषांमध्ये बदल दिसून येतो. वरचे एक उदाहरण बघून ठळकपणे लक्षात येते. भारतीय भाषांमध्ये परस्पर साहचर्य व स्नेह टिकून राहण्यासाठी असे भाषा-अंतर समजून घेणे काळाची निकड आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

सहजोक्त..

हंसान्योक्ति
कस्त्वं लोहितलोचनास्यचरणः हंसः कुतो मानसात् । किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनान्यनम्भः सुधासन्निभम् ।
रत्नानां निचयाः प्रवालमणयो वैदूर्यरोहाः क्वचित् । शम्बूका अपि सन्ति नेति च बकैराकर्ण्य हीहीकृतम् ।।
शार्दुलविक्रीडित वृत्तातील ही अन्योक्ती. यात बगळे व हंस यांचा संवाद आहे.
बगळे= लाल डोळे ,तोंड ,पाय असलेला तू रे कोण ?
हंस = मी हंस .
बगळे = कुठून आलास ?
हंस = मानस सरोवराहून ....
बगळे = तिथे काय असतं ?
हंस = सोनेरी कमळांची वने आणि अमृतासम स्वच्छ पाणी ,रत्न -प्रवाळ-मणी यांचे ढिगंच्या ढिगं ,क्वचित वैदुर-पर्वतावरील दुर्मिळ वनस्पती सुद्धा असतात तिथे.
बगळे = तिथे शिंपले असतात कां पण ?
हंस = नाही
बगळे = ही ही ही...!!
बगळ्यांचे आकलनच कमी हंसाने तरी काय करावे ?
आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्याची खिल्ली उडवावी ,असे कायमच वाटणारे अनेक हीनजन असतात. अनेक अद्वितीय गोष्टी त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असतात , ज्या त्यांना साधारणपणे खोट्या वा काल्पनिक वाटतात म्हणून कितीही उत्तमपणे समजावून सांगितले तरी त्यांना त्या कळूच शकत नाही. त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेली क्षुद्र बाब तुमच्या जवळ नाही , हे कळल्यावर ते तुमची यथेच्छ टवाळी करतात न् तुम्ही श्रेष्ठ होण्यास कसे नालायक आहात ,हे बहुमताने सिद्ध करतात.

सोने मोजायच्या तराजूने कोळसे मोजयला जावे न् "छे ,उपयोगी नाही", असे म्हणून फेकून द्यावा ,असे आहे.
बगळा-हंस या रूपकातून मानवी मनोव्यापार समजतो.

Monday, May 25, 2020

सहजोक्त.

#दृष्टांत कथा.
आकाशाशी स्पर्धा करणा-या , मोठ्या झाडावर  एक बांडगुळ उपजलं होतं . आपल्या सावलीने इतर झाडांना वाढूच न देण्याचा दोष होताच वृक्षाचा . बांडगुळाना पोसण्याच त्याला धन्यता होती. मोठ्या झाडामुळे त्या  बांडगुळाचाही विहार कायम उंच आकाशातच असे. वाणाचा प्रश्नच नव्हता , गुण मात्र घेतला त्याने.  झाडावर आयते पोसल्या जाणा-या त्या  बांडगुळाने एकदा चुकून खाली पाहिले.

जरा दूर रखरखत्या उन्हात ,  कोणाच्याही मदतीशिवाय जगणारे छोटे गवती झुडूप होते. उन्हामुळे न् मोकळ्या वा-यामुळे जरासे म्लान , सुकले होते ते .
मिळणा-या   आयत्या  पोषणाने बांडगुळ बाळसेदार , तजेलदार होते.

दूरच्या त्या झुडूपाला बांडगुळाने तुच्छ नजरेने बघितले. न् कुजबुजला की ,' छी काय हे क्षुद्र जीव देव निर्माण करतो ना उगाच  ?'
झाड होते मोठे विशाल न् फारच जुने . फांद्यांची जोरजोरात हालचाल करताना ,  कधी कधी दाणकन फळे पाडताना कधीच झुडुपाचा विचारही त्याच्या मनात येत नसे. ते जुडूप कितीदा फांद्यांच्या भाराने , फळांच्या तडाख्याने दबायचे , वाकायचे , झुकायचे. बांडगुळाला यात फारच मजा यायची. 'आपल्या समोर सर्वच झुकतात , आपण ग्रेट ' ,असा त्याचा समज दिवसागणिक वाढायचा.
झुडुपाला खंत वाटायची पण त्याला जगण्यासाठी हे सर्वच सहन करणे भाग होते.

एकदा जोराचे वादळ आले. सारा परिसर वादळाच्या तडाख्याने अस्ताव्यस्त झाला. बांडगुळ आपल्याच भाराने धाडकन कोसळले. जमिनीवर पडल्या पडल्या त्याने परत झुडूपाकडे पाहिले . वादळाने झुकविलेले ते झुडूप आता परत उभे झाले होते.

तेव्हड्यात परत दुप्पट वेगाने वादळी पाऊस आला. जुने मोठे झाड काडकन आवाज करीत अर्धे दुभंगले , अर्धे तुटले न् थोडेसे शिल्लक राहिले . तुटलेला भाग बांडगुळावर कोसळला न्  बांडगुळाचे शकलं शकलं झाली.

इकडे हे झुडूप पार  जमिनदोस्त झाले . वारा-पाणी-गारा यांच्या मा-याने गतप्राण झाल्यासारखे निपचित पडून राहिले.
काही काळाने वादळ शांत झाले . भयंकर पडझडी नंतर झाड कसेबसे सावरले. त्याची मुळे खोल खोल जमिनीत रुतलेली असल्यामुळे  पुन्हा त्याने जीव धरला न् आता ते आता जमिनीशी घट्ट रुजून  जगू  लागले.
बांडगुळाचे अस्तित्व संपले होते . झुडूप मात्र परत पहिले सारखे  जगत होते.

# द्राष्टांतिक = ? तुम्हीच विचार करा न् सुचवा.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Sunday, May 24, 2020

सहजोक्त

चकवा
आमच्या लहानपणी खेड्यातल्या स्त्रिया , उन्हाळ्यात शेतावरची कामे कमी झाल्यामुळे, जंगलातील र‍ानमेवा गोळा करायला  जायच्या .  उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे आम्ही देखील खेड्यात असायचो.
एखाद वेळेस त्यातील एखादी बाई घरी यायची आईशी गप्पा मारायला किंवा काही विचारपूस करायला.
नव्वद टक्के आदिवासी गाव ते. भुताखेत , करणी , जादुटोणा , आग्यावेताळ  अशा गोष्टी खुप सांगायच्या तेव्हाच्या खेड्यातल्या म्हाता-या आजीबाई.
जंगलात जाणा-या या मध्यमवयीन बाया देखील 'जंगलात चकवा आहे' , असं सांगायच्या.  त्या गोष्टी  ऐकताना मजा वाटायची पण भयंकर भीतीही वाटायची.  आईला सांगत असलेले किस्से आम्ही पूर्ण कान देऊन ऐकायचो.  एखादा शब्द कळाला नाही की  मध्येच विचारायचो. आई खूपदा रागवायची की मोठ्यांमध्ये बसू नये. पण परत आईच्या पदराशी बसून ऐकत रहायचे , हीपण करमणूकच होती.
एका बाईने सांगितले की ," जंगलात एका जणाला चकवा लागला न् तो त्याच्या मागेच जाऊ लागला . मग तो गायब झाला . काही दिवसांनी तो माणूस पांढराफट्ट होऊन जंगलात मेलेला दिसला ".
हे सगळं ऐकल्यानंतर आईला विचारलं की चकवा काय असतो ? आईने त्यावेळी काही तरी उत्तर दिले. पुढे शाळेत गेल्यावर पुस्तकं वाचू लागले अर्थात अभ्यासाचे नाहीच . कथा-कादंब-यांतून चकवा , भुलवा वगैरे गोष्टी वाचू लागली. न् या अज्ञात गोष्टींची अनामिक भीती सुप्त मनात बसून गेली.
पुढे शिक्षण , संसार , नोकरी यांच्या चक्रात आकंठ बुडले न् तो  अज्ञात भीतीचा चकवा बाजूला पडला , असं वाटलं. सध्या मनन-चिंतन करण्यासाठी वेळच वेळ आहे. मग "खाली दिमाख शैतान का  घर ", धावू लागले.

वास्तवात चकवा असतो कां , याची कल्पना नाही. पण मानवी मनात अत्यंत गुंतागुंतीच्या भावभावना सतत उलथापालथ करीत असतात. आयुष्य कधी सरळ सरळ समोर जाते. तर कधी आडवळणं , खाजखळगे घेत समोर जाते. कधी कधी जायचे एका मार्गाने असते , ध्येय ठरलेले असते मात्र जराश्या  अनवधानाने भलत्याच मार्गाला लागतो. परतीचा मार्ग विसरतो . चुकीच्या कां होईना रस्त्यावरून सतत पुढे गेले की काही तरी प्राप्त होतंच , फरक इतका की ते इप्सित असेलच असे नाही.


पण आयुष्यात चकवा लागला तर ?? .  मुळात चकवा हा भास असतो वास्तव नाही . त्यामुळे त्याच्या मायाजालात अडकल्यावर सुटकेचा मार्ग सापडणं अवघड. पण आपलं पुण्य बलवत्तर असेल , पूर्वसुकृत चांगलं असेल न् गुरुबळ पाठीशी असेल  सुटका होते त्यातून .  अन्यथा आयुष्यातील चकव्यात ऊर फाटेस्तोवर गुरफटून शेवट होतो जीवनाचा. माणूस संपून जातो पण नेमका चकवा कुठे लागला ? केव्हा लागला ? कशाने लागला ? समजत नाही. न् त्यामुळे "पुढच्यास ठेच मागचा शहाणा " असेही घडत नाही.
चकवाग्रस्त माणूस धावधाव धावतो पण (मंझिल ) ध्येय साध्यच होऊ शकत नाही न् शेवटी संपतो.
संसारात काही व्यक्ती  , काही प्रसंग , काही लालसा  मानवापुढे "चकवा" बनून येतात. पार त्यांच्यात गुरफटून टाकतात. एकामागून एक टकळी सुरूच राहाते . धापा टाकत धावत माणूस मेतकुटीला येतो पण चकवा सोडत नाही. न् हाच तो चकवा हेही कळत नाही.
अशा वेळी लॉकडाऊन (म्हणजे सर्व व्यवहार बाजूला ठेवून 'स्व' वर केंद्रित करावं )   किंवा  विपश्यना  करावी त्याने  मन तटस्थ होते न् सूर्यप्रकाशासारखं वास्तव समोर येतं .
त्यावेळी मात्र ,"हुआ सो हुआ"  किंवा "आता काय होणार , जे आहे तेच समोर रेटू" असा विचार न करता त्या त्या चकव्यातून बाहेर पडावे . आपल्या मागे लागलेल्या चकव्यात दुस-याला अोढू नये.  चकव्यातून सुटण्यासाठी जराशीही दया-माया-खंत  बाळगू नये. अन्यथा आयुष्य संपूनही साफल्य , श्रेय मिळणार नाही.
तर असा हा असतो आयुष्याचा चकवा.
ज्याने त्याने शोधावा न् भेदून  बाहेर यावे सहीसलामत त्यातून .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, May 21, 2020

#सहजोक्त.


#सकाळची पुण्यकमाई !😊
माझ्या घरासमोर कॉलोनीचा रस्ता आहे न् रस्त्यापलीकडे वॉकिंग ट्रॅक नि ट्रॅकच्या पार मैदान.
लॉकडाऊनमुळे मी घरासमोरच्या ट्रॅकवर  सकाळी फिरते.
 घराच्या प्रवेशदारावर कमान आहे न् कमानीवर एका बाजूने वेल्या मोगरा तर दुसरी कडून दुहेरी-जुई असे वेल आहेत. सध्या मोगरा बहरलाय. (लॉकडाऊन दुसरा बहार!) मोग-याचा वेल जरासा कमानीतून उतरला आहे. सध्या फुलावर असल्याने कटिंगही शक्य नाही. खाली अोघळणा-या वेलींवरही फुले लगडतात.

आज एक गंमतच झाली. चांगल्या कपड्यातील मध्यमवयीन टापटिप मॅड्डम  आमच्या दाराशी उभ्या राहून वेलीला खाली अोढून फूले तोडत होत्या. (अशा प्रकारे फुले तोडण्याला आमच्याकडे फूलं बुरणे म्हणतात!)  मी समोरच रस्त्यापलीकडून ट्रॅकवरून पहात होती.
हाताला घड्याळ  , कानाला ईअरफोन ,खांद्यावर  छोट्या पर्समध्ये लटकलेला  मोबाईल न् या ताई फुले तोडत होत्या. स्वाभाविक मी घराच्या दिशेने चालू लागली. त्या बाईंना मीही त्यांच्याच जमातीतील एक वाटून प्रभात-संवाद घडला .😀
ती = फुलं , देवाला लागतात ना , म्हणून नेतेय.
मी = होय कां ? आमच्याकडेही देव आहे.
ती = इकडले नका घेऊ मीच घेणार ते , तुम्ही त्या बाजूचे अोढा ...
मी = अहो हे घर माझंच आहे.
ती.= मग तुम्हाला बाहेच्या फुलांचं काय करायचंय ? आतले पुरे होतात की .
मी= ??!!! 🙄
ती= देवाला फुलं दिली तर पुण्यच मिळेल ना तुम्हाला.
मी= असं कां !
ती = जरा मन मोठं ठेवावं हो माणसानी !
तुमच्या घरी आहे तर आमच्याही घरी देवच आहे ना !
मी = 🙏 धन्यवाद . पुण्य मिळवून दिल्या बद्दल.

मला कौतुक वाटते या फुलचोर न् पुण्यदायक मंडळींचे. झाडं तुमची , वर्षभर तुम्ही निगा राखा न् अशाना संधी द्या , ती झाडांना वाकवतील , अोरबाडतील , फुले चोरतील तरी मन मोठं करून  पुण्य कमवा. 
किती कमाल आहे ना ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Tuesday, May 19, 2020

सहजोक्त.

#शब्दचिंतन.
काही काही शब्द  ऐकून ऐकून  सरावाचे होतात की तेच मूळ शब्द वाटू लागतात. आज प्रचलित असलेला शब्द , निर्मितीच्या वेळी तसाच असेल असे नाही. कितीतरी बदल घडत घडत आजचा शब्द तयार होतो. ही बदल घडण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असते तशी रंजकही असते.
शब्दांचा हा रम्य प्रवास  नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे. त्यामुळे मूळ शब्द , त्याची स्थित्यंतरे  , वर्तमान रूप नि भविष्यवेधही लक्षात येतो. शिवाय त्या शब्दावर उभारलेला भाषिक व्यापार न् त्याला चिकटलेला सामाजिक प्रभाव , हा देखिल समजायला मदत होते.

"नारळ" , हा शब्द आपण सामान्य जीवनात वापरतोच . आज या शब्दाची जन्मकथा बघू.
नारळ हा शब्द मूळात दोन शब्दांपासून तयार झाला आहे.
नाल  म्हणजे नळी , (मूळांची  वा देठाची वा खोडाची )  उदा . कमलनाल = कमळाची दांडी .
केर म्हणजे म्हणजे पाणी . पाण्यासाठी अनेकानेक शब्द आहेत. 'क' म्हणजेही पाणी . जसे  'ख' म्हणजे आकाश , 'मा' म्हणजे लक्ष्मी इत्यादी. आयुर्वेदीय शब्दकोशात 'क' , केर म्हणजे पाणी म्हटले आहे. केरल  याही शब्दात केर  आहेच . जसं स्नेह चे स्नेहल  तसंच  हेही. तसेही केरळ प्रांतात पाणी जास्त आहे.
कफ या शब्दासाठी आयुर्वेदात   केन (जलेन) फलति इति म्हणजे पाण्याने जो वाढतो तो कफ , असं म्हटलं आहे.

नालिकेर म्हणजे  नालीने म्हणजे मुळ्यांच्या , बुंध्याच्या नळीने  (समुद्राचे)  केर म्हणजे पाणी पिणारा ; असा मूळ अर्थ झाला.
आता या नालिकेर चे वर्णविपर्यस्त होऊन झाले नारिकेल . अनेक बदल होत होत नारियल /नारळ झाले.

आता नारळ या शब्दावरून व्यवहारात कितेक म्हणी न् वाक्प्रचार तयार झाले आहेत.
नारळ देणे  ,  नारळासारखं व्यक्तिमत्व , नारळ फुटणे  , देवाची करणी आणि नारळात पाणी वगैरे वगैरे .  या म्हणी न् वाक्प्रचाराच्या मागेही काही कथा , संकेत , रूढी वगैरे असतात.

भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत.
त्यांचा जन्मप्रवास उलगडून दाखवणारं एखादं पुस्तक लिहावं , असे वाटते . मग विचार येतो की असे पुस्तक लोकांना उपयुक्त ठरेल काय ? छपाईचा खर्च तरी निघेल काय ?   असे विचार आले की लेखन थांबून जाते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...